पावसाळ्याच्या शिडकाव्यामुळे समाजमाध्यमेही ओली झाली आहेत.
बासुदांच्या निधनानंतर श्रद्धांजलीच्या पोस्ट्समध्ये लताच्या आवाजातील “रिमझिम गिरे सावन ” नव्याने ऐकलं. मी पाहिलेल्या “मंझिल ” च्या प्रतीत ते समाविष्ट नव्हतं, पण बहुधा या खूप वर्ष रखडलेल्या चित्रपटातील एडिटिंग मध्ये ते उडवलं असण्याची शक्यता आहे.
“मंझिल” ची आमची आठवण म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीचा अमिताभ -मौशुमीचा पाठलाग ! दोघेही एकाच ठिकाणी निघालेत -दोघांनाही उशीर झालेला ! पण हा लांब ढांगा टाकत पुढे निघून जातो. परफॉर्मर तोच असतो ना मैफिलीतील ! आणि मग किशोरच्या आवाजातील “रिमझिम गिरे सावन” ! यथावकाश तीही तेथेच येणार असल्याने मैफिलीत पोहोचते. तोवर या महाशयांची तंद्री लागलेली – तिच्या येण्याची फारशी नोंद तो घेत नाही आणि आपण तर नाहीच नाही. ! एकतर अमिताभ -दुर्मिळ पोशाखात, तेही गायकाच्या रूपात आणि सोबतीला रुहानी किशोर ! लग्नाची पार्टी बहारदार होऊन जाते.
हे गीत किशोर तब्येतीने गायलाय – स्वतःत बेभान होऊन ! सोबतीला “सूर “सेन आर्डी ! पाऊस नसताना ओलाचिंब अनुभव घेतला किशोरच्या आवाजात. (त्याचा असाच मूड लागला होता- ” आनेवाला पल,जानेवाला हैं ” च्यावेळी . पुन्हा यावेळी तोच आर्त ओला आर्डी !) खरंतर लग्नाच्या मैफिलीत हे शब्द-सूर अस्थानी पण आजही “रिमझिम ” म्हटलं की फक्त हळवा किशोर – आतवर घर करत जाणारा . त्याला पर्याय नाही.
लताच्या गाण्यासाठी ओलीचिंब मुंबई, दुथडी भरून वाहणारी वाहने, रस्त्याच्या पाण्यातील डबक्यात पाय मारणारी मौशुमी, कोपऱ्यात पार्श्वभूमी पुरविणारा आणि भर पावसातही मर्यादा न ओलांडणारा दरिया . मनसोक्त पावसात भिजणारे अमिताभ-मौशुमी . प्रेमाच्या अभिव्यक्तीला किती फिट्ट फ्रेम !
तरीही ते उणं वाटलं किशोरच्या तुलनेत ! खूप घाईघाईत गायल्या सारखं, बहुधा पावसानंतरच्या थंडीची भीती वाटून उरकल्यासारखं ! भिजायच्या आत संपलं .आम्ही कोरडेच ! मजा नहीं आया !!
अशीच एक मेल-फिमेल व्हर्जन्ची आठवण-
” कुदरत ” मध्ये खन्नासाठी किशोरने काय कातिल स्वर लावलाय – ” हमें तुमसे प्यार कितना ! ” संपूच नये गाणं असं वाटतं. रोमान्स आणि पुन्हा योगायोगाने आर्डी ! हेमासाठी हे गाणं असल्याने किशोर आणि खन्ना दोघेही मनापासून परफॉर्म करताहेत असं वाटलं. सांगलीच्या त्रिमूर्ती चित्रपट गृहात हा अनुभव घेतला. त्याच गीताच्या फिमेल व्हर्शन साठी बेगम परवीन सुलताना यांची आर्डीने निवड केली. त्याआधी त्यांना कधीच ऐकलं नव्हतं. बैठकीच्या प्रसंगासाठी अरुणा इराणीने पडद्यावर अदाकारी केलेलं हे गीत ऐकल्यावरही भावलं नाही आणि आजही किशोरच्या व्हर्शनसमोर उणं वाटतं. उगाच शास्त्रोक्त सुरावट ( प्रयोग म्हणून आणि प्रसंगाची गरज म्हणूनही असेल कदाचित ) आणि तीही अस्थानी वाटली.
गाण्यातल्या शब्दांना फक्त किशोरची चाल जुळते. स्वतंत्र गाणं म्हणून ते चांगलं असेलही ( कारण त्यावर्षी चक्क त्याला फिल्मफेअरचं बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचं पारितोषिक मिळालं होतं. गम्मत म्हणजे किशोर व्हर्शन बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरसाठी नॉमिनेट झालं असलं तरी विजयी होऊ शकलं नव्हतं. )
पण मला या दोन्ही गाण्यांची मेल व्हर्शनच आवडतात – फिमेल नाही.
किशोर,आरडी रॉक्स !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply