नवीन लेखन...

मानसशास्त्रज्ञ तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये धनश्री लेले यांनी लिहिलेला हा लेख


‘ग्यानबा-तुकाराम’ या दोन शब्दांवर, मंत्रावर, वारकरी संप्रदायाची इमारत उभी आहे. महाराष्ट्र हा असा एकमेव प्रांत असेल, की जेथे देवाच्या आधी त्याच्या भक्तांचा जयघोष होतो. वारकऱ्यांच्या गळ्यातले दोन टाळ जणू ग्यानबा तुकाराम हा मंत्रच गात असतात.

ज्ञानदेवांनी पाया रचला तर तुकाराम त्याचा कळस झाले. कोणत्याही गोष्टीच्या कळसापर्यंत पोहोचणं ही गोष्ट सोपी नाही. कुठल्याही पोथीचा कळसाध्याय लिहिणं सोपे नाही. कारण त्यात सगळ्या पोथीभर विखुरलेले विषय, विचार यांचं संकलन, एकत्रीकरण करून, सारांश काढून सोप्या भाषेत लोकांसमोर मांडायचे असतात. ज्ञानदेवांपासून जे संत झाले त्यांचा उपदेश जणू साररूपाने, अधिक स्पष्टपणे, पण अधिक सोप्या भाषेत तुकारामांनी मांडला. फक्त एवढंच नाही तर त्याला स्वतःच्या चिंतनाची, मननाची, स्पष्टवक्तेपणाची आणि विनम्र भक्तीची जोड दिली आणि म्हणूनच ‘तुकाराम गाथा’ हे वारकरी संप्रदायाचं सार आहे.

तुकोबारायांनी गाथा लिहिल्यालाही तीन-साडेतीन शतकं होऊन गेली पण ती जुनी वाटत नाही. ती शाश्वत आहे कारण त्यातले विचार हे कालौघात पुसले जाणारे नाहीत. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ तेच कालप्रवाहात टिकते. तुकारामांची गाथा तर इंद्रायणीत बुडूनही तरलेली आहे. ती काळाच्या नदीत बुडेल का? त्यातले विचार आजच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळातही लागू पडतात. आधुनिक काळात उलट या गाथेच्या वाचनाची फार जास्त गरज आहे. आजच्या काळात ही गाथा वाचताना तुकाराम महाराज संतापेक्षा मानसशास्त्रज्ञ म्हणून अधिक जाणवतात. माणसाच्या मनाचा त्यांनी किती सूक्ष्म विचार केला होता हे जाणवतं. त्यांची वचने आपल्याला आजही मार्गदर्शक ठरतात. जणू ती त्रिकालाबाधित सुभाषितेच वाटतात.

तुकाराम महाराजांचं पहिलं १६-१७ वर्षांचं आयुष्य सर्वसामान्य गेलं पण नंतर मात्र संकटांची मालिकाच सुरू झाली. साहजिकच त्यांचं मन संसारातून उडालं आणि परमार्थात जडलं. त्यापेक्षा ज्याने हा प्रपंच घडवलाय त्या पांडुरंगाला शरण जावं. सगळ्या चिंता-काळज्या त्याच्यावर सोपवाव्या आणि आपण आपल्या जीवनकार्याला लागावं हा विचार त्यांच्या मनात आला.

तुका म्हणे घालू । तयावरी भार ।
वाहू हा संसार । देवापायी ।।

हे फक्त तुकोबांच्याच बाबतीत घडतं असं नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीतही घडतं. चिंता फक्त जाळत राहते. काळजी फक्त मन जाळत राहते. किती काळ असं जळायचं त्यापेक्षा तुकोबांचं हे वचन डोळ्यासमोर आणावं. संसार त्याच्या पायी, काळजी त्याच्या माथी सोपवावी आणि आपण प्रयत्नांना, कार्याला लागावं हेच योग्य. मानसशास्त्रज्ञ सांगतात की जी गोष्ट अजून घडलीच नाही त्याचीच काळजी माणसं जास्त करतात. काळजी मनातून काढून टाकावी, चिंता काढून टाकाव्या. पण कुठे? ते मानसशास्त्रज्ञ सांगत नाहीत. ते तुकाराम महाराज सांगतात. जिथे मनाची श्रद्धा आहे तिथे चिंता, काळज्या ठेवाव्यात.

प्रतिकूल तेच घडेल असा विचार करून काम करायला सुरूवात केली तर अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही असंही काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात. तुकाराम महाराजांनी हेच थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलंय. ते म्हणतात, ‘मी खूप सुखी होईन, सुखाचे पाट माझ्या घरी वाहतील’ असा स्वप्नीय विचार करण्यापेक्षा ‘सुख पाहता जवाएवढे । दुःख पर्वताएवढे ।’ हा विचार मनात ठेवावा. दुःख सुखापेक्षा अधिकवेळा स्वीकारावं लागणार आहे हे वास्तव आधी स्वीकारायला हवं. पण सुखापेक्षा दुःख अधिक का? याचं उत्तर म्हणजे आपलं मन. मनाची सवय असते तक्रारी करत राहण्याची. कितीही चांगले घडले तरी छिद्रान्वेषी मन त्यातली छिद्रच, न्यूनच पाहते. आणि त्यामुळे चांगलं मिळूनही मनाला दुःखच वाटतं. शिवाय आपल्यापेक्षा दुसरा जास्त सुखी आहे असा विचार मनात येतो आणि उगाचच त्याचा हेवा वाटतो.

आपलं सुख दुसऱ्याच्या सुखातच जडलंय व दडलंय (सुखे दुज्याच्या हिरवत चित्ती । दुःखे डोळा पाणी ही बा. भ. बोरकरांची ओळ नकळत आठवून जाते.) ते ओळखता यायला हवे. शेवटी सुख हे बाहेर शोधण्याची वस्तू नाही. सुख, आनंद आपल्यातच असतो तो मिळवायचा असेल तर मनावर ताबा हवा. कायम मन प्रसन्न ठेवायला हवे. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण. सुखप्राप्ती ही मोठी सिद्धी आहे ती मनाच्या प्रसन्नतेनेच मिळणार आहे. सुखाची गुरूकिल्लीच एका ओळीत तुकोबांनी दिली.

पण मन प्रसन्न करावं हे म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. मन प्रसन्न ठेवता आले तर उत्तमच नाही तर जे सामोरं आलंय, ते चांगलंच आहे असं मानावं. घडतं ते भल्यासाठी. दुःखातही सुख हुडकावं, वाईटातूनही चांगलंच निवडावं, आपत्तीलाच इष्टापत्ती मानावं. जशी तुकोबांनी मानली.

बरे झाले देवा निघाले दिवाळे ।
बरी या दुष्काळे पीडा केली ।
अनुतापे तुझे राहिले चिंतन |
जाला हो वमन संवत्सरा ।।

जीवनातला उणेपणा या अशा विचाराने जीवनाला पूर्णत्व देत असतो. ही संताची दृष्टी आहे. जीवनातल्या शिशिरऋतूतही संत वसंतच शोधतात तो असा.

जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? असा प्रश्न एका मानसशास्त्रज्ञाना केला तेव्हा त्याने सांगितले ‘आपल्या जगण्याला उद्दिष्ट नसणं, हे जीवनातलं मोठं दुःख आहे. म्हणून प्रथम आपल्या जगण्याचं उद्दिष्ट ओळखलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘उजाडावया आलो वाटा’… आमच्या जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे संतांचे मार्ग स्वच्छ करणं, वाटा उजळणं. या वाटा संतांच्या असतील, दुःखितांच्या असतील, आपल्या स्वतःच्या असतील पण वाटा उजळावयाच्या आहेत. किती अर्थपूर्ण आहे हे वचन. आपण वाटा उजळायच्या आहेत का जाळायच्या आहेत हे आपण प्रथम ठरवायला हवं, गीतेत म्हटलं तसं. आत्मैव आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मना । आपणच आपले मित्र आहोत नि शत्रूही आहोत. हा विचार मनात ठेवून तुकोबांचे वचन वाचल्यास अधिक स्पष्ट होतं.

एकदा उद्दिष्ट ठरले की माणूस त्या उद्दिष्टाने प्रेरित होतो. त्याचाच ध्यास, त्याचीच आस, त्याच्यासाठीच खास अशी एकदा अवस्था आली की आपला मोठा शत्रू आळस कुठच्याकुठे दूर पळून जातो. (तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नाश ।) आणि लक्षात येतं की जी गोष्ट अवघड वाटत होती ती सहज साध्य झाली आहे. (असाध्य ते साध्य करिता सायास ।) हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्यवेळी योग्य भूमिका घ्यावी लागते. नम्र जाला भूता तेणे कोंडिले अनंता । अशी नम्रत्वाची महती सांगणारे तुकाराम महाराजच या दोन भूमिका सांगतात. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास । पण दरवेळेला इतकं मऊ राहता येत नाही तेव्हा कठोर व्हावंच लागतं. कठिण वज्रास भेदू ऐसे । नाठाळाच्या माथी हाणू काठी । असे कठोर उद्गार तुकाराम महाराजांचेच. बरेचदा नाठाळ कोण हेच आपल्याला समजत नाही. कोणाच्या बोलण्यावरून एखाद्या व्यक्तीला नाठाळ ठरवायचं! तुकाराम महाराज म्हणतात, स्वतः पडताळून पहावं.

सत्य असल्याशी मन देते ग्वाही ।
मानिवले नाही बहुमता ।।

काठी हाणायची नाठाळाच्या माथी पण इतरांसाठीनम्रपणाच असावा. (व्हावे लहानाहून लहान). एकदा हा नम्रपणा अंगात भिनला की मग हा मोठा तो लहान हा भेदच उरत नाही. सगळे सारखेच वाटतात. (अवघी भूते साम्या आली) (तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ।) हे सगळं जग एकाच तत्त्वापासून बनलंय – विष्णुमय जग । वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम । अमंगळ ।। जे माझ्यात तेच तुझ्यात, जे पिंडी ते ब्रह्मांडी हे अध्यात्माचं महत्त्वाचं तत्त्व तुकाराम महाराज किती साध्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवतात. ते तत्त्वचिंतन तर आहेच पण ते तत्त्व लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवता येईल याचा विचार करणारे, लोकांच्या मनाशी संवाद साधणारे ते द्रष्टे कवी आहेत आणि म्हणूनच त्यांना फक्त संत नाही तर मानसशास्त्रज्ञ तुकाराम असंच म्हणायला हवं.

वारकरी एकमेकांना भेटल्यावर एकमेकांच्या पाया पडतात. अशा वेळी ज्येष्ठ वारकरीही आपल्यापेक्षा लहान असलेल्या वारकऱ्याच्या पाया पडतो. हे दृश्य मोठं लोभसवाणं दिसतं. पाया पडताना जसा वयाचा विचार केला जात नाही तसंच कुणी कोणत्याही जातीच्या वारकऱ्याच्या पाया पडतो. निदान देवाच्या दारी वारकरी जात पाळीत नाहीत. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, ‘वैष्णवाचा धर्म, भेदाभेद, भ्रम, अमंगळ असा भेदाभेद करणं हे अमांगल्याचं समजावं. सर्व प्रकारचा भेदाभेद करणाऱ्यांना तुकोबा बजावतात, ‘अहो, देहात अवयव जरी वेगवेगळे असले तरी जीव एकच असतो ना? तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात,

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ||
कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव मागे पावे ।।

तीर्थाला गेलं म्हणजे पुण्य लागतं अशी सर्वसामान्य लोकांची समजूत आहे. परंतु संत सावता माळी यांचे गाव पंढरपूरापासून हाकेच्या अंतरावर असूनही ते दरवर्षी इतरांप्रमाणे पंढरपूरच्या वारीला जात नसत. कारण त्यांचे म्हणणेच असायचे, ‘कांदा-मूळा-भाजी-अवघी विठाई माझी ।।’

संत तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थक्षेत्री काय असतं, तर दगड, धोंडे अन् माती! देव तीर्थाच्या ठिकाणी नसतो. तर तो असतो सज्जन लोकांच्या ठायी! म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,

तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।
मिळालिया संतसंग । समर्पिता भले अंग ।।
तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।

— धनश्री लेले

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..