आज सकाळी पेपरमध्ये बातमी वाचली. प्रत्येक जण आपापल्या परीने अडचण सांगत होते. आणि तेही खरेच आहे. मात्र मन अस्वस्थ झाले. तगमग झाली. सगळे काही चालू आहे मग मनाला धीर का येत नाही? आणि मार्गही सापडत नाही. वास्तविक माझ्या आयुष्यात मी वैयक्तिक अडचणी. आर्थिक स्थिती. सामाजिक बंधन. आणि अनेक वाईट प्रसंग यांना धैर्याने तोंड दिले होते. तर ओला कोरडा दुष्काळ. प्लेग. कॉलरा. किरकोळ दुखणी. भूकंप. स्वाईन फ्लू. चिकनगुनिया. अपघात. पर्जन्य वृष्टी. पूर एक ना दोन किती तरी गोष्टी पाहिल्या आहेत पण हे कोरोनाचे संकट भयंकर वाटते. एक रोग म्हणून नव्हे तर वृद्धांची मनं. लहानाचे कोंडणे. तरुणांना पेन्शनर सारखे घरात बसून काम करावे लागते पण यात समाधान नाही. आयुष्यातील आंनद लुटायच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे जीव तीळतीळ तुटतो. बाहेरचे तेच आणि वाटले की प्रत्येक जण आपलेच गाऱ्हाणे मांडत आहे पण आपल्या पेक्षा दुसरे कसे जगतात याचा विचार करतो का?
गोष्ट आठवली ती कर्णाने श्री कृष्णाला सूत पुत्र म्हणून किती आणि काय काय सोसावे लागले याची कहाणी ऐकवली होती तेंव्हा श्री कृष्णाने कर्णाला सांगितले की आता माझे ऐक. मी कारागृहात जन्माला आलो. दोन आईनी सांभाळले. राजकुळातला असूनही कुणाबरोबर कसे जगलो. कंसाच्या जीवघेण्या संकटाला किती लहान वयातच असताना तोंड दिले. राधा किती भक्तीने प्रेम करायची पण तिच्याशी लग्न नाही करु शकलो. उलट सोळा सहस्र बायकांचा नवरा बनावे लागले. अनेक सत्य असत्याच्या युद्धात भाग घ्यावा लागला. सारथ्य करावे लागले. जवळच्या लोकांचा मृत्यू पहावा लागला. अशा अनेक अवस्थेतून मी गेलो. हे सगळे विधीलिखित असते. मला हे टाळता आले नसते का?
आता हीच परिस्थिती आहे. कुणी कुणाला काही बोलू शकत नाही. करु शकत नाही कारण सगळेच याच विचाराने त्रस्त आहेत. त्यामुळे माझे असे. तुझे तसे. माझी चूक नाही. तुम्ही जबाबदार आहात असे आरोप प्रत्यारोप करत बसण्याची वेळ नाही. फक्त मी कोण आहे आणि मला काय करायचे आहे एवढेच लक्षात घेऊन शेवटी तारणहार तोच आहे म्हणून त्यालाच साकडे घालण्यासाठी नामस्मरण केले तर….. मला उगाचच वाटते की आई रागावते. मारते. अबोला धरते. तर कधी कधी जेवायला देत नाही म्हणून तिची माया कमी झाली असे म्हणता येत नाही. आपली चूक कबूल करावी तिला शरण जावे. आणि चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली तर तो नक्कीच माफ करेल. आणि सगळे काही पूर्वीच्या सारखे आंनदी आनंद होईल…
तुम्ही माता पिता तुम्ही हो.
तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो.
धन्यवाद
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply