नवीन लेखन...

मालिका मल्लिका (कथा)

दैनिक ‘रोजची पहाट’चे संपादक सूर्याजीराव रविसांडे अत्यंत अस्वस्थ होते. त्यांचे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट दिवाळीची सुट्टी घेऊन जे गायब झाले होते ते अजूनही उगवलेले नव्हते. रोजची पहाट होत होती, पण काका नसल्यामुळे दूरदर्शन मालिकांवर विशेषांक काढायचे काम रखडलेल होते. प्रसिद्ध ‘दूरदर्शन मालिका’ लेखिका ज्यांना ‘मालिका मल्लिका’ म्हणत त्या कादंबरीबाई गुंडाळे यांची मुलाखत घ्यायचे काम काकांना दिले होते. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ तसे हे भरवशाचे काका, सूर्याजीरावांच्या काळजाचा ठोका चुकवित होते. त्यामुळेच ते बेचैन होते, तेवढ्यात काका आले.

“अहो काका, होतात कुठे?”

“साहेब, अहो आता वय झाले. ही मुलाखतींची धावपळ जमत नाही माझ्याचानं.

घरी बसूनही करमेना. जित्याची खोड म्हणतात ना तसे झाले. शेवटी आलो पुन्हा. आता लागतोच कामाला. त्या कादंबरीबाई गुंडाळेंची मुलाखत घ्यायची आहे ना? आजच टाकतो गुंडाळून!”

“अहो, पण त्यांची वेळ कधी घेतलीत?”

“आता येता येतानाच. त्या म्हणाल्या, तसा मला बिलकूल वेळ नसतो, पण तुम्ही इथे येऊन बसा. माझ्या कामात जसा वेळ मिळेल तशी मी देईन मुलाखत.

“अस्सं, म्हणजे ते, एक दिवस मुख्यमंत्र्यांच्या सहवासात तसं! अच्छा, ठीक आहे, मग गुंडाळा लवकर, म्हणजे लागा कामाला.”

“साहेब, तुम्हाला दुसरे काही बोलताच येत नाही का हो?”

“म्हणजे?”

“अहो, कधीही पाहा, लागा कामाला, एवढेच बोलता, माझा दोन महिन्यांचा पगार नाही. माझी रोजची पहाट चहाबिना साजरी करतो, त्याचे बोला काहीतरी.”

“बरं बरं. संध्याकाळी घेऊन जा पण आता लागा कामाला.” सूर्याजीरावांच्या चेहऱ्यावर काकांना पाहताच जे तेज आले होते ते पगाराचे नाव काढताच सूर्यास्त झाल्यासारखे काळवंडले. पण काकाही काही कमी नव्हते. ते तसेच त्यांच्यापुढे बसून राहिले. त्यांचा डाव ओळखून सूर्याजीरावांनी दोन कटिंग चहाची ऑर्डर दिली. चहा ढोसल्याशिवाय काकांची गाडी रुळावर येणार नाही हे ते ओळखून होते.

काकांनी फुर्र, फुर्र करून चहा घेतला, मिशा साफ केल्या आणि निघाले ते थेट गुंडाळेबाईंच्या घरीच!

गुंडाळेबाई कागदांच्या भेंडोळ्यांच्या गराड्यात बसल्या होत्या. एक भेंडोळे मांडीवर घेऊन त्यावर भराभर मजकूर खरडत होत्या. त्यांनी काकांकडे हसून पाहिले. मानेनेच बसा म्हणाल्या. थोड्या वेळाने मान वर करून म्हणाल्या,

“नमस्कार काका. ते बघा तिकडे दोन थर्मास आहेत. पांढऱ्यात चहा आहे, लालमध्ये कॉफी आहे. पीज तुम्हाला हवे ते घ्या. सॉरी मला एवढा सीन लगेच संपवायचाय.”

“कादंबरीबाई तुम्ही कामात दिसता, परत येऊ का?”

“छे, छे, काका इथे वेळ आहे कोणाला? माझे काम तर हे असेच चालू राहणार.

तुम्ही चहा, कॉफ घ्या आणि विचारा तुमचे प्रश्न. मी काम करता करता उत्तरे देते.”

काकांनी चहा घेतला. एक कप त्यांनाही दिला. त्या थेंक्स म्हणाल्या. काकांनी प्रश्न विचारला,

“कादंबरीबाई, सध्या दूरदर्शनवर आपल्या ‘अवघेची बिहाड’, ‘वेड लागे कुणाला’, ‘पळा सुखांनो पळा’, ‘अद्भुत करणी’, ‘राणीसाहेब’, ‘न संपणारी कहाणी’ अशा मालिका धडाक्यात चालू आहेत. इतके विविध प्रकारचे लेखन एकाच वेळी, चार-चार, पाच-पाच मालिकांचे, तेही रोज तुम्हाला कसे जमते?”

“काका, तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला काय सांगायचे? वाचकांना रोज काही तरी चमचमीत द्यावे लागते हे तुम्ही जाणता. एकदा पाण्यात पडलं की, पोहायलाच पाहिजे नाहीतर मरण.”

“हो. खरे आहे तरी पण रोजच्या प्रसंगाचा शेवट करताना उद्याची उत्सुकता ठेवायची हे सोपे नाही. ते तुम्ही कसे करता?”

“काका, मुळातच एखादी कथा निर्मात्याने स्वीकारली की तिचा आरंभ मला ठाऊक असतो पण तिचा शेवट हा माझ्याही हाती नसतो किंवा तो कसा होणार हे ठाऊक नसते.”

“काय म्हणता? खरंच?”

“काका, एखादी कथा दिवसेंदिवस, महिनोंन महिने चालू ठेवायची हे तंत्र सांभाळता सांभाळता माझी मूळ कथा काय होती? आता आपण कुठे आहोत? कुठे थांबायचे? याचे भान ठेवणे मुश्कील होते. शिवाय एकाच वेळी अनेक मालिकांचे लेखन करताना ह्याचे त्यात, त्याचे ह्यात होण्याची शक्यता असते.”

“मग ते आपण कसे जमवता?”

“ते आमचे निर्माते, दिग्दर्शक जमवतात.”

“ते कसे?”

“रोज त्यांचे फोन येतात. एकेका आठवड्याचे प्रसंग आगाऊ द्यावे लागतात. शिवाय मधेच एखादा कलाकार गायब होतो, आजारी पडतो, चांगली ऑफर आली तर सोडतो, असे एकना दोन अनेक अडथळे येतात.”

इतक्यात त्यांचा फोन वाजतो. त्या उचलतात.

“हॅलो, हा कोण राघवजी? बोला. कसं काय चाललंय बि-हाड?”

“-–-–”

“काय? बाबामहाराज आजारी पडले? त्यांचा प्रवेश बदलून हवा? अहो हा

आताच तर मी तो लिहून पुरा केला, आता लगेच दुसरा?”

“—-”

“बरं बरं बदलते. बाबांचा प्रवेश परवा घेताय? ठीक. पण राघवजी, वहिनी आणि नणंद तरी आहेत का जागेवर? आहेत ना? मग त्यांचा किचनमधला डायलॉग टाकते. डोकेदुखी, बाम, आल्याचा चहा, खिचडी, पापड, लोणचं असा मसाला भरते. थोडी रडारड? हा चालेल ना? ठीक, मग पाठवा मोहनला, एका तासात तयार ठेवते. बाय!”

“काका, बघितलेत? तुम्ही आलात तेव्हा हा बाबांचा डायलॉग चालू होता, आता तो बदलून वहिनी-नणंदेचा देते.”

“मोठे कठीण काम दिसते!”

“हो, कठीण तर खरेच. पण दुसरा पर्याय नाही. त्यासाठी मी खूप नमुने करून ठेवलेत. प्रसंग पडेल तसा टाकते.’

“नमुने?”

“हो काका. म्हणजे घरगुती प्रसंग. ऑफिसमधले, कारखान्यातले, बागेतले, देवळातले, रात्री-बेरात्री घरी येणे, बेडरूम सीन, भावनोत्कट, डोळ्यात पाणी आणणारे, एकाचे-दोघांचे, अनेक पात्रांचे, हॉस्पिटल, हॉटेल, योगायोग, चुकामूक, सूड, सूडाच्या योजना, त्या ज्यांच्या विरोधात त्यांनी त्या न चुकता चोरून ऐकणे, विवाहपूर्व, विवाहबाह्य संबंध, दोन-दोन बायका, चार-चार नवरे, चकाचक घरे, जिथे कॅमेरामनला खूप स्कोप, असे एका ना अनेक.”

“तरी पण प्रसंगांची सांगड कशी घालता?”

“काका ती आपोआप घातली जाते. आता तुम्ही सांगा, तुम्ही दोन दिवसांपूर्वी काय केले? तुमची दिनचर्या, काय खाल्ले? कोण भेटले, कुठे गेला? कुणाचे फोन आले? सांगा काही आठवते?”

“नाही आठवत बुवा.”

“नाही ना? अहो मग मालिकांचेही तसेच असते. मागचा प्रसंग पुढे न्यायचा, फार मागे जायचे नाही. पुढे मागे ते प्रसंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बँक ड्रॉपला घ्यायचे. मालिकेचे गाडे आपोआप पुढे सरकते.”

“तरी पण कौशाल्याचेच काम आहे.”

“हो पण त्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवावे लागते.”

“ते काय?”

“मालिकेसाठी अगदी अप टू डेट पॉश बंगला, घर, फॅट, लोकेशन हवे. नटनट्या चकाचक कपड्यात, गुलाबी मेकप, क्लोजअपमध्ये एकही सुरकती चालणार नाही. घरात, बाहेर कुठेही नव्याकोऱ्या फॅशनेबल साड्यांत, कपड्यांत, दागदागिन्यांत हव्यात. म्हातारा-म्हातारी पण गुटगुटीत, आई-मुलगी, सून सारखीच फक्त केसात पांढऱ्या रंगाचे फराटे, शिवाय मुख्य नट-नटीवर सतत अन्याय, जुलूम, जबरदस्ती होताना दाखवायचे. त्यांना त्यांच्या चांगुलपणाचा कधीही फायदा मिळू द्यायचा नाही. सतत दुःखाचे डोंगरच्या डोंगर त्यांच्यावर कोसळवायचे. तीन-तीन चार-चार वेळा त्यांना अतिदक्षता विभागात टाकायचे. मरणाच्या दारातून ओढून काढायचे. बाकी इतर पात्रं मात्र मौजमजा करताना दाखवायची म्हणजे मालिकेचा प्रेक्षक दर्जा म्हणजे टी.आर.पी. चांगला मिळतो.”

“वा, वा! गुंडाळेबाई मालिकेची नस आपल्याला चांगलीच सापडली म्हणायची.”

“हो काका, अहो शेवटी या मालिकांची वेळ आणि त्या बघणारे प्रेक्षक यांचा विचार करून लिहावे लागते.”

“तो आपण कसा करता?”

“काका, या मालिकांची वेळ दुपारी, संध्याकाळी, रात्री जेवणाचे वेळी असते. त्यावेळी घरात कोण असते? निवृत्त मंडळी, गृहिणी, नोकरचाकर, शाळा-कॉलेजातली पोरंपोरी, बहुतेक सगळी मध्यमवर्गीय, पापभीरू, देवभोळी असतात. व्यापारी, कष्टकरी, व्यावसायिक हे अशा मालिका पाहत नाहीत. या प्रेक्षकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लिहायचे.

“काय असतात त्यांच्या अपेक्षा?”

“काका निवृत्तांना वेळ घालवायचा असतो. गृहिणींना नव्या नव्या साडया, दागदागिने; उंची फर्निचर, चकाचक परिसर, भावनोत्कट प्रसंग, रडारड आवडते. सुनेवर अत्याचार, मत्सर, सूड यांचीपण आवड असते. भोळ्याभाबड्यांना फसवणे, देवपूजा, अंधश्रद्धा, कपाळीचा ललाट, नशिबाचा फेरा, अशी रेलचेल लागते. कॉलेजच्या पोरांना चंगळवाद, हॉटेलिंग, फॅशन, जुन्या पिढीला नावे ठेवणे, दिवास्वप्ने पहाणे, आंधळे प्रेम, चालीरीती, रीतीरिवाज यांना ठोकरण्याची गुर्मी, संकट आले की देवळात जाऊन देवाला साकडे घालणे असा मसाला लागतो. खून, मारामाऱ्या, सूड भावतो, अशा मालिका लोकप्रिय होतात.”

“वा, गुंडाळेबाई, तुमचा मार्केटचा अभ्यास दांडगा दिसतो. मग यासाठीही तुमच्याकडे काही नमुने असतीलच.”

“हो आहेत ना. अगदी हमखास यशस्वी.’

“असं? काय असतात हे नमुने?”

“काका तसे खूप आहेत. किती म्हणून सांगू? पण एक सांगते नमुन्यादाखल प्रमुख नट किंवा नटीला अपघाताने, मारामारीने, खुनाच्या प्रयत्नाने हॉस्पिटलमधे पाठवायचे. जिथे आई, वडील, काका, काकू, मामा, मामी, बहीण, भाऊ, मैत्रीण, बायको असे प्रसंगानुरूप गोळा करायचे. कथेच्या मागणीनुसार डायलॉग टाकायचे, सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा कॅमेरा फिरवायचा. प्रचंड काळजी, देवाचा धावा, पूजा अशी धमाल उडवायची. डॉक्टरला मात्र एकच डायलॉग द्यायचा, आम्ही सर्व प्रयत्न करतो आहोत, पण यश येणे नयेणे हे सर्व त्या परमेश्वराच्या हाती. पेशंट खूप सीरियस आहे, पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत. ते काढले की, मग काही काळजी नाही. मग देवळात प्रार्थना, घरी देवघरासमोर प्रार्थना वगैरे मालमसाला. सीन आणखी मसालेदार करायला हॉस्पिटलमध्ये खुनी पाठवायचा. अपघातातून, खुनातून वाचवायचा, घरी आणायचा आणि घरी येतो न तो घरी पोलीस इन्स्पेक्टर त्याला अटक करायला हजर करायचा. त्या हिरोला किवा हिरॉइनला क्षणाचीही उसंत द्यायची नाही. अशाच प्रकारे बाबा, बुवा प्रकट करायचे. योगायोगाची बरसात करायची, पुनर्जन्म, पॅस्टिक सर्जरी, भूतप्रेत, ज्योतिष अशाच चटपटीत फोडण्या द्यायच्या की मंडळी खूश!”

“वा! वा! गुंडाळेबाई, मनुष्य स्वभावाचा आपल्या अभ्यास दांडगा दिसतो.’

“काका, तोच तर आमचा धंदा.”

“धंदा? म्हणजे हे साहित्य नसते का?”

“काका, हे पण साहित्यच. पण हे पुस्तकातून वाचायचे नसते तर प्रत्यक्ष बघायचे असते. शिवाय लोकांना दुःखसुद्धा चकचकीत, झगमगाटात, रंगीबेरंगी वातावरणात, पंचतारांकित घरात बघायला आवडते. तेवढे मी सांभाळते. आम्ही लोकांना स्वप्ने विकतो. ती पण चमचमीत, चकचकीत, दिमाखदार.”

“वा, मालिका लेखन नसून ते दर्शनही असावे लागते हे तुम्ही छान पटवलेत.”

“होय काय, म्हणून त्याला दूरदर्शन म्हणायचे. पण खरे तर ते जवळ बसून बघायचे असते. हे मालिका लेखन एक अफलातून रसायन आहे. त्यात तेच तेच आले तरी त्यात नावीन्य आणावे लागते. म्हणजे इंग्रजीत म्हणतात ना, ओल्ड वाइन इन न्यू बॉटल! तसे.”

“गुंडाळेबाई, तुमच्या यशस्वितेचे रहस्य फार उत्तम त-हेने पटवलेत.”

“काका, त्यात रहस्य वगैरे काही नाही. ही एक मायावी दुनिया आहे. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणे महत्त्वाचे.”

“खरे आहे मॅडम. पण त्यासाठी आपण फार तडजोडी करतो, अनैतिक, अनैसर्गिक गोष्टींचे उदात्तीकरण करतो असे नाही का वाटत आपल्याला?”

“काका आजूबाजूच्या समाजावर दृष्टी टाका, ते पाहिलेत तर आम्ही काय दाखवतो ते फार बरे असे वाटेल तुम्हाला. शिवाय हे सर्व काल्पनिक असते, त्याच्याकडे करमणूक म्हणून पाहायचे असते.’

“मॅडम, करमणूक म्हणून ठीक आहे. पण त्यातूनच काही चुकीचे संदेश आपण देतो असे नाही वाटत?”

“चुकीचे संदेश? ते कोणते?”

“म्हणजे अंधश्रद्धा, चंगळवाद, अनैतिकता वगैरे.”

“काका, अंधश्रद्धा, चंगळवाद हेच सध्याचे मोठे मार्केट आहे. दूरदर्शन मालिका या दूरदर्शन प्रतिसाद निर्देशांकावर म्हणजे टी आर पी वर चालतात. लोकांना चांगल्या का वाईट मार्गावर न्यायचा मक्ता काय आम्ही घेतला आहे का? रीमोट तुमच्या हातात आहे. काय पाहायचे. काय नाही पाहायचे हे तुम्हीच ठरवणार ना?”

“हो तेही खरेच.”

“मग झाले तर. काका या आता. माझी सूक्ष्मात जायची वेळ झाली.”

“सूक्ष्मात जायची म्हणजे?”

“काका एवढे सतत लिहून लिहून माझा मेंदू बधिर होतो. शेवटी मीही एक लेखिका आहे. कुठेतरी मलाही संवेदना आहे. आपण मांडलाय तो बाजार आहे याची जाणीव होते तेव्हा थकायला होते. म्हणून दिवसांतून एखादा तास तरी मी शांतपणे बसते. चित्त एकाग्र करते. पण या धंद्यात जास्त भावनाप्रधान असून भागत नाही. बरं या आता आणि हा शेवटचा संवाद फक्त आपल्या दोघांतच बरं का, मुलाखतीसाठी नाही. कळलं?”

“हो मॅडम, नमस्कार. येतो.”

“या.”

— विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..