मलेरिया व औषधे
मनुष्य जातीला मलेरिया सदृश तापाने २५०० ते ३००० वर्षांपासून पछाडल्याचे दाखले आहेत . हा रोग कशा पद्धतीने होतो ह्याचे गूढ उकलण्यास १ ९ वे शतक उजाडावे लागले ; परंतु त्या आधी या तापावर प्रभावी औषधे वापरल्याच्या नोंदी आहेत .
२००० वर्षांपूर्वी चीनमध्ये अशा तापावर चॅगशॅन ( डिकोरा फेरीफ्युगा ) वनस्पतीचे चूर्ण वापरीत असत . १२ व्या शतकापासून पुढे चीनमध्ये Artemisia Anuya ( क्विंघासो ) या वनस्पतीचा उपयोग ताप उतरविण्यासाठी केला जात असे . परंतु नेहमीच्या चीनी पद्धतीनुसार अर्थातच हे औषध जगापासून पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले होते ते अगदी थेट १ ९ ८० सालापर्यंत ! आजमितीला बनणारे Artesunate हे याच वनस्पतीपासून बनविले जाणारे एक प्रभावी औषध आहे .
१७ व्या शतकात दक्षिण अमेरिकेतील स्पेनच्या व्हाईसरॉयच्या पत्नीला झालेला मलेरिया सदृश ताप तेथील एका वनस्पतीच्या सालीच्या अर्कामुळे बरा झाला . त्यावेळी या वनस्पतीला स्थानिक लोक तापाची झाडे ( Fever Tree ) म्हणून ओळखीत . या झाडांचा शास्त्रीय अभ्यास करून त्यांना सिंकोना ( व्हाईसरॉयच्या पत्नीचे स्पेनमधील गाव ) हे गावाचे नाव देण्यात आले .
तसे पाहाता पेरु व त्यांचा शेजारी बोलेव्हिया या देशांमधील क्युचुआ हे इंडियन जमातीचे लोक या सिंकोना झाडाचा उपयोग शेकडो वर्षांपासून ताप उतरविण्यासाठी करीतच होते. तापाबरोबर येणारी हुडहुडी या झाडाच्या रसाने नाहिशी होते व तापही उतरतो याचे ज्ञान त्यांना फार पूर्वीपासून होते . इंडियन जमातीचे लोक ह्या झाडाच्या खोडाची बारीक पावडर वाईनबरोबर मिसळून ती पिण्यास देत ; ज्या अनुभवातून त्याचा मलेरिया प्रतिबंधकारक उपयोग लक्षात आला होता . या जेसूट बार्क ( झाडाची साल ) पावडरचे महत्त्व पेरु मध्ये एवढे वाढले की त्याची मौल्यवान वस्तूंमध्ये गणना होऊ लागली . या झाडाची आयात युरोपात होऊ लागली . इंग्लंडच्या राजाने ही मौल्यवान भेट रोमच्या राजाला दिली . त्यासुमारास इटलीत पोपसकट अनेक मान्यवर व्यक्तींना मलेरिया सदृश तापाने ग्रासलेले होते . फ्रेंच संशोधक पियारे आणि जोसेफ यांनी सिंकोना पासून निघणाऱ्या पावडरचे रासायनिक पृथ : करण केले व १ ९ २० मध्ये त्याला क्विनिन हे नाव देण्यात आले . क्विनिन हा शब्द पेरु भाषेतून क्युचुआ ( इंका ) सिंकोना बार्क व त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन ते क्विना क्विना अथवा पवित्र बार्क ( बार्क म्हणजे झाडाची साल ) या नावाने ओळखले जाऊ लागले .
युरोपियन वसाहती स्थापन करणाऱ्यांनी आपल्याबरोबर क्विनिन अफ्रिकेत नेले . त्यामुळे तेथील स्थानिक लोकांची मलेरियातून मुक्तता होऊ लागली व यामुळे या वसाहतकारांचा अफ्रिकेत चांगला जम बसला . या झाडाचे महत्त्व ओळखून पेरु मधील सरकारने सिंकोनाचे बी युरोपात निर्यात करण्यास बंदी घातली . एका डच व्यापाऱ्याने सिंकोनाच्या बिया पळवून त्याची लागवड जावा बेटांमध्ये केली , जेथे त्यांचे साम्राज्य होते . अशा रीतीने डचांनी संपूर्णपणे सिंकोना बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली . पुढे जवळजवळ १०० वर्षांनंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले . जावा बेटांवर जपान्यांनी कबजा केला . सिंकोना पावडर युरोपात येणे बंद पडले . हॉलंडमध्ये जो काही साठा होता तो जर्मनांच्या ताब्यात गेला . त्यामुळे युरोपियनांची कोंडी झाली . अमेरिकेने कोस्टो रीका या बेटांवर सिंकोना वाढविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही . या सर्व अनर्थामुळे अमेरिका व युरोप या दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना दुसऱ्या महायुद्धात क्विनिन न मिळाल्याने त्यांचे हजारो सैनिक मलेरियामुळे मृत्युमुखी पडले . जपानच्या हाती जावा बेटावरील सिंकोना झाडे होती परंतु त्यापासून क्विनिन तयार करण्याकडे तेथील जपान्यांनी बरोबर लक्ष न दिल्याने त्यांचेही हजारो सैनिक या औषधा अभावी मृत्यु पावले .
महायुद्ध संपले आणि अमेरिकन संशोधकांनी क्विनिनचे उत्पादन प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने केल्यामुळे टनांमध्ये हे उत्पादन होऊ लागले . होमिओपॅथीचा जनक असलेला सॅम्युअल हॅनेमान एकदा ‘ मलेरियावरील उपचार ‘ या लॅटिन पुस्तकाचे भाषांतर करीत असताना एका विधानाने त्याचे लक्ष वेधून घेतले . ‘ सिंकोना बार्क या वनस्पतीमधील क्विनिन या घटकाच्या कडवट गुणधर्मामुळे मलेरिया बरा होतो ‘ अशा आशयाचे ते वाक्य होते . यापेक्षा अधिक कडू असलेले परंतु मलेरियासाठी प्रभावी नसलेले अनेक औषधी पदार्थ हॅनेमानला ठाऊक होते . सिंकोना बार्कमध्ये नेमके काय रसायन आहे हे शोधण्यासाठी त्याने एक धाडसी प्रयोग केला . त्याने स्वतःच सिंकोना बार्क घेऊन बघितले . काही डोस घेतल्यावर त्याला काही लक्षणे मलेरिया सदृश दिसू लागली . उदाहरणार्थ थंडी वाजून हुडहुडी भरून ताप , डोकेदुखी , अंगदुखी अशक्तपणा वगैरे . डोस बंद केल्यावर ही लक्षणे लगेच नाहिशी होत . त्यांच्या लक्षात आले की सिंकोना बार्क मध्ये मलेरिया सारखी लक्षणे उत्पन्न करण्याची क्षमता आहे . म्हणूनच ते मलेरियावरील औषध आहे . मलेरियाची लक्षणे असलेल्या तापाच्या अनेक रुग्णांना हॅनेमानने सिंकोना बार्कचे अल्प डोस देऊन बरे केले . होमिओपॅथीच्या सिद्धान्ताप्रमाणे उपचाराचे रसायन अतिशय अल्प प्रमाणात दिल्यास रुग्ण बरा होतो .
अशा तऱ्हेने १६३० पासून १९४० सालापर्यंत क्विनिन या एकमेव औषधाने मलेरिया विरुद्ध टक्कर दिली . आजही काही वेळा त्याचा विचार केला जातो . १ ९ ०० ते १ ९ १० या काळात Atomic lodine अथवा Nascent reacting lodine या पासून बनलेले बेसेलिन हे औषध मलेरियावरील रामबाण औषध म्हणून युरोपात उदयास आले होते . या औषधावर भारतातील एक नावाजलेले शास्त्रज्ञ डॉ . शंकर आबाजी भिसे ( जन्म १८६७ मुंबई ) यांनी बरेच संशोधन केले होते . ब्रम्ही तेलाचा उपयोग करुन lodine चे प्रमाण वाढवून त्यांनी Bhise’s Medicine for Malaria तयार केले होते . ज्याला पुढे १ ९ २० मध्ये अमेरिकेत पेटंट मिळाले होते . तसेच खाणीमधून मिळणारे गंधकमिश्रित पाणी व काही विशिष्ट समुद्र वनस्पतींचे मिश्रण डॉ . भिसे यांनी तयार केले होते , ज्याचा ॲमेझॉन खोऱ्यातील मलेरिया विरुद्ध यशस्वीपणे उपयोग केला गेला होता . पुढे मेक्सिकोमध्ये या मिश्रणाचे इंन्जेक्शन बनविण्यात आले होते . क्विनिन पेक्षा ही औषधे जास्त प्रभावी ठरली होती .
Edgar Caye नावाच्या डॉक्टरने अशा तऱ्हेच्या औषधांचा मलेरिया विरुद्ध वापर केलेला होता . अशा तऱ्हेच्या अभ्यासाला Holistic Medicine म्हणतात . Caye हे त्याचे जनक होते .
जगातील दर ५० मलेरियाच्या रुग्णांपैकी एक रुग्ण हा अजूनही गावठी वनस्पतीपासून निघणारे औषध वापरतो . झाडांच्या विविध प्रकारच्या जवळपास १४० फॅमिली मधील १२०० निरनिराळ्या तऱ्हेच्या झाडांपासून तयार होणारी औषधे मलेरिया विरुद्ध जगभर वापरली जातात .
१ ९ ४३ मध्ये एका जर्मन औषध कंपनीने क्लोरोक्वीन हे पूर्णत : रासायनिक द्रव्ये वापरून औषध तयार केले . पुढे १० ते १५ वर्षे या एकमेव औषधाने मुसंडी मारली . परंतु त्याच्या बेसुमार वापरामुळे P. Falaciparum विरुद्ध त्याची परिणामकारकता कमी होऊ लागली .
१९६० मध्ये थायलंड , कंबोडिया येथे Falciparum परोपजीवांचा Resistant strain मिळाला , ज्याला क्लोरोक्वीन रेझिस्टंट असेही म्हणतात . या विशिष्ट परोपजीवांचा पुढे दक्षिणपूर्व आशियात प्रसार झाला .
१९७३ मध्ये आसाममधील कार्बी अँगलाँग जिल्ह्यात या क्लोरोक्वीन रेझिस्टंट स्ट्रेनचे
(Chloroquin Resistant strain ) अस्तित्व लक्षात आले .
१९५० सालापासून दर दशकात नवीन औषधांची भर पडत आहे . आजमितीला खालील औषधे मलेरियाकरिता उपलब्ध आहेत .
औषधांची यादी व त्याच्यासमोर ती कोणत्या Brand Name ने बाजारात उपलब्ध आहेत ह्यांची नावे दिलेली आहेत . औषधे बनविणाऱ्या अनेक कंपन्या असल्याने सर्वच्या सर्व ब्रँड नेम देणे शक्य नाही . ही औषधे बाजारात गोळ्या , द्रवरूप डोस अथवा इंन्जेक्शन या स्वरूपात मिळतात .
Generic Name Brand Name
1 ) Quinine Cinkona , Kunen , Malgo 300 ,
Quinarsol , Quinine
2 ) Chloroquine Lariago , Chloroquine
phosphate , Emquin , Rimoquin, Resochin
3 ) Amodiaquine Basoquin, Camoquin
4 ) Primaquine Malirid
5 ) Proquanil
6 ) Mepacrine
7 ) Artesunate Falcigo, Larinate, RTsun (combikit)
8 ) Bulaquine Aablaquin
9 ) Mefloquine Confal, Facital, Mefax, Mefloc
10 ) Artemether Larither, Paluther
11 ) Pyrimethamine Croydoxin, Loridox, Rimodar
and Sulphodoxine
12 ) A – B Arteether Duther, Reether
13 ) Doxycycline
14 ) Erythromycin
अशा प्रभावी औषधांमधून योग्य औषध निवडणे , ती औषधे गोळ्या , इन्जेक्शन , द्रवरूप डोस वा शिरेमार्फत देणे तसेच दोन निरनिराळ्या गटांची औषधे एकत्रित Combination Therapy देणे , हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरविणे अत्यंत आवश्यक आहे काही औषधांमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात . या सर्व विषयाची व्याप्ती फार मोठी असल्याने यासंबंधी अधिक विवेचन केलेले नाही . इतकी प्रभावी औषधे हाती असताना सुद्धा काही वेळा ताप आटोक्यात येत नाही . त्यातील काही समस्यांचा आढावा येथे घेतला आहे .
१ ) औषधांना प्रतिसाद न देणारे परोपजीवी ( Resistant strains of parasites ) व्यवस्थितपणे औषधांचा डोस देऊन सुद्धा जिवंत राहतात व त्यांची वाढ रोखण्यात अपयश येते . एका विशिष्ट मर्यादेच्या वर औषधांचा डोस वाढविणे शक्य नसते . परोपजीवांच्या जनुकात होणारा बदल , व बदललेल्या जनुकांची अमर्याद होणारी वाढ याचबरोबर परोपजीवांमधील औषधांना प्रतिसाद देण्याची नकारात्मकता यामुळे औषधांची मारकता कमी होताना दिसते .
२ ) उलटणारा मलेरियाचा ताप हा शरीरात प्रथम शिरलेल्या परोपजीवांमुळेच होत असतो याचे मुख्य कारण असे की सर्व परोपजीवी रक्तातून नाहिसे झालेले नसतात . यासाठी औषधांचा अपुरा डोस अथवा त्यांचा अपुरा पडणारा प्रभाव कारणीभूत होतो . वारंवार येणारा मलेरियाचा ताप व परत परत डास चावल्याने होणारा मलेरिया या दोन्ही गोष्टी उलटणाऱ्या तापापेक्षा भिन्न आहेत .
३ ) परोपजीवांच्या एकूण संख्येमध्ये औषधाला दाद न देणाऱ्या परोपजीवांचे प्रमाण किती आहे व त्यांची एकत्रितपणे रोग पसरविण्याची क्षमता किती आहे , या परोपजीवांमधील गुणधर्माला Selection Pressure असे संबोधिले जाते . दाद न देणाऱ्या परोपजीवांची संख्या जेव्हा दाद देणाऱ्या परोपजीवांच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर Selection Pressure जास्त आहे असे मानतात . मलेरिया विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम कमी होण्याकडे , अथवा परिणाम मुळीच न होण्याकडे जात असलेला कल ( Trend of Resistance to various drugs ) गेल्या पन्नास वर्षात अनेक औषधांच्या संदर्भात चालूच आहे . या Resistance ( प्रतिकार शक्ती ) प्रक्रियेत खंड पडलेला नाही हे लक्षात आलेले आहे . या मागे अनेक कारणे आहेत .
गरज नसताना सरसकट प्रत्येक ताप मलेरिया समजून नवीन गटाची विविध औषधे वापरण्याकडे दिवसें दिवस कल वाढतो आहे . त्याचबरोबर रक्ताची परोपजीवांसाठी केलेली तपासणी नकारात्मक ( Negative ) असताना औषधे द्यावीत का नाहीत ठरविणे तितकेच कठीण आहे . प्रयोगशाळेच्या रक्त तपासणीची गुणवत्ता ( Quality Control ) चांगली राखणे तितकेच महत्त्वाचे ठरते . या जटील प्रश्नांचा गुंता सोडविणे काही वेळा फार कठीण असते .
जगातील काही गरीब देशांत कमी दर्जाची औषधे मिळत असल्याने रोग आटोक्यात येत नाही . अशा तऱ्हेच्या बनावट औषधे बनविणाऱ्या अनेक बोगस कंपन्या ही त्या देशांची डोकेदुखी आहे.
कुपोषणाने ग्रासलेल्या व AIDS झालेल्या रुग्णात मलेरियाचे परोपजीवी जास्त काळ ठाण मांडून बसतात . त्यामुळे औषधयोजना निराळी करावी लागते . Plasmodium Vivax झालेल्या रुग्णांना काही महिन्यांनंतर परत मलेरिया होण्याचा संभव असतो . त्याकरिता Primaquin या औषधाचा १५ दिवसांचा कोर्स घेण्याची गरज असते . परंतु हे औषध चालू करण्यापूर्वी रक्तातील G.6 PD ( Glucose 6 Phosphate dehydrogenase ) ह्या Enzyme ( विकर ) ची तपासणी करणे आवश्यक आहे . या Enzyme चे रक्तातील प्रमाण फार कमी असेल वा पूर्णपणे त्याचा अभाव असेल तर हे औषध देणे धोकादायक ठरते . पारशी सिंधी व काही मराठी पोटजातीतील काही लोकांमध्ये या Enzyme चा अभाव आढळतो .
मलेरिया प्रतिबंधक औषध उपचार
Drug Prophylaxis : जगामध्ये ज्या देशात मलेरिया अजिबात नाही अशा भागातील प्रवासी जेव्हा मलेरिया ग्रस्त देशात प्रवासास जातात , त्यावेळी त्या देशात पोहोचण्याच्या आधीपासून ते पुन्हा स्वत : च्या देशात परत आल्यानंतर काही दिवसांपर्यंत इतका काळ त्यांना मलेरिया प्रतिबंधक औषधे घेणे गरजेचे असते , या औषधपद्धतीला Chemoprophylaxis or Drug Prophylaxis असे म्हणतात .
मलेरिया ग्रस्त १०० देशांना जगभरातून १२५ दशलक्ष लोक प्रतिवर्षी भेट देत असतात . त्यापैकी ३०,००० लोकांना मलेरिया होतो . यासाठी कोणत्या देशातून प्रवास करताना कोणती औषधे घ्यावीत यासंबंधीत तक्ता W.H.O. तर्फे प्रसिद्ध होत असतो . काळाप्रमाणे औषधे बदलत असतात , त्यांची प्रवाश्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे .
ज्या देशांमध्ये मलेरिया कायमचा ठाण मांडून बसलेला आहे , तेथील लोकांनी अशी प्रतिबंधक औषधे घेतल्याने मलेरियावर प्रतिबंधकता येत नाही . परंतु काही तज्ञांच्या मते यापैकी काही औषधे बराच काळ घेतल्यास उपयोग होण्याची शक्यता असते . तरीसुद्धा गर्भवती स्त्रियांनी अशी औषधे घ्यावीत का हे त्यांच्या तज्ञ डॉक्टरने ठरवावे कारण औषधाचा गर्भावर कोणता परिणाम होईल किंवा नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे . अशी औषधे घेण्याने १०० टक्के प्रतिबंधता मिळेलच अशी खात्री नाही . अखेरीस मलेरियावरील लसीचा पर्याय हाच उपयोगी ठरेल अशी आशा वाटते .
आयुर्वेदिक औषधोपचार व मलेरिया
आयुर्वेदात ज्वराचा अभ्यास फार पुरातन कालापासून केला जात असे . ज्वराची मुदत व हुडहुडीचे प्रमाण यावरून ज्वराचे तीन प्रकार मानलेले आहेत . रोज येणारा ताप , तिसऱ्या व चौथ्या दिवशी येणारा ताप यानुसार येणाऱ्या ज्वराप्रमाणे औषधे ठरविली जात . तापाच्या प्रथम अवस्थेत भूक न लागणे , अंगमोडी , जिभेवर जमा होणारा पांढरा थर अशी लक्षणे असताना पूर्ण लंघन करावे , त्यामुळे प्रतिबंधकारक शक्ती वाढण्यास मदत होते . मलेरिया व तत्सम आजारात अनेक वनस्पतींपासून बनविलेले काढे , मात्रा , पावडरी वापरल्या जात .
सध्या प्रचलित असणारी औषधे आहेत . १ ) सुदर्शन गानवटी २ ) पंचतिकता घानवटी ३ ) नारायण ज्वरअंकुश ४ ) पिवली वर्धमान रसायन ५ ) Alstronine
अमेरिकेतील वॉल्टर रीड आर्मी संशोधन संस्थेत २०,००० वनस्पतींपासून बनविल्या जाणाऱ्या अर्कावर गेली १० वर्षे मलेरिया परोपजीवांपासून होणाऱ्या तापावर संशोधन चालू आहे . त्यातील २६ औषधे निवडलेली असून त्यांचा वापर करण्याबाबत प्रयत्न चालू आहेत . यामधील Alstonia Scholaris वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधात मलेरिया परोपजीवांविरुद्ध चांगले गुण असल्याचे लक्षात आले आहे . वनस्पतींपासून तयार केली जाणारी औषधे कमी किमतीत मिळण्याची शक्यता असल्याने गरीब देशात त्यांचा भरपूर उपयोग करता येईल . परंतु अजून ही औषधे बाजारपेठेत येण्यास बऱ्याच निकषांची गरज आहे .
Leave a Reply