नवीन लेखन...

‘मानवनिर्मित प्रलय : केदारनाथ’

मानवाने त्याच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक नवनवीन शोध लावून क्रांती घडवून आणलेली आहे. यातून झालेल्या अमूलाग्र बदलास तो कारणीभूत ठरला. पण या सर्व गोष्टींना सामोरे जात असताना तो दरवेळेस एकच चूक करत गेला, ती म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाणे आणि स्वतःची इच्छा पूर्ण करून घेणे. त्यातून निष्पन्न झालेल्या गोष्टी म्हणजे महापूर, भूकंप, ज्वालामुखी यासारखे आपत्ती. या अगोदर ह्या सर्व आपत्ती ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून ओळखले जायचे पण माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे त्याच आता ‘मानव निर्मित आपत्ती’ म्हणून ओळखले जातात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेला महापूर.

अजूनही आठवतो १६ जून २०१३चा तो काळा दिवस. उत्तराखंड पर्वतावर वारंवार ढगफुटी होत असते. त्याचप्रमाणे ज्या दिवशी पूर आला त्यादिवशीही ढगफुटी होणार होती. याचा अंदाज हवामान खात्याने २  दिवस अगोदरच केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिला होता पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर गांधी सरोवर फुटले आणि केदारनाथ मंदिराचा परिसराच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी रौद्र प्रवाहात वाहून गेल्या. सारे काही जलमय झाले. अचानकपणे नदीला आलेला महापूरात जवळपास ४३०० लोक मृत्युमुखी पडले. भारतीय सैनिक दलाच्या अथक प्रयत्नामुळे ५०,००० लोकांना वाचविण्यात यश मिळाले आणि अजूनही ७०,००० लोक बेपत्ता आहेत. भारतातील प्रसिद्ध ४ धामांपैकी एक मानला जाणारा केदारनाथ हे पवित्र धार्मिक स्थान. ज्याठिकाणी जगभरातून यात्री श्रद्धेने मोक्षप्राप्तीसाठी आले होते ते किड्या-मुंग्यांप्रमाणे मृत्यूमुखी पडले. हजारो घरे उध्वस्त झाली. भरपूर प्रमाणात वित्त हानी आणि जीवितहानी सोसावी लागली. याच घटनेचा आधार घेऊन दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी नुकतेच ‘केदारनाथ’ चित्रपटाचे प्रदर्शन केले.  सुशांत सिंग रजपुत आणि सारा अली खान मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपटाची कथा जरी २०१३ च्या उत्तराखंड महापुराचा आधार घेऊन लिहिली गेली असली तरीही ते केदारनाथ मंदिराच्या परिसरात घडणाऱ्या विविध गोष्टींवर प्रकाश टाकते. ते तिथले मंदिर, मंदिरांशी निगडित असलेली लोकांची श्रद्धा आणि यातूनच तिथल्या स्थानिक माणसाची व्यापारीकरणाकडे वळणारी विकृत प्रवृत्ती.

तसं पाहायला गेलं तर हा चित्रपट मन्सूर (सुशांत सिंग) आणि मंदाकिनी (सारा अली खान)यांची अधुरी प्रेमकथा आहे. मन्सूर हा केदारनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना गौरीकुंड पासून १४ किलोमीटरच्या खडतर रस्त्यावरून केदारनाथाच्या मूळ मंदिरापर्यंत पोहचविण्याचा काम करणारा एक मुस्लिम युवक. हिंदू यात्रीप्रमाणे तितक्याच श्रद्धेने त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारा हा आनंदयात्री. मंदाकिनी हि केदारनाथ मंदिराच्या पुजारीची मुलगी. प्रवाहाच्या विरोधात जाणारी, मनातल्या भावना मुक्तपणे व्यक्त करणारी आणि फेसबुक सारख्या सोशिएल मीडियावर ऍक्टिव्ह राहणारी ‘बोल्ड’ मुलगी. या दोघांमध्ये प्रेम होते. पण दोन वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रवाहात वाहणाऱ्या ह्या दोन नद्यांचा संगम चित्रपटाच्या अगदी शेवटपर्यंत होत नाही. हि प्रेमकहाणी वगळता बाकी अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावर प्रकाश टाकणे अत्यंत गरजेचे वाटते. भारत हा विविधतेने नटलेला राष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जातो. इथे शेकडो जात, धर्म, पंथ आनंदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगवेगळे आहेत. इथे प्रमुख धर्म आहेतच आणि त्यात पुन्हा निरनिराळे पंथसुद्धा आहेत. मुस्लिम धर्मामध्ये ‘सिया’ आणि ‘सुन्नी’, ख्रिश्चन धर्मात ‘कॅथॉलिक’ आणि ‘प्रोटेस्टंट’ तर हिंदू धर्मात ‘वैष्णव’, ‘शैव’ आणि ‘शाक्त’ असे पंथ आपल्याला पाहायला मिळतात. विष्णूचे पूजन करणारे ‘वैष्णव’, शिवाला पूजणारे ‘शैव’ आणि दुर्गा देवीला आपले आराध्य दैवत मानणारे ‘शाक्त’ पंथीय म्हणून ओळखले जातात. असे अनेक पंथांचे विविध मंदिरे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्या मंदिरांच्या ठिकाणी येणारे भाविक, त्यांच्यासाठी लागणारे सोयी-सुविधा, लॉज, हॉटेल्स इत्यादी गोष्टींमधून मोठ्याप्रमाणात त्या पवित्र ठिकाणांच्या विद्रुपीकरणाला सुरुवात झाली. या गंभीर विषयावर प्रकाश टाकण्यात दिग्दर्शकाचे झालेले प्रयत्न स्पष्ट दिसून येतात.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ‘धर्म’. “सर्व धर्म समभाव” हे ब्रीद घेऊन जगासमोर आदर्श ठेवणाऱ्या भारत देशामध्ये जातीला, धर्माला समोर ठेऊन होणारे क्रूर हल्ले, दंगल आणि मंदिर-मस्जिदांची तोडफोड या पार्श्वभूमीवर हा चित्रपट महत्वाचा ठरतो.

ज्या देशामध्ये महात्मा बसवेश्वरांसारखे समाजसुधारक १२व्या शतकामध्ये एका चांभाराचे लग्न ब्राह्मण मुलीशी लावून देऊन संपूर्ण जगाला जात-धर्माच्या पलीकडे असणारा मानवतेचे संदेश देऊन गेले त्याच राष्ट्रात जातबाह्य लग्न केले म्हणून दोन वेगवेगळ्या जाति-धर्मांमध्ये जीवघेणे हल्ले होतात प्रसंगी जीव मारलेही जातात. या चित्रपटात मन्सूर आणि मंदाकिनीच्या प्रेमसंबंधाला समाजमान्यता मिळत नाही आणि मंदाकिनीचे लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिले जाते. मानवतेचे संदेश हजारो वर्षांपासून माझा देश जगाला देत आलेला आहे. पण त्याच राष्ट्रामध्ये अशा गोष्टी डोळ्यासमोर घडताना पाहिले कि मनाला खुप खंत वाटते. मूर्तिपूजेला विरोध करणारा राष्ट्र आज मंदिर आणि मस्जिद बांधणीसाठी लढतोय. ‘एक राष्ट्र, एक धर्म’चा नारा देणारा माझा देश आज आरक्षणासाठी रस्त्यावर येत आहे. या सगळ्या गोष्टींना वेळीच लगाम लावला नाही तर प्रलय निश्चित आहे. तेही ‘मानवनिर्मित प्रलय’ म्हणून ओळखला जाईल यात शंकाच नाही.

— कमलाकर रुगे 

Avatar
About कमलाकर रुगे 6 Articles
मी सध्या इंग्रजी प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. आतापर्यंत माझे लेख दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेले आहेत. मी ब्लॉग वर माझे लेख प्रकाशित करीत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..