मलेरिया व बर्किट लिम्फोमा – ( एक प्रकारचा कॅन्सर ) यांचा संबंध
बर्किट लिम्फोमा हा एक प्रकारचा जबड्याच्या खालच्या बाजूचा कॅन्सर असून तो अफ्रिकेत व मुख्यतः लहान मुलांमध्ये ९ ते १२ वर्षे या वयोगटात आढळतो . आता जगातील दुसऱ्या काही भागातूनही अशा केसेस नोंदल्या गेल्या आहेत .
प्रसिद्ध सर्जन डॉ . बर्किट व त्यांचे दोन सहकारी डॉ . क्लीफ नेल्सन व डॉ . टेड विल्यम यांनी अफ्रिकेत १० आठवड्यामध्ये १०,००० मैलाचा प्रवास केला व ५७ हॉस्पिटलस्ना प्रत्यक्ष भेट दिली . साधारण १ ९ ६० सालाच्या सुमारास हा सर्व प्रवास त्यांनी २०३५ डॉलर्स खर्चून केला . यामधून निष्कर्ष असा निघाला की बर्किट लिम्फोमाची भौगोलिक स्तरावरील उपस्थिती ही मलेरिया रोगाच्या भौगोलिक विभागातील उपस्थितीशी तंतोतंत जुळणारी होती . हा लिम्फोमा एखाद्या विषाणूमुळे होत असावा व त्यासाठी डास त्याचा वाहक असावा असे वाटत होते . विविध प्राण्यांमध्ये विषाणूंमुळे कर्करोग होतो हे सिद्ध झालेले आहे . परंतु माणसांतही विषाणू हे कर्करोग निर्माण करू शकतात हे सिद्ध झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली होती . १ ९ ६४ मध्ये Epstein व Barr यांनी या कॅन्सरच्या गाठींमधून विषाणू अलग केला .
याठिकाणी मलेरियाचा संबंध असा आला की सतत होणाऱ्या मलेरियामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व त्यामुळे संरक्षण देणाऱ्या T. Lymphocytes निष्प्रभ ठरतात . T. Lymphocytes ची अनियंत्रित वाढ झाल्याने बर्किट लिम्फोमा होतो . तसेच मलेरियाचे परोपजीवी CIDRI नावाचे प्रथिन तयार करतात ज्यामुळे Ebstein Barr Virus वाढण्यास मदत होते . हे विषाणू T. Lymphocytes ची अनियंत्रित वाढ घडवितात व त्यामुळे लिम्फोमा होतो . या परिस्थितीत E B Virus मलेरिया व बर्किट लिम्फोमा असे संगनमत घडून येते .
अर्थात प्रत्येक मलेरिया रुग्णाला हा कर्करोग होण्याची अजिबात शक्यता नाही .
अफ्रिकेतील एक अनुभव
अफ्रिकेतील काही भागात एका विशिष्ट प्रकारच्या परोपजीवांमुळे ( Onchocer ciasis , River blindness ) हा डोळ्याचा रोग होतो . त्यासाठी Ivermectin or Mectizan हे प्रभावी औषध दिले जाते . असे आढळून आले आहे की हे औषध घेतलेल्या रुग्णांना ज्यावेळी डास चावतात तेव्हा ते डास लवकर मरतात . यावरून काही शास्त्रज्ञांना असे वाटते की हे औषध माणसाला दिल्यास ते डासांसाठी मृत्यूला कारण ठरू शकेल . साधारणत : नवीनच तयार ( young ) झालेल्या डासांमध्ये मलेरियाच्या परोपजीवींची पुरेशी वाढ झालेली नसते परंतु या परोपजीवींची पूर्णपणे वाढ होऊन परिपक्व ( old ) झालेल्या डासांकडून मलेरिया रोगाचा प्रसार होण्यास जास्त मदत होते . अशा औषधाने डासांचे आर्युमान कमी केल्यास मलेरिया प्रसारावर आळा घालता येईल .
ह्या अचाट प्रयोगात कायम स्वरुपाचे यश मिळविण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत . हे औषध सरसकट सर्वांना देणे कितपत योग्य ठरेल याबाबत शास्त्रज्ञ साशंक आहेत .
मनुष्य घेतो गोळी -डास घेतो चावा आणि मृत्यु होतो डासाचा !
( From The American Journal of tropical Medicine July 2011 , Quote Indian Express -13/07/2011 )
दुर्गंधित मोज्यांचा मलेरिया या रोगाच्या निर्मूलनासाठी होणारा उपयोग
एखाद्या उघड्या जागेवर वापरलेल्या जुन्या मोज्यांचा ढीग करून त्यातून निघणाऱ्या दुर्गंधाकडे डास आकर्षिले जातात असे आढळून आले आहे . अशा तऱ्हेने फसवणूक करून ह्या डासांना एकत्रित केल्यानंतर त्यांच्यावर डासांसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी रसायनाचा फवारा मारल्यास ते डास मरतात . अशा आकर्षण पद्धतीने डास एकत्रित होण्याचे प्रमाण वाढविता येते असा दावा टांझानिया इफाकारा संस्थेचे प्रमूख डॉ . फ्रेड्रॉस ओकुमु यांनी केला आहे .
प्रगत देशात मलेरियाचे प्रमाण कमी होत आहे परंतु विकसनशील देशात हे प्रमाण वाढतच आहे . डच वैज्ञानिक डॉ . बार्ट नोल्स यांनी प्रथम वरील सिद्धांत मांडला . ते स्वतः एका काळोख्या खोलीत नग्नावस्थेत उभे राहिले व त्यांनी दाखवून दिले की डास पायाच्या वासाकडे सर्वांत जास्त आकर्षिले जातात .
ओकुमु यांनी आठ रसायने एकत्रित करून पायमोज्यांना येणाऱ्या वासासारखे रसायन तयार केले आहे . शिवाय डासांना मारण्यास योग्य असे विषारी द्रव्यही प्रयोगशाळेत बनविले आहे . त्यांचा दावा आहे की ९ ५ टक्के डास या पद्धतीने मरतात . या संशोधनासाठी डॉ . ओकुमु यांना बिल गेट फाऊंडेशन कडून आठ लाख अमेरिकन डॉलर्सची भरघोस मदत मिळालेली आहे .
हे रासायनिक सापळे माणसांच्या घरांच्या फार जवळ ठेवणे योग्य नाही कारण तेथे आकर्षित झालेले डास माणसांनाही चावण्याची शक्यता जास्त असेल . त्याचप्रमाणे ते मनुष्य वस्त्यांपासून फार दूर ठेवले तरी तेथे फारसे डासांचे वास्तव्य नसल्याने प्रयोग उपयोगी ठरणार नाही . आज या रासायनिक सापळ्यांची किंमत ४ ते २० डॉलर्सच्या दरम्यान आहे . मानवी जीवन वाचविण्यासाठी ही दुर्गंधीयुक्त मोज्यांची योजना कितपत यशस्वी होऊ शकेल असा प्रश्न शास्त्रज्ञांपुढे आहे .
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply