नवीन लेखन...

मॅन ओव्हरबोर्ड

बंगालच्या उपसागरात एक मासेमारी करणारी भारतीय बोट पाण्यात बुडाली. त्या बोटीवर 15 सहकाऱ्यांसह असणारा एक भारतीय खलाशी रबिंद्र दास सुमारे पाच दिवस कशाच्या तरी आधारावर तरंगत राहिला पण 600 km खोल समुद्रात प्रवाहा सह वाहून गेला. समुद्रात पाच दिवस अन्न आणि पाण्याशिवाय तेही वादळी हवामानात तो जिवंत राहिला होता. हवामान खराब त्यात जी बोट बुडाली होती त्यावर काम करणाऱ्या खलाशांपैकी कोणाच्या नातेवाईकांना या गोष्टीची कल्पना होती की नव्हती कोणास ठाऊक. एखादी लहानशी मासेमारी करणारी बोट बुडाली तर त्याची कोणाला साधी दखल सुध्दा घ्यावीशी वाटत नसणार.

अशा या भारतीय खलाशाला आपल्या शेजारच्या बांगलादेशी जहाजावरील बांगलादेशी कॅप्टन ने वाचविले. देश धर्म प्रांत भाषा या सर्व सीमा ओलांडून माणुसकीच्या नात्याने एका खलाशाला पाण्यातून काढून जहाजावर घेण्यात आले. आपण एका भारतीयाला वाचवले की एका हिंदूला वाचवले यापेक्षा आपण एका माणसाला वाचवले या भावनेने जहाजावरील सगळे खलाशी आणि अधिकारी प्रचंड आनंदी झाले. पाच दिवस अन्न पाण्यावाचून खवळलेल्या बंगालच्या उपसागरात जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती टिकवून ठेवलेल्या भारतीय मच्छीमाराला वाचविले गेले. अथांग समुद्रात पाच दिवस अन्न पाण्यावाचून कोणीतरी तरंगतो आहे ही कल्पनाच अशक्यप्राय वाटते. एक दिवस दोन दिवस असे करता करता सलग पाच दिवस एक एक क्षण वाट पाहून आपल्याला कोणीतरी वाचवेल याला दुर्दम्य इच्छाशक्ती म्हणावे की देवावरचा विश्वास. सोबत असणारे इतर 15 सहकारी समोर बुडून मेले की असेच कुठेतरी प्रवाहात भरकटले असतील याचा विचार करून की आयुष्यातले सगळे सुखाचे आणि दुःखाचे क्षण सतत डोळ्यासमोर आणून सलग पाच दिवस पाण्यावर तरंगत काढले असावेत का या मच्छिमारान असे वाटले. अशा प्रसंगांची कल्पना सुध्दा करवत नाही. हल्ली हातात काही क्षण मोबाईल नसला की चिडचिड होणारी संस्कृती निर्माण झालीय. एक दिवस मोबाईल बंद असला की करमत नाही लोकांना. उपाशीपोटी आपण जगू की मरू हे माहीत नसताना कोणीतरी येईल आपल्याला वाचवेल या आशेने व्याकुळ होऊन पाच दिवस खवळलेल्या समुद्रात तरंगणे म्हणजे मृत्यूशी केलेल्या युद्धात खुद्द मृत्यूला पराभूत करण्यासारखेच आहे.

जहाजावर असताना अमेझॉन नदीमध्ये समुद्रातून खाडीच्या मुखापासून ते नदीच्या पात्रात जहाज आणण्यासाठी तेथील स्थानिक पायलट येत असत. हे पायलट उतरल्यानंतर पुढील अडीच दिवसांसाठी अमेझॉन नदीच्या पात्रातून मनौस शहरात नेण्याकरिता दुसरे पायलट येत असत. जहाजावर पायलट चढण्यासाठी पायलट शिडी असते लाकडाच्या फळ्या आणि दोरापासून बनवलेली ही शिडी पकडुन लहान बोटीतून जहाज न थांबवता केवळ वेग कमी करून पायलट जहाजावर चढत किंवा उतरत असतात. या पायलट शिडीवरून उतरताना एक पायलट तोल जाऊन पाण्यात पडला. मॅन ओव्हरबोर्ड म्हणजेच पाण्यात माणूस पडला म्हणून जहाजावर इमर्जंसी घोषित करण्यात आली. ब्राझिलियन पायलट अंगाने अत्यंत धिप्पाड तर होताच पण वजनाने सुध्दा खूप जास्त होता. पायलट बोट आणि जहाजाच्या मधील जागेत सापडून चेंगरला जाऊ नये म्हणून वेळीच काळजी घेतली गेली. लाईफ जॅकेट घातले असल्यामुळे तो नदीच्या पाण्यात बुडाला नाही. परंतु धिप्पाड असूनदेखील भीतीने त्याची गाळण उडाली होती. वजन जास्त असल्याने त्याला पायलट बोटीवर पाण्यातून खेचता खेचता सगळ्यांच्या नाकी नऊ आले होते. पायलट तर वाचला होता जहाज आणि पायलट बोट मध्ये चेंगरता चेंगरता आणि पाण्यात बुडता बुडता सुध्दा असे असले तरी जहाजावर घडलेला हा एक मोठा अपघात होता. हे का घडले कसे घडले, त्यामागची कारणे आणि प्रत्येक क्षणाची वास्तव परिस्थिती याची चौकशी होणार होती. प्रत्यक्षदर्शी व संबंधित सगळ्यांची चौकशी करून अहवाल बनवला जाणार होता. आमच्या जहाजाच्या कॅप्टन ला दोन दिवसांनी मनौस शहरात गेल्या गेल्या उतरवले गेले आणि घरी पाठविण्यात आले. चौकशी आणि अहवाल होत राहिले आणि जहाज सुध्दा न थांबता चालत राहिले. मॅन ओव्हर बोर्ड झाल्यावर पाण्यात पाडणारा खलाशी वाचेलच याची खात्री नसते. जहाजाचा ड्राफ्ट म्हणजे जहाज पाण्याखाली किती गेलंय ते समजण्याकरिता जहाजाच्या तळापासून मॅक्झीमम लोड लाईनच्या वर पर्यंत मीटर मध्ये आकडे लिहलेले असतात हे आकडे जहाजाच्या पुढे व मागे तसेच दोन्ही बाजूला लिहलेले असतात. एक अधिकारी सांगत होता की त्याच्या एका जहाजावर एक कॅडेट लाईफ जॅकेट न घालता ड्राफ्ट बघण्यासाठी पुढील भागात आकडे बघण्या करिता वाकला आणि तोल जाऊन पाण्यात पडला. जहाज रशिया मध्ये होते आणि त्यावेळेला तिथे कडाक्याची थंडी पडली होती. तापमान उणे चार ते पाच अंश सेल्सिअस होते. कॅडेट ला पाण्यात पडताना पाहिले गेले होते. पण जहाजाच्या पुढच्या भागात पोचून पाण्यात उडी मारेपर्यंत काही मिनिटे गेली. एका अधिकाऱ्याने आणि एका खलाशाने तेवढ्या थंडीत सुध्दा पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण. काहीवेळातच त्या कॅडेटचा थंडीमुळे हायपोथरमियाने मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी तेवढ्या थंडीत पण पाण्यात उडी मारणारे दोघेजण त्याला वाचवता न आल्याने खूप निराश झाले होते. जहाजावर अपघातामुळे किंवा तोल जाऊन पाण्यात पडण्याच्या घटना नेहमी होत असतात. पण काहीजण आत्महत्या करण्यासाठी रात्री अप रात्री पाण्यात स्वतःला भिरकावून देतात. जेव्हा त्याची ड्युटी ची वेळ होते आणि तो कामावर हजर होत नाही तेव्हा संपूर्ण जहाजभर त्याचा शोध घेतला जातो. त्याला शेवटचं कोणी आणि कुठे बघितले याची चौकशी करून मग मॅन ओव्हर बोर्ड घोषित केले जाते. आत्महत्या करणाऱ्या प्रमाणे काही जण भांडणातून किंवा वयक्तिक द्वेशापोटी एखाद्याला रात्री अंधारात पाण्यात फेकून देतात. जसं आत्महत्या का केली हे कोणी चिठ्ठीत लिहल्याशिवाय कळत नाही तसेच पाण्यात फेकून देणाऱ्या पैकी कोणी स्वतः हुन सांगत नाही तोपर्यंत त्या खुनाचे रहस्य गुपितच राहतं.

अथांग समुद्रात रात्री जहाजावरुन कोणी काही फेकले तर त्याचा आवाज कोणाला येत नाही. सगळे जण आपापल्या केबिन मध्ये असतात बाहेर डेकवर काळाकुट्ट अंधार त्यामुळे बघणारे कोणी नसते. रात्री जिथे फेकलेले असते ते ठिकाण सकाळपर्यंत शेकडो मैल मागे गेलेले असते.

जहाज पाण्यात बुडणाऱ्या माणसांना वाचविण्यासाठी माहिती मिळाल्याबरोबर वळविले जाते तसे नियम आणि कायदेसुद्धा आहेत. माणुसकी आणि इच्छाशक्ती जिवंत असती तर अशा नियमांची व कायद्यांची गरजच पडली नसती. कोणाला कोणाबद्दल काही वाटत नाही. आपल्यासाठी कोण काय करतंय याची कोणाला किंमत नसते. स्वार्थी आणि संधीसाधू होत चाललेल्या लोकांकडून आचरणापेक्षा उपदेश जास्त दिले जातात. हल्ली लोकं संवेदनाशून्य होत आहेत. वाचविणे, मदत करणे तर दूरच पण कोणाशी हसणे पण नाही. कोणाला कोणाकडे बघायला पण वेळ नाही हेच खरं.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजीनियर
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..