नवीन लेखन...

मन रामरंगी रंगले

आमच्या गावी गणपतीच्या दिवशी संध्याकाळी गावातले सर्व गावकरी भजनासाठी जमतात. गावकरी येण्याआधी आम्ही सर्व तयारीनिशी सिद्ध राहतो. समोरच्या देवखोलीत सुशोभित आसनावर गणपतीची प्रसन्न मूर्ती विराजमान झालेली असते. मूर्तीच्या पाठीमागे दिव्यांची आरास झगमगत असते. समोर निरांजनातील दिवे उजळून निघालेले असतात. देवखोली समोरील ओसरीत मनमोहक रांगोळ्यांवर समयी ठेवलेल्या असतात. हातात टाळ, झांजा घेऊन गावकरी येतात. पायपेटी स्थिरस्थावर होते. तबला बैठक मारतो. समयीची वात पेटवली जाते. उतबत्त्यांचा घमघमाट परिसरात पसरतो. एका सूरात एका तालात गावकऱ्यांचं भजन सुरु होतं. “गणाधीश… जो इश सर्वा गुणांचा…” हे नमन सादर केलं जातं. त्यानंतर भजनी ठेका ताल धरतो. तल्लीन होऊन गावकरी भजनात रमतात. सारा आसमंत टाळ मृदुंगाच्या नादाने दुमदुमू लागतो.

आमच्या घरातलं भजन उरकून गावकरी शेजाऱ्यांकडे जातात. त्यानंतर क्रमाक्रमाने एकेका घरात भजन सुरुच राहतं. पहाटे पाचसहा वाजेपर्यंत भजनाचे सूर कानावर येतच राहतात. प्रसन्न चित्ताने नव्या दिवसाचं आगमन होतं. मुंबईला परतल्यानंतर कित्येक दिवस कानात ते भजनाचे सूरच घोळत असतात. कधीतरी निवांत बसलो असताना आपोआप गळ्यातून भजनातल्या ओळी उमटतात- जयऽऽ जयऽऽ रामकृष्ण हाऽऽरी. जयऽजयऽ रामकृष्ण हाऽऽरी.

संगीतामध्ये मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद असते हे तर साऱ्या जगालाच ठाऊक आहे. त्यातही भजनात ही ताकद अगदी ठासून भरलेली असते असं म्हणायला हरकत नाही. भजनाचे सूर कानावर पडले की दोन मिनिटं हातातलं काम थांबवून आपण तल्लीन होऊन जातो. भजन, भक्तीगीतं, आरती, भूपाळी, प्रार्थना यात असं काय वैशिष्टयपूर्ण असतं ते नेमकं सांगता येत नाही. मात्र त्या ओळी कानावर पडल्या की अगदी आतून प्रतिसाद उमटतो. काही क्षणात आपण आपल्याला हरवून बसतो. कानावर पडणान्या ओळी अंतरंगातून ओठांवरही येतात. हाताने ठेका धरत आपणही ते भजन गुणगुणू लागतो.

केशवा माधवा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, तुझ्या कांतीसम रक्त पताका, विठू माऊली तू माऊली जगाची, कानडाऽ राजाऽ पंढरीचा अशी अनेक भक्तीगीतं रेडिओवर ऐकताना अथवा टीव्हीच्या पडद्यावर पाहतानाही आपण असेच स्वतःला हरवून बसतो. तुझ्या कांतीसम रक्त पताका… ही भूपाळी टीव्हीवर सुरू झाल्यावर समोर सुलोचना बाईंचा प्रसन्न चेहरा डोळ्यांसमोर येतो. सात्विक चेहऱ्याच्या नऊवारी साडी नेसलेल्या आणि केसांचा खोपा घातलेल्या सुलोचनाबाई तुळशी वृदांवनाशेजारी रांगोळी काढत गजाननाची भूपाळी गात असतात. तूच कर्णका, तूच गऽजमुखा उठी रे मोरेश्वारऽऽ भूप रागात घोळलेले मोत्यांच्या दाण्यासारखे टवटवीत शब्द आपल्या कानावर येतात आणि आपण समोरच्या दृश्यात समरस होऊन जातो.

तसाच आणखी एक अनुभव ब्रह्माविष्णू आणि महेश्वर’ या भक्तीगीताचा. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ चित्रपटातलं हे गीत. तुरुंगातून पळालेले तीन चोर मुक्कामासाठी एका साध्याभोळ्या गृहस्थाच्या घरी येतात. तिथे आल्यानंतर त्या साध्याभोळ्या इसमाची एक सावकार पिळवणूक करीत असल्याचं त्यांच्या ध्यानात येतं. त्या इसमाची काही महत्त्वाची कागदपत्रं सावकाराने बळजबरीने आपल्या तिजोरीत ठेवलेली असतात आणि तो त्या इसमाला छळत असतो. चोरांना या गोष्टीचा सुगावा लागल्यानंतर ते ती तिजोरी फोडतात आणि त्या इसमाकडे ती कागदपत्र परत करुन त्याची पिळवणूकीतून सुटका करतात. आनंदाचे दिवस परतल्यानंतर घरताली तरुणी दत्ताच्या तसबिरीसमोर भजन गाऊ लागते…. “ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. ” भजन सुरु असताना कॅमेरा त्या तीन चोरांच्या चेहऱ्यावर स्थिरावतो. लौकिकाअर्थाने चोर ठरविल्या गेलेल्या त्या तीन गुन्हेगारांच्या हृदयात अजूनही देवपण शाश्वत असतं. त्या देवपणाला वंदन म्हणजेच ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर’ हे गीत. हे भजन आपल्याला केवळ आपल्या वैयक्तिक सुखदुःखांपासून दूर नेत नाही तर ते काही चांगला संदेशही देऊन जातं. भजन या संगीत प्रकाराची ताकद अमर्याद आहे याची प्रचिती या गीतातून सहजपणे सामोरी येते.

मराठी भजनाइतकंच अन्य भाषांतील भजनांचा आस्वाद घेताना आपण त्यात अगदी आकंठ बुडून जातो. निशी दिन बरसत नैन हमारे, अल्ला तेरो नाम, इश्वर तेरो नाम, हरी तेरो नाम, जोध्याये धन पाये, सुखदायी तेरो नाम, अशी अनेक भजनं आपल्या हृदयात सामावलेली असतात. ही भजनं ऐकताना आपण परमावधीचा आनंद अनुभवतो. नरसी नाथांचं वैष्णव जन तो तेणे कहीये, जो पीड परायी जाणे रे हे गुजराथी भाषेतील भजन महात्मा गांधींनी जीवनाचा आदर्श मानलं होतं. स्वतःच्या दुखःचा बाऊ सर्वच करीत असतात. परंतु जो दुसऱ्याच्या दुखःने व्याकुळ होतो आणि त्याच्या मदतीसाठी धावतो तो खरा मानव. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा परोपकार करीत असताना तो त्याचा अभिमान धरत नाही, स्वतःबद्दल घमेंड बाळगत नाही तर सहजधर्म म्हणून इतरांची सेवा करुन बाजूला होतो. संपूर्ण मानवजातीला वंदनीय ठरलेल्या महात्मा गांधींच्या विचारसरणीचा पाया एक भजनच असावं हा एक मोठाच योगायोग.

भजनांइतक्याच प्रार्थनाही आपल्याला उचित मनोबल प्राप्त करुन देतात. उंबरठा चित्रपटातील गगन सदन तेजोमय, दो आँखे बारा हाथ मधली ऐ मालिक तेरे बंदे हम… गुड्डी मधली हमको मनकी शक्ती देना, अशा अनेक प्रार्थना समुहाने सादर करताना सद्विचारांना सामर्थ्य लाभतं आणि आत्मविश्वास द्विगुणीत होतो. एक प्रार्थना अवध्या तीन चार मिनिटांच्या कालावधीत चंचल भटकणारं मन स्थिर करु शकते हे एक आश्चर्यच म्हणायला हवं.

संत मीरेचे “मै जानू ना प्रभू को मिलन कैसे होय रे” असं एक सुंदर भजन आहे. आपलं दुर्भाग्य कथन करताना या भजनात मीरा म्हणते की साक्षात परमेश्वर माझी भेट घेण्यासाठी माझ्या अंगणात आले तेव्हा मी अभागन झोपून राहिले. मीरेचा हा अनुभव आपणही अनेकदा अनुभवलेला असतो. समोरुन संधी चालून येत असताना आपण त्यांकडे दुर्लक्ष केलेलं असतं आणि त्यानंतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही. समोरुन येणाऱ्या संधीचा लाभ घ्या आणि आपलं जीवन सुखमय करा हाच संदेश संत मीरा आपल्याला या भजनातून देऊन जातात. लौकिकाकडे पाठ फिरवून परमार्थाकडे वळा असं सांगणारी जशी भजनं असतात तशीच लौकिक जीवनालाही आपल्या सत्कृतींनी उजाळा द्या असा मोलाचा विचार देणारीही भजनं असतात. या भजनांचा आधार घेऊन आपल्याला मनाची शांती अनुभवता येते आणि आयुष्याला सद्गती प्राप्त करुन देता येते.

-सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..