मन , बुद्धि , आणि सदगुण , सदाचार म्हणजे ईश्वराच्या साक्षात्काराचे केवळ अंशात्मक असे दर्शन आहे. या सर्वच विधायक गोष्टी जर माणसात एकत्र आल्या तर तो नुसता माणूस राहणार नाही. त्यात देवत्वाचा अंश निर्माण होईल.
जे जे चांगले आहे , सुंदर आहे , सत्य आहे , शाश्वत चिरंजीवी आहे तो एक ईश्वरी साक्षात्कार आहे.
माणसाची बाह्य सुस्वरुपता , सौंदर्य ही त्याच्या दिसण्यावर , किंवा त्याच्या व्यक्तिमत्वावर असते हे निर्विवाद पण या सुंदरतेतील जीवंतपणा सात्विक डोळ्यातून जाणवतो .
डोळे म्हणजे मनाचा आरसा..!!
मनाची निर्मलता म्हणजे ईश्वरियता
सर्वाप्रती केवळ कल्याणकारी भावनां…!!
हे मानवतेचे मूलतत्व आहे..असे माझे मत.
मानवी मनभावनां , बुद्धि , आत्मा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन आणि असे संगमी जीवन म्हणजे शाश्वत सुख..!!
मानवी मन अनाकलनिय आहे. म्हणुनच ” याच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही किंवा हा आतल्या गाठीचा आहे अशा प्रकारचे वाकप्रचार आपल्याला समाजात रूढ़ झालेले आढळून येतात.
तेंव्हा मानवी मनांचे अनेक कंगोरे आहेत. अनेक उपमांनी मनाला संबोधले आहे. विकारी मन साऱ्या षडरिपुंचे ते आगर आहे. तर सात्विक मनाला सद्गुणांची झालर आहे.
मन:शक्ती म्हणजे जाणीवपूर्वक विचार , स्मरणशक्ती ,भावनांची गुंफण , तर्क , कल्पना असे म्हणता येईल. या बुद्धिरूपी मेंदुच्या प्रेरणा आहेत. मन कधी सोज्वळ , संस्कारी वैचारिक सद्गुणांच प्रतीक आहे. कधी संथ जलाशय तर कधी आक्राळ विक्राळ लाटा उधळणाऱ्या महासागरासारखं देखील त्याच भयंकर असे रूप आहे. तर कधी राऊळ गाभाऱ्यातील तेवणाऱ्या मंद प्रसन्न ज्योती सारखं शांत रूप आहे. तर कधी धगधगता ज्वालाग्नी देखील आहे. याचा अनुभव आपल्याला येतो. मन चंचल आहे. चंचलता त्याचा स्थायी भाव आहे.-
मानवी शरीराला अनेक अवयवांनी दृष्य सुरुपता आलेली आहे . पण मन आणि बुद्धि जीवनाचे समतोल साधणारे प्रेरक असे अदृष्य निराकार अवयवच म्हणावे लागतील आणि ते आपल्या स्पंदनासोबत असतात हे वास्तव आहे. नीर क्षीर विवेक बुद्धिचे मूल्यांकन करण्याची क्षमता याच अदृष्य , निराकार अशा अवयवामध्ये आहे.
वर म्हटल्याप्रमाणे मन चंचल , सैरभैर , दिशाहीन स्वैर भरकटणारे बेकाबू जरी असले तरी वर म्हटल्या प्रमाणे आपले अंतर्मन म्हणजे एक बिलोरी आरसा असून ते मन आपल्याला कधीच फसवु शकत नाही.
आपल्या व्यक्तिमत्वाचं सत्य प्रतिबिंब हे आपल्या मनाच्या दर्पणात असतं..!!
नीरव शांततेत आपल्या मनाची ही विविध रूपं
म्हणजे आपण केलेले सत्कर्म , दुष्कर्म , पाप , पुण्य या साऱ्या चांगल्या , वाईट गोष्टी अगदी एखाद्या चलचित्रा प्रमाणे आपण सहज पहात असतो. म्हणुच आपले अंतर्मन आपल्याच जीवनातील प्रखर तेजस्वी सत्य कधी लपवू शकत नाही.
म्हणून तर जीवन एक रहस्य आहे असे म्हटले आहे आणि त्याचाच वेध घेण्यासाठी मन धावतं असतं.!!
ऋणानुबंधानं एकत्र आलेल्या व्यक्ती या मनानं अगदी निश्चित सन्निध असतीलच असं ठामपणे सांगता येत नाही. तिथे अंतरातिल भावभावनांच अव्यक्त गूढ असतं.!
अशा मनाच्या अवस्थेत मनाला विवेकी बुद्धिच सर्वारथाने सदैव सावरत असते.
म्हणूनच तर बुद्धि ही विवेकाधिष्ठ , वैचारिक , सतर्क , संस्कारी , कल्याणकारी मार्गदर्शक अशी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
मनाला सद्गति , सन्मति , योग्य तो सन्मार्ग दाखविणारी अशी शक्ती आहे. मन चंचल स्वैर मुक्त आहे . पण बुद्धि ही निर्णायक , अविचल ,निश्चयी आहे.
मानवी जीवनात या बुद्धी आणि मन यांचा सकारात्मक विवेकी संयोग , समतोल हा जीवनाच्या सात्विक सांगते साठी अत्यंत महत्वाचा आहे.
भारतीय प्राचिन सर्वच ग्रंथसंपदे मध्ये ” मन आणि बुद्धि ” याबाबत अनेक दृष्टांत देवून विवेचन केलेले आहे. मानवी नात्यांची , त्या नात्यातील सर्वच भावसंवेदनांची , सगुण , निर्गुण, दुर्गुण , स्वार्थ , निस्वार्थ , वात्सल्य , प्रेम , द्वेष , संघर्ष , आणि त्यातून अंतिम सत्य असणारा जीवनाचा अर्थ उलगडुन दाखविला आहे याचा प्रत्यय येतो.
मन निरंकुश सार्वभौमी राजासारखे वागत असते
मात्र त्यावर नियंत्रणी अंकुशाची गरज आहे . ती बुद्धि म्हणजेच आपला कार्यरत असणारा विवेकी मेंदूच अशा प्रकारचा अंकुश मनावर ठेवू शकतो. आणि मनाला अविवेका पासून सावरतो , जागृत करतो.
अशा मन आणि विवेकी बुद्धिचा साधर्मी ,समन्वयी समतोल मानवी जीवनाला कल्याणप्रदी ठरतो.
जे संतत्व भगवंत दर्शनाचा मार्ग सुकर , सुलभ , सोपा करतात त्यांनी देखील आपल्या संतवाङ्गमयातुन हा विचार मांडलेला आढळून येतो.
जीव सृष्टिमध्ये मनुष्य हा सर्वात हुशार आहे. चांगले काय किंवा वाईट काय किंवा सत्य काय हे समजण्याची जन्मजात नैसर्गिक दैवी देणगी , बुद्धिमत्ता त्याला ईश्वर कृपेने लाभली आहे. तरी तर्क आणि वितर्काच्या द्विधा मनावस्थेतुन योग्य तो खंबीर मार्ग काढण्यासाठी सुसंगत मन आणि बुद्धि योग्य तो सुंदर दिशा दाखवतात. यालाच मनावरचे सुंदर संस्कार आणि त्याला अनुषंगुन भावनिक कल्याणप्रदी बुद्धिची प्रगल्भता हाच विवेकी संस्कार आहे.
म्हणूनच प्राचीन अनादीकालापासुन जे संत ,मुनी , ऋषी यांचे वाङ्गमय ग्रंथ स्वरुपात उपलब्ध आहे ते वाचल्यावर आपल्याला संस्कारांची महती लक्षात येते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली , जगतगुरु संत तुकाराम , संत नामदेव , राष्ट्रसंत रामदास स्वामी तसेच अनेक ज्ञात संतांनी , कविवरांनी , साहित्यिकांनी , विचारवंतांनी आपल्या साहित्य संपदेत कल्याणकारी कृतार्थ जीवनाचा समग्र अर्थ समजून संगितला आहे.
रामायण , महाभारत , भगवत गीता , ज्ञानेश्वरी , तुकारामांची गाथा , पसायदान , हरिपाठ , दासबोध इत्यादि ग्रंथामधुन मानवी जीवनाच्या भावनिक नीतिमुल्यांचा परामर्श घेतला आहे.
प.पु. रामदास स्वामींनी आपल्या २०५ मनाच्या श्लोकामधून मनाबद्दल प्रत्येक श्लोकात अत्यंत मनोवेधक , प्रासादिक प्रबोधन केलेले आहे….
हे मना विवेकी बुद्धिने तू जीवन कल्याणासाठी निर्मोही भक्तिने वाटचाल कर असा उपदेश आपल्या सर्वांना केला आहे…
”
प्रभाते मनी राम चिंतित जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा।
सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनी तोची तो मानवी धन्य होतो।
अशी सुरुवात करून
या मनाच्या श्लोकांची सांगता शेवटच्या २०५ व्या श्लोकात…
मनाची शते ऐकता दोष जाती ।
मतिमंद ते साधना योग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी।
असे उद्बोधन करून केली आहे.
ते म्हणतात..
” नुसते शंभर श्लोक आणि त्याचा अर्थ जरी तुम्ही ऐकला किंवा वाचला तरी तुमच्यातील सर्वदोष समूळ नष्ट होतील आणि मन निकोप होवून बुद्धि प्रगल्भ होवून जीवनाचा अर्थही कळू लागेल…..!!!
इती लेखन सीमा
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
अध्यक्ष : महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे. (महाराष्ट्र )
दिनांक : १२ / ९ / २०२२
Leave a Reply