मन हृदय शरीर एक
आत्मा वाणी च रूप
तरी नजर मिळता न होई
तुलना त्यांची
अर्थ–
कोण कुणा पेक्षा श्रेष्ठ? कोण किती प्रमाणात श्रेष्ठ? कोण कमी पडतंय? कोण कमकुवत आहे? या प्रकारची तुलना जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी जग बघतो तेव्हा होऊ लागते. पण तेच डोळे ज्या शरीराचा भाग आहेत त्याच शरीरात कधीही कोणी आपली तुलना दुसऱ्याशी करत नाही. शेवटी प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येकाला योजून दिलेले काम केवळ त्याच्या साठीच आहे. दुसरा कोणी ते करू शकत नाही म्हणून ते आपल्याला मिळाले आहे ही भावना तेथे कधीच नसते.
एक जमीन शेती साठी अगदी पोषक, तर एक जमीन नुसती खडकाळ, शेतीस तिचा काडीचाही उपयोग नाही. पण म्हणून ती जमीन कमी लेखण्याचे काहीच काम नाही. शेतीतून उगवलेले धान्य जेव्हा शिजवायची वेळ येते तेव्हा चूल पेटवायला कोळसा हा लागतोच आणि कोण सांगे हा कोळसा खडकाळ जमिनीतून आला असेल.
तुलना करणे वाईट, त्यातून न्यूनगंड तयार होतो पुढे त्याचे रूपांतर अहंकारात होते. आणि एकदा का अहंकाराचा दागिना शरीरावर चढला की मग कोणतेही इतर दागिने त्या पूढे फिके पडतात. इथे मात्र अहंकाराची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply