माझे सहकारी शिक्षक आणि माझ्या कुंटुबाचा एक भाग असलेले श्री. बी. एल. कुंभार यांचे निधन झाले. माझा तर विश्वासच बसत नाही. त्यामुळे अजूनही त्या धक्क्यातून सावरु शकत नाही. चित्रकलेच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या चित्रकाराला चित्रकला शिक्षक म्हणून कधीच काम दिले नाही. नेमणूक झाली होती याच कारणासाठी पण ते खऱ्या अर्थाने मानसीचा चित्रकार होते. न. प. शा. क्रमांक अकरा समतानगर उस्मानाबाद येथील शाळेत मी मुख्याध्यापिका म्हणून रुजु झाल्या पासून त्यांना अगदी जवळून पाहिले. नवीन शाळा सुरू करण्यात आली होती म्हणून मैदानात काही रोपे लावली होती आणि कुंभार सर शाळेत लवकर येऊन झाडांना पाणी घालणे. आळे करणे कामे करीत असत. अगदी याच अपेक्षेने मुलांना घडवत असत. गणित विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. पण दुसरे कोणतेही विषय दिले तरी नाही म्हणणार नाहीत. तिथेही मुलांना कमी पडू दिले नाही. कधीही घरगुती कारण सांगून काम टाळले नाही. साधा राहणी आणि उच्च विचारसरणी.
सांस्कृतिक कार्यक्रम झाला की मुलांना घरापर्यंत पोहचवणे यामुळे पालक निर्धास्तपणे भाग घेण्याची परवानगी देत. अध्यापना व्यतिरिक्त कोणतेही काम न सांगता करण्याची त्यांची वृत्ती. स्वच्छतागृहातील गटार तुंबली की लगेचच स्वतः स्वच्छ करणार, म्हणायचे यंत्रणा हालचाल करेपर्यंत मुलांच्या आरोग्याचे काय? सहलीला गेल्या वर मुलांच्या वर जातीने लक्ष घालून सांभाळून घेणार. त्या वेळी स्वतः हिंडणे फिरणे. खरेदी याकडे लक्ष देत नसत. आमच्या शाळेला बालनाट्य स्पर्धेत जी प्रथम क्रमांकांचे बक्षीस मिळाले ते केवळ त्याच्या नेपथ्यामुळेच. सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांचा याच कारणासाठी सहभाग होता म्हणून बक्षिस मिळाले आहेत.
जाता जाता एक आठवण म्हणजे मी रजेवर गेले आणि शाळेत एक मुलगा विजेच्या तारेला चिकटला होता त्यावेळी प्रसंगावधान राखून त्यांनी लाकडी स्टुलचा पाय धरायला लावून त्या मुलाची सुटका केली होती. असे अनेक प्रसंग त्यांच्या बाबतीत घडलेले आहेत. स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलेले होते म्हणून जाणीव होती. म्हणून कधीच विद्यार्थांची प्रतारणा केली नाही. अक्षर अगदी सुंदर शुद्ध सुवाच्य होते म्हणून कुणी खाजगी काम सांगितले तरी नाही म्हणणार नाहीत. या स्वभावामुळे घरच्यांना त्रास झाला असेलच. पण तिकडूनही त्या माऊलीची तक्रार नव्हती. पुण्यात आले की आम्हाला भेटायला आणल्याशिवाय जाणार नाहीत.
एक शिक्षक म्हणून कसा आदर्श असावा याचे ऊत्तम उदाहरण.
आज ते औपचारिक रित्या नाहीत पण त्यांनी शिकवलेल्या अनेक विद्यार्थाच्या हृदयात अगदी मानाच्या. आदराच्या. जागेवर आहेत आणि हाच सर्वोच्च पुरस्कार आहे. असा हा हाडाचा शिक्षक खरच मातीला आकार देणारा एक वेडा कुंभारच होता.
आज त्यांना अशी शाब्दिक आदरांजली वाहण्यात एक समाधान आहे. कारण त्यांनी फक्त शैक्षणिकच नव्हे तर संस्कारक्षम अशी शिकवण दिली आहे म्हणून त्यांचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि नावाजत आहेत. याचे सर्व श्रेय श्री कुंभार सर यांनाच आहे..
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply