तसे पहायला गेले तर “श्रीमंती” या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी “श्री” नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे. यामध्ये “श्री” या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा इत्यादी गोष्टी येतात. श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नव्हे. पैसे कमवून जो श्रीमंत होतो “पैसेवाला”! आणि पैश्याबरोबरच माणसं कमावतो, मान कमावतो, प्रतिष्ठा कमावतो तो खरा “श्रीमंत” ! त्यामुळे श्रीमंतीमध्ये दोन अत्यंत वेगवेगळ्या संज्ञा आहेत.
माझ्यामते मुबलक पैसा कमविला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असे नाही. खरं तर फक्त पैसा कमविला की तो “पैसेवाला” नक्कीच होतो, मात्र “श्रीमंत” होतोच असं नाही. कारण प्रत्येक “श्रीमंत” हा पैसेवाला असतोच परंतु प्रत्येक “पैसेवाला” हा श्रीमंत असतोच असे नाही. कितीतरी श्रीमंत लोक असे आहेत की, त्यांना पैशांसोबत माणसाची कदर आहे आणि अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची अजिबात फिकीर नाही. बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अशा गोष्टी अनेक पैसेवाल्यांकडे हमखास दिसतात. आणि अमाप असा मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात कुजत पडलेला असला तरी त्याचे खर्चाचे नियोजन नसल्याने ते पैसेवाले असूनही श्रीमंत नसतात. त्यांचा सगळीकडे झगमगाट असतो पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज हा हमखास असतो.
श्रीमंताला कधीच त्याच्या श्रीमंतीचा अहंकार नसतो. परंतु पैसेवाला मात्र “मी किती महागाची कपडे घालतो, मोठ मोठ्या हॉटेलमध्ये जेवतो !” हे सांगण्यामागे त्या ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, मोठेपणा आणि अहंकार लपलेला असतो. त्याची ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटीरिअरपासुन अगदी लहान लहान गोष्टीत दिसते. पैशेवाल्यांकडे सुसंस्कृतपणा खुप कमी असतो. आपली मुलं नक्की काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात मोठ्या स्कूलमध्ये घातलंय याचंच खोटं कौतुक सांगत फिरतात. वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता याचा पैसेवाल्यांकडे अभाव दिसतो.
पण याउलट कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच वेगळी असतात. त्यांचे पाय हमखास जमिनीवर असतात. त्यापैकी कुणाला स्वच्छतेची आवड तर कुणाला नीटनेटकं राहण्याची सवय. कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला जुन्या पुरण्या मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद. कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेती करण्याची हौस ! काही श्रीमंत लोक तर कोट्याधीश लोकांकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात. त्यांच्या नजरेत कुठेही कसलाही भेदभाव नसतो. आपण श्रीमंत पैसेवाले आहोत याबद्दल किंचितही गर्व नसतो. ते पोकळ मोठेपणा तर कधीच बाळगत नाहीत.
मनानं आणि पैशानं श्रीमंत असणाऱ्या व्यक्ती स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक कधीच स्वतःच्या तोंडानं करत बसत नाहीत. उत्तम मोजकं बोलणं, उत्तम दर्जाचं खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची आणि शरीराची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं… म्हणजे वेदातल्या “श्री” या संकल्पनेला अनुरुप असलेलं असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व!
शेवटी महत्वाची बाब अशी की, भरपूर मेहनत करुन, काबाडकष्ट करुन, मिळेल तो उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, बाप दादाच्या वारसाहक्कांच्या जमिनी विकून “पैसेवाला” होता येणं कुणालाही सहज शक्य आहे. परंतु “श्रीमंत” होण्यासाठी मन स्वच्छ आणि मोठं असावं लागतं ! म्हणून श्रीमंत पैसेवाला असू शकतो मात्र पैसेवाला श्रीमंत असेलच असे नसते. कारण पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद असते.
— डॉ. शांताराम कारंडे
Leave a Reply