— त्यांच्या हातात झेंडे होते .
चेहरे थकलेले आणि देह रापलेले वाटत होते .
हातातल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या ते हलवीत होते .
त्यांची पाण्याची गरज त्यातून जाणवत होती .
पण महामार्गावर थांबता येत नव्हते . वाहने सुसाट पळत होती .
तरीही गाडीचा वेग कमी करीत मी थांबण्याचा निर्णय घेतला .
गाडी उभी केल्यावर त्यातल्या एकाला बोलावले आणि गाडीतल्या पाण्याच्या दोन बाटल्या त्यांना दिल्या .
” पुळ्याला चाललोय , नगरहून आलोय चालत , पन्नास किंवा शंभर रुपये द्या ”
त्यानं सरळ मागणी केली . माणुसकी म्हणून मी पाणी दिलं , तर हा पैसे मागू लागला होता . गरज असेल असं समजून त्याला शंभर रुपये दिले आणि मी न बोलता गाडी सुरू केली .
त्याच्या मागणीचं थोडं आश्चर्यच वाटलं पण प्रवासाच्या नादात मी विसरलो .
पण दुसऱ्या दिवशी त्याच मार्गावरून परत येताना , त्याच ठिकाणी , तीच माणसे , तशाच पद्धतीने अनेकांकडे हात पसरताना दिसत होती . काल एकच ग्रुप होता , आज तीन वाढले होते . थोडे अंतर राखून पाण्याच्या बाटल्या हलवण्याचा त्यांचा उद्योग सुरूच होता . लोकांच्या दयेचा , सहानुभूतीचा ,माणुसकीचा गैरफायदा घेणं सुरूच होतं .त्यातल्या एकाला मी ओळखलं , कारण त्यानेच काल माझ्याकडे पाणी , पैसे मागितले होते .
मी ओळखलं हे त्याच्या बहुधा लक्षात आलं , तो मला टाळून दुसऱ्या गाडीकडे पळाला , माणुसकीचा धंदा करायला .
मला काल ते पायी वारी करणाऱ्यांपैकी वाटले होते .
पण आज माझा भ्रमनिरास झाला होता .
त्यांना मदत करणाऱ्या वाहन चालकांना हे ठाऊक नव्हतं , की हाही एक धंदा आहे . कारण ते पाणी पैसे देऊन निघून जात होते .
मनातून सुखावत होते . आपण माणुसकी दाखवली या आनंदात ते जात होते . लोकांच्या भावनेचा धंदा करता येतो आणि लोक फसत राहतात , हे पुन्हा पुन्हा जाणवत होतं .
– एकाएकी कुणीतरी हसल्याचा आवाज आला आणि मी महामार्गावरच्या भल्यामोठ्या खड्यात गाडी गेल्यावर धक्का बसावा , तसा गाडीतल्या गाडीत उडालो .
पाठून हसण्याचा आवाज येतच होता .
मी पाठी बघितलं आणि पुन्हा धक्का बसला .
पाठच्या सीटवर एक मोठा रंगीत मासा गडबडा लोळत हसत होता .
मी डोळे चोळून पुन्हा पाठी बघितलं .
मासाच होता तो .
पण हसत लोळत होता , तडफडत नव्हता .
” तडफडेन कसा ? मी काय साधा मासा नाही .”
मी न विचारता माझ्या मनातल्या प्रश्नाला त्यानं उत्तर दिलं .
” गाडी कुठल्यातरी बाजूच्या लहानशा रस्त्यावर उभी कर . आता तुला धक्केच धक्के देणार आहे मी . अपघात होईल , त्यापेक्षा …”
मी न बोलता गाडी दुसऱ्या रस्त्यावर नेऊन उभी केली .
तो टुणकन उडी मारून माझ्या शेजारच्या सीटवर पडला .
आता माझं त्याच्याकडे नीट लक्ष गेलं .
निळ्या पांढऱ्या रंगाचा मासा होता तो . डोळे थोडे मिश्किल वाटत होते . कल्ले अजून कुठल्या तरी रंगाचे आणि तोंड सतत बडबड करणाऱ्या माणसासारखं होतं . समोरून पाहिलं तर , याला खूप काहीतरी सांगायचं असावं असं वाटत होतं .
” झालं निरीक्षण ? आता मी इथे कसा तेही सांगतो . काल तू कोल्हापूरजवळच्या कळंबा तलावाजवळ गेला होतास . त्या तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या एका झाडाचा तू फोटो काढलास . नंतर कात्यायनीच्या देवळासमोरच्या तळ्यातील कासवांचे फोटो काढलेस . खरं आहे ना ? ”
” खरं आहे पण तुला कसं कळलं ? ”
” त्या तलावातूनच तुझ्या नकळत मी गाडीत आलो होतो . ”
” पण पाण्याशिवाय मासा जगत नाही . तो बोलत नाही . हसत नाही . गडबडा लोळत नाही .”
” ते इतर सर्व माशांना लागू होतं , मी वेगळा आहे . मला माशांच्या प्रजातीतील कुठलेच नियम लागू होत नाहीत . हा मला मिळालेला शाप आहे आणि समानधर्मा मिळाल्याशिवाय मी शापमुक्त होणार नाही .”
” पण तो समानधर्मा केव्हा मिळणार ? ”
” तू कोण आहेस मग ? मला शापमुक्त करणारा समानधर्माच आहेस . ”
“मला नाही कळलं .”
” सगळ्याच गोष्टी एकदम , एकाच वेळी कळायला हव्यात , असं कुठं लिहिलंय ? तुला तर अजूनही अनेक गोष्टी कळलेल्या नाहीत . पण मी जसजसा बोलत जाईन , तसतसं तुला सगळ्या गोष्टीचं आकलन होईल . अर्थात त्याला फार उशीर झालाय , पण त्याला आपण काहीच करू शकत नाही . काही गोष्टी नियतीच्या अधीन असतात , त्यांचं आकलन पटकन होत नाही . बऱ्याच गोष्टी जाणवतात पण त्या ओठावर आणता येत नाहीत . मानसकोंड माहितेय ना तुला ? ती फार चमत्कारिक असते . तू काय अगर मी काय , मानसकोंडीत घुसमटत असतो .कोंड मोठी , खोलवर पसरलेली असते . अथांग , काळीशार अंतहीन कोंड ! त्या कोंडीत आपण पडलो की घुसमट , चरफड , चिडचिड , वैफल्य आणि बरंच काही असं प्राक्तन असतं मग . कोंडीच्या काठावरचं उभं असणारं सत्य , प्रामाणिकपणा , निष्ठा , सद्हेतू , आपल्याला दिसत असतात . पण तिथे जाण्यासाठी आपण जितके प्रयत्न करतो , तितके कोंडीत अडकत जातो आणि हतबल होऊन जातो . ”
” मला काही कळलं नाही . ”
” सांगेन हळूहळू .त्यासाठीच तर मी तुझ्यापाठून आलोय . तुला सांगायलाच हवं नाहीतर मला शापमुक्त कसं होता येईल ? चल , गाडी सुरू कर . आणि हो काळजी करू नकोस , तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाला दिसणार नाही . ”
तो हसला आणि सीटवर पडून राहिला .
मी यंत्रवत गाडी सुरू केली.
मुख्य रस्त्याला आलो .
पण , उद्या तो काय सांगणार आहे , हा विचार डोक्यातून जात नव्हता .
आणि रस्त्यात माझ्याकडे पाणी मागणारे ते कोण होते , हे ही कळलं नव्हतं …
( क्रमशः )
– डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
————
* ही एक वेगळी कथामालिका आहे .
* रोज किंवा एक दिवसाआड ती आपल्याला वाचायला मिळेल .
*आवडली की नाही हे नेहमीप्रमाणे कळवलाच .
* नावासह सर्वांना पाठवायला हरकत नाही .
Leave a Reply