नवीन लेखन...

ग्वाल्हेर घराण्याच्या जेष्ठ गायिका मालिनी राजुरकर

मालिनीताई राजुरकर यांचा जन्म ७ जानेवारी १९४१ अजमेर येथे झाला.  मालिनीताई राजुरकर या माहेरच्या प्रभा वैद्य. त्यांचे घराणे मूळचे इंदूरचे असले तरी त्यांच्या वडिलांचे नोकरीनिमित्त वास्तव्य अजमेर येथे होते. त्यामुळे मालिनीताईंचे सर्व शिक्षण अजमेर येथेच पार पडले. त्यावेळी अजमेर येथे शाळेमध्ये संगीत शिक्षण सक्तीचे होते. त्यामुळे शाळेतील संगीताचा तासाला जे संगीत कानावर पडे तेव्हढाच त्यांचा गाण्याचा संबंध येत असे.

त्यांच्या एकूण जडणघडणीवर त्यांचे काका गंगाधर वैद्य यांचा फार प्रभाव होता, काका व वडील या दोघांना नाट्यसंगीताची फार आवड होती. त्यांच्या आईना उत्तम स्वरज्ञान होते व त्या भजन, पंचपदी व त्रिपदी वगैरे म्हणत असत. त्यामुळे घरात संगीत प्रिय वातावरण होते. त्यावेळी मालिनीताईंना वयोमानाने सिनेसंगीत आवडत असे. पण त्याला मात्र वडील व काकांचा विरोध होता. त्यावेळी बाहेर ही गाण्याचे फारसे वातावरण नव्हते.

गणपती उत्सवात कधी तरी गाणे ऐकावयास मिळत असे. मध्यमवर्गीय विचारधारणेनुसार त्यांना संगीता पेक्षा गणितात प्रावीण्य मिळवण्याची इच्छा होती. तथापि वडील व काका यांच्या इच्छेमुळे त्या गाण्याकडे वळल्या. त्यांच्या प्रेरणेने त्या संगीताकडे गांभीर्याने पाहू लागल्या व तेच त्यांनी जीवित ध्येय मानले. अजमेर संगीत विद्यालयाचे प्राचार्य पं. गोविंदराव राजुरकर हे मालिनीताईचे प्रथम गुरु होते, त्यांनी आपले संगीत शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. राजाभाऊ पूछवाले यांच्याकडे घेतले होते. ते एक उत्कृष्ट शिक्षक होते.

मालिनीताईंना त्यांच्या रूपाने एक उत्कृष्ट मार्गदर्शक लाभला. पं. राजुरकर यांच्याकडील शिक्षणा मुळे त्यांना भारत सरकारची संगीत निपुण ही पदवी मिळाली. त्यांनी १९६० साली गणित हा विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) ही पदवी ही मिळवली. गणितामध्ये एम.एस.सी करावे अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. त्याचवेळी त्यांना राजस्थान संगीत अकादमीच्या संगीत स्पर्धेत भाग घेतल्याने २ वर्षाची स्कॉलरशिप मिळाली.

१९६४ साली वयाच्या २२ व्या वर्षी अजमेरच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणपती उत्सवामध्ये गाऊन त्यांनी आपल्या जाहीर मैफिलींना सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांचे गुरु पं. गोविंदराव राजुरकर यांचे पुतणे श्री. वसंतराव राजुरकर यांच्याबरोबर त्या विवाहबद्ध झाल्या. वसंतराव
राजुरकर हे ही संगीतप्रेमी होते आणि त्यांचे काका पं. गोविंदराव राजुरकर यांच्याकडून त्यांनी संगीत शिक्षण घेतले होते. ते त्या वेळी अजमेर म्युझिक कॉलेज मध्ये अध्यापन करीत होते.

मालिनीताई या गोविंदराव राजुरकर यांच्या आवडत्या शिष्या होत्या. त्यांनी मालिनीताईंना उत्तम संगीत शिक्षण दिले होते. पती वसंतराव राजुरकर हेही संगीत क्षेत्रातीलच असल्याने, त्यांनी ही सदैव मालिनीताईंच्या गायनास प्रोत्साहन दिले, इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून कठोर मेहनतही करून घेतली. सासरकडील सर्वच मंडळींनी आपल्या या सुनवाईच्यामधील उच सांगीतिक गुण ओळखले होते व ते नेहमीच मालिनीताईच्या पाठीशी उभे राहिले. विवाहबंधन हे मालिनीताईच्यासाठी सांगीतिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरले. विवाह व घन है मालिनीताईच्यासाठी सांगीतिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरले. तथापि, जरी सासरकडच्या लोकांचा गाण्यातील संपूर्ण करीअर करण्यासाठी पाटिया होता, तरी मालिनीताईंनी नेहमीच आपली गाण्याची आवड व प्रापंचिक जयाबदारी यांतील फरक ओळखला व दोन्ही बाबींना उचित न्याय देऊन, आपले वैवाहिक जीवन सौख्यदायक केले आहे.

या सर्वांमध्ये त्यांचे पती वसंतराव यांनी ही त्यांना उत्कृष्ट सहकार्य दिले आहे. स्वतःची सांगीतिक नजर वसंतराव यांचे सततचे मार्गदर्शन व कठोर परिश्रम यांनी त्या एक उत्कृष्ट गायिका बनल्या. त्यांना ठिकठिकाणाहून गाण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली व त्यांनी आपल्या गाण्याने रसिकांचे मन काबीज ही केले. त्यांच्या उल्लेखनीय मैफिली म्हणजे गुलबर्गा येथील डॉ.पत्की यांच्याकडे गंगूबाईंनी घडवून आणलेली बैठक, कोल्हापूरच्या मंगलधाममध्ये कागलकरबवा, बाबूराव जोशी यांच्या सारख्या संगीत तज्ज्ञांनी नावाजलेली मैफिल, हिराबाई यांच्या सत्कारा निमित्य सुरेल सभेने योजलेली पुण्यातील बैठक, या अनेक रसिकांच्या स्मरणात आहेत. मुंबईच्या दादर माटुंगा कल्चरल क्लबतर्फे झालेल्या त्यांच्या गाण्यामुळे त्या एक चतुरस्र गायिका आहेत हे सिद्ध केले. वयाच्या सव्विसाव्या वर्षीच त्यांना सवाई गंधर्व संगीत समारोहात गाण्याची संधी मिळाली होती, ही गोष्ट त्यांच्या गायनाची योग्यता सांगणारी आहे. संगीत प्रवाहातील उत्तमोत्तम घेत, त्याचा आपल्या गाण्यात समावेश करीत व सौंदर्यपूर्ण असे गाणे सादर करीत मालिनीताईंचा संगीत प्रवास आजही सुरू आहे व त्यांच्या गाण्याने संगीत रसिक आजही तृप्त होत आहेत. मालिनीताईंचा जन्म हिंदी भाषिक पट्ट्यातील अजमेर सारख्या ठिकाणी झाला. त्यामुळे त्यांच्यामध्ये हिंदी भाषेची उत्तम समज होती. गायनातील बंदिशी या बहुतांशी हिंदी भाषेतील असल्याने त्यांना त्याचा भावार्थ समजणे सोपे जात असे. त्याचप्रमाणे त्यांचे हिंदी शब्दांचे उच्चारणही योग्य होत अरे, याचा त्यांच्या गाण्याला अतिशय फायदा झाला व त्यांचे गाणे भावस बनले. मालिनीताईच्या गाण्यावर अनेक थोर गायक गायिकांच्या गायन शैलीचा परिणाम झाला.

रयनही जिणे जिणे चांगले दिसेल ते ते वेचून आपली वेगळी अशी समृद्ध गायकी निर्माण केली. या मध्ये त्यांची परिपाक अशी सांगीतिक जाण दिसून येते. गंगूबाई हनगलांशी त्यांचे मायलेकीचे नाते होते, गंगूवाईनी त्यांना गाण्याबरोबरच सुसंस्कृतरित्या कसे जगावे याचीही शिकवण दिली. त्यामुळे त्यांचे गाणे उमदे बनले. पं. भीमसेन जोशीसारख्या थोर गायकांनी त्यांना नेहमीच मदत करून प्रेरणा विली. पं.जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांना व्यापक दृष्टिकोन दिला. गाणं मोठं, समृद्ध करायचे हे पंडितजींनी त्यांना शिकवले. वसंतराव देशपांडेंच्या गाण्यातील फिरतीचे त्यांना खूप आकर्षण होते. तशी फिरत आपल्या गाण्यात त्यांनी आणली आहे. पं.गिंडे यांच्याकडून त्यांना लयी बाबतचे मोठेच मार्गदर्शन मिळाले. पं. कुमारांच्या गाण्यातील मॉड्युलेशन त्यांनी आपल्या गाण्यात आणून ग्वाल्हेर घराण्याची खडी गायकी भावाभिव्यक्तीमुख बनविली. त्यामुळे त्यांच्या गाण्यातील रंजकताचाजली. कुमारजी व किशोरीताईच्या गाण्यात जाणवणारी उत्स्फूर्तता व चैतन्यही त्याना आवडल्याने ते त्यांनी आपल्या गाण्यात उतरविले. त्यामुळे त्यांचे गाणे चतुरस्र बनले व त्या वैचारिकरित्या समृद्ध बनल्या. त्या चीजेची मांडणी ग्वाल्हेर पद्धतीने करतात. त्या आपल्या आवाजाच्या धर्माप्रमाणे फेरबदल करून स्वच्छ व सुबोध असा आलाप व विस्तार करतात. त्यांचा सूर लावण्यात एक आत्मविश्वास आहे. तालावर हिकमत आहे. समेवर येण्याचा एक सहजपणा त्यांच्या गाण्यात आहे. त्यांच्या गायनात अलंकार, वेगवेगळ्या हरकती, मुरक्या, दमदार व पल्लेदार ताना व वेगवेगळे पलटे दिसतात. संपूर्ण स्वच्छ म्हणता येईल एवढ्या लयीतच त्या तराणा गातात. खमाज, टप्पा व तराणे म्हणजे ग्वाल्हेर गायकीचा हुकमी एक्का आहे. बनारसी ढंगाचा, अस्सल ग्वाल्हेर गायकीचा टप्पा गाणाऱ्या त्या एकमेव गायिका आहेत. त्यांनी ग्वाल्हेर गायकीतील रुक्षपणा काढून त्यात आपल्या बुद्धीचा नवीन विचार मांडला आहे. बडे गुलाम अलींचा याद पियाकी आये न बालम सारख्या ठुमरी त्या सही सही गुलाम अली च्या अंगाने व ढंगाने मैफिलीत गात असत.

गंगूबाईच्या निकट सान्निध्यात राहून किराणा गायकीचाही असर त्यांच्या शैलीत आढळे. गंगूबाईची त्यांना मैफिलीत बोट धरून फिरविले आहे. त्यामुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास आला. याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. मालिनीताईंचे वैशिष्ट्य म्हणजेच टप्पा गाणाऱ्या ज्या मोजक्याच गायिका आहेत, त्यापैकी त्या एक आहेत. टप्पा हा गानप्रकार ख्याल वा ठुमरीपेक्षा वेगळा आहे. टप्पा गाण्यासाठी झेप टाकण्याप्रमाणे आवाजाचीच तडफ व तानांच्या झपाट्यामध्ये, ताल व तोल टिकविण्याचा सहजपणा असावा लागतो. ही खासियत काही प्रमाणात उपजत व काही प्रमाणात मेहनतीनेच साध्य होणारी गोष्ट आहे. त्यामुळे टप्पा गायन हे ख्याल किंवा ठुमरीप्रमाणे सर्वच गात नाहीत.

टप्प्यासाठी चपळ व लवचिक गळ्याची तयारी असावी लागते. त्यामध्ये उलट सुलट नागमोडी हरकती, गिटकड्या, झमझमे याचा उपयोग केला जातो. एकूण टप्प्यासाठी उत्तम दमसास, तानेची फीरत, लहाल लहान जलद ताना आणि महत्त्वाचे म्हणजे तयार गळा ही बलस्थाने असावी लागतात. ही टप्प्याची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून मालिनीताई टप्पा सादर करीत असत. उर्दू भाषिक प्रदेशातील वास्तव्यामुळे त्या भाषेचा लहेजाही त्यांच्या टप्प्यातून दिसत असे. त्याची अत्यंत गरज असल्याने मालिनीताईचे टप्पा गायन घरंदाज किंवा अस्सल वाटे. मालिनीताई राजुरकर यांनी अनेक मोठमोठ्या गायकांच्या गाण्यातील उत्तमोत्तम सौंदर्य आपल्या गाण्यामध्ये आणले व ग्वाल्हेर घराण्याची आपली गायकी अधिक समृद्ध बनवली. मालिनीताई राजुरकर यांचे पती पं. वसंतराव राजूरकर १२ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले होते. मालिनीताई राजुरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..