एक माणूस होता, त्याच्या पत्नीने त्याला महामूर्ख ठरविले. ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला फार बोचली. त्याला वाईट वाटले आणि त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला. प्रौढावस्थेत विद्याध्ययनास सुरुवात केली. दीर्घकाल निरंतर अभ्यास व दृढ निश्चयाच्या बळावर तो संस्कृतचा महाकवी कालिदास झाला. संपूर्ण भारत त्याच्या अद्भुत प्रतिभा विद्येने चकित झाला. त्याच्या सुप्त मनात काव्यशक्तीचे अजस्त्र स्रोत दडलेले होते.
एक डाकू होता. तो आपला चरितार्थ वाटसरूंना लुटून, त्यांची हत्या करून चालवित असे. एक दिवस एक मुनी त्याच्या तावडीत सापडले. तो त्यांना मारणार तोच त्यांनी अत्यंत शांतपणे त्याला विचारले, इतक्या व्यक्तींची हत्या करून ज्यांचे पालनपोषण तू करीत आहेस, त्यांना जाऊन विचार की ते तुझ्या पापात वाटेकरी होतील काय? तो घरी गेला आणि त्याने घरातल्या सर्वांना विचारले, त्यांचे उत्तर ऐकून त्याचा चेहरा पडला. त्यांचे उत्तर होते, ‘‘आम्ही तर तुमच्यावर अवलंबून आहोत. तुमच्या पाप-पुण्याशी आम्हाला काय घेणं-देणं?” आणि त्याचे डोळे उघडले. अंतरबाह्य बदल होऊन तो महर्षी वाल्मिकी बनला. त्याच्या सुप्त शक्ती जागृत झाल्या. सगळ्या जगाला त्यांनी आपल्या बुद्धीने चमत्कृत केले. अशाप्रकारे असंख्य महापुरुष झालेत ज्यांना काही मानसिक आघात वा अचानक बसलेल्या धक्क्याने आपल्या सुप्त मनात दडलेल्या गुप्त शक्तींचे ज्ञान झाले. त्यांच्या जीवनाचे पान बदलले. आपल्या गुणांनी ते जगाला आश्चर्यचकित करून गेले. तुमच्यात देखील मन, शरीर, आत्म्यात असाधारण शक्तींचा गुप्त खजिना दडलेला आहे. दु:ख याचे आहे की, तुम्ही स्वतःला सामान्य प्राणी मानता. आपण कधी असा विचार नाही करीत की, आमच्यातही दिव्य शक्ती दडलेल्या आहेत. जर का घोड्याला आंतरिक शक्तींची जाणीव झाली तर तो वाहनाला जुंपून घेणार नाही. हत्ती आपल्या शारीरिक बळावर जगाला वशीभूत करू शकतो. सिंह, चित्ता, अस्वल, रेडा, बैल, खेचर इत्यादी प्राण्यांना जर स्वतःच्या शक्तीची जाणीव झाली तर ते आपल्यावर राज्य करू लागतील. ज्याप्रकारे आपल्या उपयोगी प्राण्यांना स्वतःच्या ताकदीची जाणीव नाही त्याचप्रमाणे तुम्हाला देखील स्वतःच्या आंतरिक शक्तीचे ज्ञान नाही. तुम्ही जाणिवेच्या अभावाने दुर्बळ होऊन अंधारात चाचपडत आहात, पांगळे बनून रस्ता शोधण्याचा प्रयत्न करीत आहात.जो आपल्या मनाच्या शक्तीशी अपरिचित असतो तो जीवनातील झंझावातात कोलमडून पडतो.
–पं. श्रीराम शर्मा आचार्य
Leave a Reply