नवीन लेखन...

।। मनाचे श्लोक-एक दृष्टिक्षेप ।।

यच्चयावत् मनुष्यमात्राला सुखाची अनिवार इच्छा असते. सुखाच्या ओढीनेच त्याची सर्व धडपड चालते. याला एकही अपवाद नाही. याचे मूळ कारण आनंद हे माणसाचे खरे स्वरुप आहे. पण प्रत्यक्षात त्याला प्रत्येक वेळी सुख मिळतेच असे नाही. त्याला सुखाबरोबर दुःखप्राप्तीही सतत होतांना दिसते. याचे कारण त्याला आपल्या आनंदरुपते चे विस्मरण झालेले आहे. या विस्मरणासच त्याचे अज्ञान म्हणतात. ते अनादि आहे. आपल्या सकलदु:खाची निवृत्ती व्हावी असे कितीही वाटले तरी तसे होतांना दिसत नाही. त्या आज्ञानाचे पक्के आवरण त्याच्या आनंदरुपतेवर पडलेले आहे. त्याचे सत्य स्वरूप झाकले गेले इतकेच नाही तर असत्-जड-दु:खरुप असेलेले जगत त्याचाच भाग असलेला आपला जड देह हेच त्याला सत्य वाटू लागले. या मिथ्या जगतात तो सुखाचा शोध घेऊ लागला. पण जगतच मिथ्या असल्याने त्यातील सुखाची निमित्ते असलेले विषय त्यांचा तथाकथित भोक्ता जीव हे सर्व मिथ्या आहेत. जागात त्याला तथाकथित भोक्ता जीव हे सर्व मिथ्या आहेत. जगात त्याला थोडीफार सुखे मिळतात ही पण ते केवळ सुखाभास असतात. ती सुखे क्षणिक, तात्पुरती, विनाशी व परिणामी दुःखरुपच असतात. मनाच्या श्लोकात श्रीसमर्थ रामदास स्वामी या सुखांचे वर्णन करतात – “सुख सुख म्हणता दुःख ठाकुनि आले” पुढे ते मनाला विचारतात-

“जगी सर्वसुखी असा कोण आहे? ” आपल्याच पूर्वकर्मांनी आपणच तयार केलेल्या संचिताची मूळच्या सुखदुःखरूप फळे जीवाला भोगावीच लागतात. सुखरुप असलेल्या पण दुःखाच्या कचाट्यात खितपत पडलेल्या अभागी जीवाचे वर्णन संतश्री प. पू. डॉक्टरकाका (डॉ. श्री. द. देशमुख) करतात.

“जीव सुखाचा प्रवासी । दुःख जराही नको त्यासी । परी दोन्हीते तो सोशी । अनिवारपणे ।। जीव सुखरुप स्वभावें । परी कल्पित माया (अज्ञान) प्रभावे । दुःख म्हणूनि आक्रंदावे। नाना प्रकारे ।। मी सुखी मी दुःखी । ऐसा विलाप चाले मुखी। लाभ हानीची रुखरुखख । आयुष्यावरी।। जन्म, जरा, मरण । हे भय सदाचे दरूण। जीवा एकचि आमरण। आशेचे असे।।” जन्ममरणाच्या संसारचक्रात गरगरा फिरणाऱ्या, गुदमरणाऱ्या भवसागरात गटांगळ्या खात आचके देत जगणाऱ्या जीवाची ही दयनीय भयानक अवस्था दयाळू संतांना बघवत नाही. “बुडती हे जन न देखवे डोळा” अशी त्यांची करुणा असल्याने त्यांना जनांचा कळवळा येतो. श्रीसमर्थ रामदास स्वामी याला अपवाद कसे असतील! या दरिद्री जनांच्या उद्धारासाठी त्यांची अकारण करुणा प्रगटली. कीर्तने, प्रवचने भगवांतचे महोत्सव, मठमंदिरे अशा अनंत मार्गांनी त्यांनी समाजात धर्मजागरण केले, शुद्ध परमार्थाचा उपदेश केला, माणसाला आनंदरुप असलेल्या अनंत राघवाच्या पंथावर आणले. या पंथावरील वाटचाल माणसाला कराणासह वर्तमान सकल दुःखाची निवृत्ती करुन परमानंदाची प्राप्ती करुन देते. समर्थांचा मनोबोध या मार्गाचे सपूर्ण दिग्दर्शन करतो. याच उद्देशाने दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, अनेक स्फुट प्रकरणे अभंग, आरत्या, भारुडे इ. प्रकारचे विपुल वाड्मय त्यांनी लिहीले.

दिसायला अगदी लहान (२०५ श्लोक) पण असायला अतिशय महान असा “मनाचे श्लोक” हा ग्रंथ उपनिषद दर्जाचा आहे. “मनोपनिषद” या शब्दात थोरामाठ्यांनी ल्याला गौरविले आहे. सामान्यांची त्याविषयीची दृष्टी काहीशी कोती तथा कनिष्ठ आहे. त्याच्या मते लहान मुलांनी पाठ करावेत व पाठांतर स्पर्धेत म्हणून दाखवावेत एवढेच त्यांचे मूल्य आहे. तसेच उत्सव वा धार्मिक कार्यप्रसंगी पंगतीत म्हणावयास चांगले श्लोक एवढेच सामान्य तथा मर्यादित महत्त्व त्यांचे लेखी मनोबोध ग्रंथाचे आहे. अशांना समर्थांच्याच शब्दात अभागी म्हणता येईल. त्यांचा अभागीपणा श्रीसमर्थ दृष्टांतपूर्वक सांगतात. “लोहाची मांदूस केली । नाना रत्ने साठविली। अभाग्याने टाकिली। लोखंड म्हणूनी ।। वेदांताची श्रेष्ठ जीवनमूल्ये सांगून, जीवाचे सच्चिदानंद रूप दाखवून देण्यासाठी “अनंत राघवाचा पंथ-श्लोक १ला ” प्रशस्त करणाऱ्या या ग्रंथाला सामान्य दृष्टीने पहाणाऱ्याचे अभागीपण त्यांना अनमोल अशा विचाररत्नांपासून वंचित ठेवते. पण वस्तुस्थिती अशी आहे की उन्मनी अवस्थेत असलेल्या समर्थ रामदास स्वामी या एका साक्षात्कारी महापुरूषाने, अज्ञानी जनांना सर्व पातळ्यांवरील दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या मनाशी केलेला तो सुसंवाद आहे. हा ग्रंथ ही अतिश्रेष्ठ अशी श्रीसमर्थांची वाड्मयीन मर्ती आहे. सुबोधता, सोपेपणा, ठसठशीत पणा व तेजस्विता (सामर्थ्य) या गुणांनी मंडित असा तो श्रेष्ठ ग्रंथ आहे. “पाती संक्षेपविस्तरम् ।” अशी ग्रंथलेखकाची शैली आहे. साधकांसाठी उच्च कोटीचे मार्गदर्शन हा ग्रंथ करतो. परमार्थसाधकाला पायाशुद्ध, शस्त्रशुद्ध साधना करून परमानंद प्राप्तीपर्यंत सहजतेने घेऊन जाणारे ते साधन -पाथेय आहे. श्रद्धेय विनोबा भाव्यांच्या दृष्टीने हा अध्यात्मग्रंथ केवळ सोन्याची खाण नसून ती बावनकशी शुध्द सोन्याची लगड आहे. बह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांच्या मते मनोबोध हा अत्यंत सरस, आशयाघन आणि बोधप्रद असा सांधकांना सर्वांगाने मार्गदर्शन करणार उच्च कोटीचा अध्यात्मग्रंथ आहे या श्लोकांची रचना एक रात्रीत भिक्षाफेरीत म्हणण्यासाठी झाली हे खरे आहे. पण त्यामुळे लोकेषणा, मानसन्मान, पुरस्कार या उद्देशाने झाली अशी आशंका अनेकांच्या मनात उठली. काहींच्या मते त्यातील अध्यात्मविचार पहाता समर्थांनी हे श्लोक स्वोद्धाराच्या भावनेतून रचले असावेत. परंतु त्यांची रचना यापैकी कशासाठीच नसून “बुडती हे जन न देखवे डोळा” अथवा “तरतेन बुडो नेदावे बुडतयासी” या तळमळीतून झाली आहे. या रचनेमागील त्यांचे ठळक उद्देश असे-

१) परकी जुलमी राजसत्तेखाली दडपलेल्या तसेच धास्तावलेल्या जनांना विवेकाचा मार्ग दाखवून स्वधर्मरक्षणासाठी जागृत करणे व हिंमत देणे.

२) क्र. १ साठी लोकजागरणासाठी भिक्षा फेऱ्या काढणे व पावन भिक्षेचे व्रत घेणे.

३) भिक्षाफेरीच्या वेळी प्रभातकालीन शांत आणि प्रसन्न वातावरणात मनाचे श्लोक म्हणत म्हणत त्याद्वारे सदाचार, भगवद्भक्ती, अद्वैत, विचार, सत्संग, सुविचार आदींचे महत्त्व खणखणीत व स्पष्ठ उच्चारण करुन लोकांमध्ये प्रसारित करावे व नंतरच त्यांचेकडून धर्मकार्यासाठी निस्पृह वृत्तीचे भिक्षा स्वीकारावी.

४) या प्रकाराच्या बहुमोल आचारविचारांनी लोक भारले जावेत व एकविचाराने संघटीत होऊन कार्यप्रवृत्ती व्हावेत.

५) परमार्थ साधकांना बहुमोल मार्गदर्शन व्हावे.

६) “कल्याण करी रामराया जनहित विवरी” या विश्वकल्यणकरी प्रार्थनेच्या सफलतेसाठी खरे हित कशात आहे, व ते साध्य करण्यासाठी जीवनपद्धती कशी ठेवावी याचा बोध करणे व याद्वारे जो शाश्वत आनंद आपल्याला मिळाला तोच परमानंद सर्वांना मिळावा ही जनकल्याणाची दृष्टी.

श्रीसमर्थांचे असे विविध उद्देश मनाच्या श्लोकांच्या रचनेमागे आहेत. मनाचे श्लोक ह एक प्रकरण ग्रंथ आहे. व्यवहारात तर मनाचे महत्त्व आहेच पण परमार्थसाधनेत ते मध्यवर्ती असलेले श्रेष्ठ साधन आहे. शरीर-मन-बुद्धी या तिन्हीनी साधना होते पण मन मध्यवर्ती आहे हे जाणूनच की काय गीतेत आपल्या विभूती सांगताना “इद्रियाणां मनश्चास्मि” असे मनाचे श्रेष्ठपण दाखवून दिले आहे.

अनन्यसाधारण असलेले मन माणसाचा शत्रूही आहे आणि मित्रही आहे. “आत्मैव ह्या त्मनो बंधु: आत्मैव रिपुरात्मनः।” मनाच्या माध्यमातून आपणच आपले शत्रू वा मित्र असतो कारण मन सुष्टही आहे आणि दुष्टही आहे.

आत्मशोध घेऊन त्याचा वेध लागण्यासाठी व शेवटी प्रत्यक्ष बोध (अपरोक्षानुभूती) होण्यासाठी “अनंत राघवाच्या पथावरुन” गमन करावे लागते म. श्लोक १ हा प्रवास करणाऱ्या जीवाचे वर्णन करतांना कठोपनिषदात रथाचे रुपक केले आहे. त्यात इंद्रियरुपी घोट्यांना नियंत्रणात ठेण्यासाठी बुद्धिरूपी सारथ्याच्या हातातील लगाम म्हणजे “मन” असे मनाचे नियंवृत्व सांगितले आहे. मनाच्या श्लोकात श्रीसमर्थांनी हे लक्षात घेऊन त्याचे सतत उद्बोधन केलेले आढळते.

मन हे परस्पर विरोधी गुणांचे आहे. त्यामुळे त्याला परमकल्याण्याच्या कामासाठी अनुकूल करुन घेणे महाकठीण आहे. या कारणाने मनाची व्यवस्थीत मशागत करून त्याला समजावून, आजांरून गोंजारून घेण्याचे काम समर्थांनी छान साधले आहे व जीवाचे उद्बोधन केले आहे. भ. गीता अ. ६-३ मध्ये अर्जुन भगवंताकडे मनाविषयी एक रास्त तक्रार करतो की मन अत्यंत चचल, दांडगे, बलवावन व हट्टी आहे. वाऱ्याला आवरणे जेवढे धाव कठीण तेवढेच मनाला आवरणे कठीण आहे. ‘आकाशाची करवेल घडी। वायूची बांधवेल पुडी। परी या मनाच्या ओढी। आवरती नारा।।” श्रीसमर्थ करुणाष्टकात म्हणतात. “अचपळ मन माझे नावरे आवरीता। (रामा) तुजविण शिण होतो धाव रे आता।” कवयित्री बहिणाबाईंनी मनाचे अत्यंत प्रतययकारी वर्णन केले आहे. “मन वढाय वढाय उभ्या पिकातल गुरं । किती हाकला हाकला फिरी येई पिकावर।”-विषयरुपी पिकात घुसलेल्या विषयासक्त मनाला तिथून कितीही हाकलले तरी ते पुन्हा पुन्हा पिकात घुसते आणि अर्थातच आयुष्याची नासाडी. करते अशा ओढाळ मनाला ताब्यात का आणून त्याला शांत व स्थिर करण्याचा पुरुषार्थ साधकाला करावाच लागतो. कारण शांत आणि स्थिर चित्तातच आत्मारामाचे दर्शन होते. मनाचे एकेक दोष दाखवून त्यांचे निराकरण करुन त्याला साधनानुकल कसे करून घ्यावे ते मनोबोध सांगतो या श्लोकांचे श्रवण-मनन-निदिध्यासनपूर्वक आचरण केले तर मन पूर्ण सहकार्य करते. म्हणूनच “मनाचे श्लोक” हा ग्रंथ साधकासाठी एक तेजस्वी दीपस्थंभ आहे.

हे मन चंचल असले तरी त्याचा एक मोठा गुण आहे संत ज्ञानेश्वर महाराज तो सांगतात.

“की जे जया मनाचे एक निके। जे हे देखिलिये गोडीचिया ठायी सोके। म्हणोनि अनुभवसुखचि कौतुके। दावीत जावे ।।”

श्रीसमर्थांनी मनाच्या गुणाच्या पुरेपूर लाभ मनाच्या श्लोकात” घेतला आहे. त्यात त्यांनी सतत रामरायाचा गोडवा, सदाचरणपूर्वक त्याची सेवा, भक्तीचा महिमा, सत्संगाचे लाभ, श्रीगुरुंप्रती शरणागती, आत्मारामाची। सच्चिदानंदघन परमात्म्याची आत्मत्वाने प्राप्ती आदि अनेक सुंदर सुंदर गोष्टींकडे मनाला वळविले आहे. मन हे दुहेरी वाहतूक करते. १) बुद्धीने दिलेले निण्रय मनामार्फत इंद्रियापर्यंत पोहोचतात व इंद्रिये त्यानुसार कार्याची अंमलबजावणी करतात. २) इंद्रियांना बाह्य जगतातून मिळालेली माहिती मनच बुद्धीपर्यंत पोहोचविते. बुद्धीच्या ठिकाणी जन्मोजन्मीची वासना ठाण मांडून बसलेली असल्याने बुद्धीचे निर्णय वासनानुसारी असतात, अर्थात ते बंधनात टाकणारे असतात. तिला तेथून हटवून रामप्राप्तीचे कल्याणकारी संस्कार बुद्धीत ठसवायला हवेत. सद्ग्रंथ, सत्शास्त्र, सत्संग, सदाचरण, सदुपासना या गोष्टी मनाला पुरवल्या तर ते मन अनुकूल काम करते, हे वर्म श्रीसमर्थांनी जाणले. मनाच्या श्लोकातून हेच नवे संस्कार त्यांनी मनावर केले. ते घेऊन मन बुध्दीकडे जाते. ती नव्या संस्कारांचे ग्रहण करते व तिच्या ठिकाणची वासनाक्षीण होत जाते. तिथे नवे अध्यात्मिक संस्कार ठाण मांडू लागतात. त्यामुळे जीवाची अध्यात्मसाधना जोर धरू लागते, कस धरू लागते, सफलतेच्या दिशेने प्रगती करू लागते.

मनोबोध हे मनोपनिषद असल्याने हा ग्रंथ वेदांप्रमाणेच त्रिकांडात्मक आहे. त्यातील कर्मपर उपदेशाने चित्तशुद्धी व उपासना तथा भक्तिपर विचारांनी चित्ताची शांती तथा स्थिरता प्राप्त होते. शुद्ध व शांत झालेल्या चित्तातच त्यातील ज्ञानविचार रुजतात. त्याचप्रमाणे त्यात दाखवून दिल्याप्रमाणे श्रीगुरूंची व सत्संगाची आवश्यकता लक्षांत घेऊन सर्व स्तरांवर सेवा केल्यास त्यांचेकडून यथोचित यथार्थ साधनेचे धडे मिळतात. प्रत्यक्ष साधना गुरुकृपा झाली की यशस्वी होते. याच्या फलस्वरूप साधकाचे जीवन धन्य होते. याप्रमाणे कर्म, भक्ती, ज्ञान या तीन्ही कांडांचा संयोग या ग्रंथात झाला आहे. त्यामुळे. “स्व म्हणिजे आत्मा जाण। ते ठासी नित्य अनुसंधान। तो स्वाध्याय म्हणती विचक्षण। निजद्रष्टे ।।” या श्रीएकनाथ महाराजांच्या उक्तीप्रमाणे मनोबोध हा एक स्वाध्याय यज्ञ ठरतो. हा यज्ञ प्रत्येक साधकाने करावा व “सकल धर्मामध्ये धर्म । स्वरूपी रहाणे हा स्वधर्म।।” हे समर्थ वचन लक्षात घेऊन श्रीसमर्थांनी पहिल्या श्लोकात सांगितलेल्या अनंत राघवाच्या पंथावर वाटचाल करावी. अशा साधकावर ईश्वरकृपा, गुरुकृपा व शास्त्रकृपा होऊन तो श्रष्ठ अशा आत्मकृपेचा धनी होतो. त्याची साधना सफल होते. शेवटच्या म्हणजे २०५ व्या श्लोकात सांगितलेले ज्ञान, वैराग्य व सामर्थ्य प्राप्त होऊन तो जीवन्मुक्तीवर आरुढ होतो. उर्वरित जीवन प्रारब्धानुसार जसे असेल तसे पण आनंदाने तो जगतो व शेवटी ईश्वरानियोजित समयी आपला देह व जगत् आनंदाने सोडून देतो. शांती-तृप्ती-समाधान-आनंद आणि निर्भयता प्राप्त झालेले त्याचे जीवन कृतकृत्यतेचे, धन्यतेचे असते हीच प्रभु रामरायाची कृपा आहे. मनाच्या श्लोकांच्या अनुसरणाने सर्वांना ती लाभो हीच श्रीसद्गुरु समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री समर्थापणमस्तु ।।

-प्रा. साधना पुरोहित – नागपूर
मोबा. ९४२२९६६६९०

सौजन्य: गुरुतत्व
वर्ष २ रे, अंक ११ वा, (अंक २३) ठाणे,
मार्च – २०१९ पाने ४८, किंमत रुपये २५/-

1 Comment on ।। मनाचे श्लोक-एक दृष्टिक्षेप ।।

  1. मनाचे श्लोक – एक दॄष्टिक्षेप हा आपला लेख
    अभ्यासपूर्ण आणि वाचनीय लेख.
    माझा प्रश्न- मनाच्या श्लोकातून श्री समर्थांनी सांगितलेली कर्म उपासना व ज्ञानमार्गाचा उपदेश कोण कोणत्या श्लोकातुन आणि कशा प्रकारे विशद केला आहे.
    कॄपया हे सांगाल का ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..