‘अध्यात्म-विज्ञाना’नुसार आपल्या मनाचं सामर्थ्य इतकं आहे, की ते आपल्या जीवनाचा उद्धार जसं करू शकतं, तसंच ते आपलं जीवन उद्ध्वस्त देखील करू शकतं. याचाच अर्थ, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, की आपलं जीवन उद्ध्वस्त करून घ्यायचं, हे पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे. या सामर्थ्याची आपल्याला जाणीव नसल्याकारणाने एखादी प्रतिकूल परिस्थिती उद्भवताच आपण खचून जातो. ‘मला हे जमणार नाही’ असा विचार मनात घर करू लागतो. अशाच एका बिकट प्रसंगात, एका साधकाला स्वामींनी दृष्टांत देऊन जो संदेश दिला होता, तो आपल्या सर्वांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तो संदेश असा होता, की “प्रसंगांना सामोरे जाणं, तुझं काम आहे. तुझ्या मागे उभं राहणं, माझं काम आहे”.
प्राप्त परिस्थिती पाहून ज्या ज्या वेळी आपल्या मनात विचार येईल, की ‘मला हे जमणार नाही’, त्या त्या वेळी हे वचन जर आपल्याला आठवलं, तर आपल्या ‘मागे कोण आहे’ ह्याची आपल्याला जाणीव होईल आणि त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचं धैर्य आणि बळ निश्चितच आपल्यात आल्याशिवाय राहणार नाही. ‘स्वामी कवच’ यात नेमकं हेच तर सांगितलं गेलंय. नाही का ? त्यातही सांगितलं गेलंय, की “निःशंक होई रे मना, निर्भय होईल रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना” अशी ही असाधारण शक्ती पाठीशी असता, ‘मला हे जमणार नाही’ असा विचार येणं याचा अर्थ, त्या शक्तीचा पूर्णपणे विसर पडणं हाच होते.
आपली श्रद्धा अशी कमी पडता कामा नये. तर यापुढे आपण सर्वांनीच, ‘आपण केवळ कर्ता आहोत आणि करविता आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे’ याची कायम जाणीव ठेवून ‘मला हे जमणार नाही’ हे वाक्य कायमचं विसरून जाऊया.
Leave a Reply