नवीन लेखन...

मानवपूर्व अग्नी

मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासात अग्नीचा शोध अतिशय महत्त्वाचा आहे. अग्नीचा शोध म्हणजे अग्नीवरचं नियंत्रण! विविध नैसर्गिक कारणांनी लागलेल्या आगींमुळे आदिमानवाला अग्नीची ओळख पूर्वीच झाली होती. परंतु या नैसर्गिक अग्नीवर त्याचं नियंत्रण नव्हतं. स्वतःहून अग्नीची निर्मिती करता येऊ लागल्यानंतर मानवी इतिहासातला, सामाजिक उत्क्रांतीचा, तंत्रज्ञानातील उत्क्रांतीचा, तसंच शारीरिक उत्क्रांतीचाही नवा टप्पा गाठला गेला. अग्नीच्या शोधामुळे आता थंडीपासून बचाव करणं शक्य झालं, धातुशास्त्रासारखी शास्त्रं विकसित झाली, तसंच अन्न शिजवता येऊ लागलं. शिजवलेलं अन्न सहजपणे पचत असल्यानं, माणसाच्या शारीरिक रचनेत महत्त्वाचे बदल घडून आले. आतापर्यंतचा मानवी इतिहास, अग्नीचा विस्तृत वापर हा सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी सुरू झाल्याचं सुचवतो. त्या अगोदरच्या काळातले – पाच लाख वर्षांपूर्वीपर्यंतचे – अग्नीचे काही पुरावे सापडले असले तरी ते मोजकेच आहेत. पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळातले अग्नीच्या वापराचे पुरावे तर अतिशय दुर्मिळ आहेत.

अग्नीचा शोध केव्हा व कसा लागला, याबद्दलची आतापर्यंत उपलब्ध झालेली माहिती ही मुख्यतः दृश्य पुराव्यांवर आधारलेली आहे. हे पुरावे म्हणजे मानवी अस्तित्व असणाऱ्या जागी आढळलेली अर्धवट जळालेली प्राण्यांची हाडं, त्यांच्यात झालेले विशिष्ट रंगबदल, त्यांचं तडकणं, त्यावर निर्माण झालेल्या भेगा, असे दृश्य पुरावे. हे अवशेष ज्या काळातले आहेत, त्यावरून या अग्नीच्या वापराचा काळ समजू शकतो. एखादी वस्तू अग्नीच्या संपर्कात आली होती का, हे नक्की कळण्यासाठी त्या वस्तूचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं जातं. काही वेळा या वस्तूंत उष्णतेमुळे झालेल्या रासायनिक बदलांचा अवरक्त वर्णपटमापकाद्वारे अभ्यास केला जातो. या रासायनिक बदलांच्या स्वरूपावरून या अवशेषानं किती तापमानाला तोंड दिलं आहे ते कळू शकतं. माणसानं वापरलेल्या दगडी साधनांच्या बाबतीत मात्र, आगीशी संबंध येऊनही त्यांत दृश्य स्वरूपाचा बदल झालेला काही वेळा दिसत नाही. दगडी वस्तूंत होणारे रासायनिक बदल हे अत्यल्प असल्यानं, प्रचलित तंत्रांद्वारे ते ओळखणं शक्य नसतं. त्यामुळे या दगडी वस्तूंचा आगीशी संपर्क आला होता का, ते ओळखणं कठीण ठरतं.

आता मात्र अशा दगडी वस्तूंत उष्णतेमुळे होणारे रासायनिक बदल ओळखण्यासाठी एक नवं तंत्र विकसित झालं आहे. हे तंत्र जरी वर्णपटशास्त्रावरच आधारलेलं असलं तरी, त्याला जोड दिली गेली आहे ती कृत्रिम बुद्धिमत्तेची! डीप लर्निंग या प्रकारात मोडणाऱ्या संगणक प्रणालीचा वापर करणारं हे तंत्र, इस्राएलमधील ‘वाइझमान इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेतल्या झेन स्टेपका आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात नुकतंच वापरलं. या तंत्रामुळे अग्नीच्या शोधासाठी, सहजपणे न सापडणाऱ्या पुराव्यांचाही उपयोग करता आला आहे. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ दी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. झेन स्टेपका आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन २०२१ साली केल्या गेलेल्या एका संशोधनावर आधारलं आहे. त्या संशोधनात, इस्राएलमधील क्वेसेम गुहेत सुमारे तीन लाख वर्षांपूर्वीच्या अग्नीचा शोध लागला होता. आताच्या संशोधनात त्याच्या खूपच पुढचा टप्पा गाठला गेला आहे. त्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन संशोधक याही संशोधनात सहभागी झाले होते.

सन १९७६-७७मध्ये इस्राएलमधील, भूमध्य सागराजवळच्या एव्हरॉन क्वॉरी या उत्खनन क्षेत्रात सुमारे आठ लाख ते दहा लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन वस्तू सापडल्या. या वस्तूंत हरणं, पाणघोडे, गवे, यासारख्या दिसणाऱ्या काही तत्कालीन शाकाहारी प्राण्यांच्या कवटीचे तुकडे, दात, इत्यादी अवशेषांचा समावेश होता. तसंच त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय शाकाहारी प्राण्याच्या सुळ्याचे तुकडेही तिथे सापडले. प्राण्यांच्या या अवशेषांबरोबरच तिथे गारगोटीच्या दगडापासून बनवलेल्या विविध साधनांचे तुकडे आढळले. हे तुकडे, दोन सेंटिमीटरपासून ते साडेसहा सेंटिमीटरपर्यंत वेगवेगळ्या लांबीचे होते. हे तुकडे ज्या दगडी साधनांचे होते, त्यातली काही साधनं धारदार होती, तर काही साधनं अणकुचीदार होती. यातली काही साधनं ही शिकार करून आणलेले प्राणी कापण्यासाठी वापरता येणारी साधनं होती. मुख्य म्हणजे या दगडी वस्तू अग्नीच्या संपर्कात आल्याचे कोणतेही पुरावे या वस्तूंत दिसून येत नव्हते. इथे सापडलेला सुळा मात्र काहीसा जळालेल्या अवस्थेत असल्यानं, इथे अग्नीचा वापर केला गेल्याची शक्यता दिसून येत होती. इथे खरोखरच अग्नीचा वापर केला गेला होता का, हे शोधण्यासाठी झेन स्टेपका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, इथे सापडलेल्या गारगोट्यांच्या तुकड्यांवर, या नव्या पद्धतीद्वारे संशोधन करण्याचं ठरवलं.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या संशोधनातला पहिला टप्पा हा, संगणकाला प्रशिक्षण देण्याचा होता. यासाठी झेन स्टेपका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथम, इस्राएलमधील इतर ठिकाणांहून गोळा केलेल्या, गारगोटीच्या नैसर्गिक नमुन्यांचा वापर केला. हे नमुने त्यांनी प्रयोगशाळेतील ओव्हनमध्ये आठशे अंश सेल्सिअसपर्यंतच्या वेगवेगळ्या तापमानाला तापवले. हे तुकडे थंड झाल्यानंतर, त्यांवर वेगवेगळ्या लहरलांबीच्या अतिनील लेझर किरणांचा मारा केला आणि या तुकड्यांवरून विखुरलेल्या किरणांचे वर्णपट घेतले. प्रत्येक तुकड्यात, तापवल्यामुळे अल्पसे रासायनिक बदल घडून आले होते. या रासायनिक बदलांमुळे त्यांच्या वर्णपटांतही काही बदल घडून आले होते. या संशोधकांनी त्यानंतर या विविध तापमानाला नोंदवलेल्या वर्णपटांची, एका संगणक प्रणालीद्वारे संगणकाला ओळख करून दिली. या ‘प्रशिक्षणा’मुळे, एखादी गारगोटी कोणत्या तापमानापर्यंत तापवली गेली आहे, हे त्या गारगोटीच्या अतिनील वर्णपटावरून ओळखण्यासाठी तो संगणक सज्ज झाला.

त्यानंतर झेन स्टेपका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, एव्हरॉन क्वॉरी इथल्या उत्खननात सापडलेले, गारगोटीपासून बनवलेल्या विविध साधनांचे एकूण सव्वीस तुकडे अभ्यासासाठी निवडले. या संशोधकांनी त्या तुकड्यांवर अतिनील तरंगलांबीच्या लेझर किरणांचा मारा केला व या तुकड्यांवरून विखुरलेल्या किरणांचे वर्णपट घेतले. हे वर्णपट त्या प्रशिक्षित संगणकाला पुरवण्यात आले. आपली बुद्धिमत्ता वापरून, या संगणकानं हे तुकडे वेगवेगळ्या तापमानांना सामोरे गेले असल्याचं तर दाखवून दिलंच, पण त्याचबरोबर ते कोणत्या तापमानापर्यंत तापवले गेले होते, हेसुद्धा शोधून काढलं. यातील काही तुकड्यांनी पाचशे अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान अनुभवलं होतं. एक तुकडा तर साडेसहाशे अंशांपर्यंतच्या तापमानाला सामोरा गेला होता. या सर्व निष्कर्षांवरून आठ लाख वर्षांपूर्वीही अग्नीचा वापर होत होता, हे स्पष्ट झालं. अग्नीच्या वापराचा, हा आतापर्यंतचा सर्वांत जुना पुरावा ठरला.

झेन स्टेपका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आतापर्यंतच्या सर्वांत जुन्या अग्नीचा शोध तर लावला आहेच, परंतु त्यांनी वापरलेल्या या तंत्रामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आवाकाही प्रचंड असल्याचं स्पष्ट झालं आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी इतिहासात डोकावणं शक्य झालं. आणि तेही थोड्याथोडक्या काळापूर्वीच्या इतिहासात नव्हे, तर तब्बल आठ-दहा लाख वर्षांपूर्वीच्या इतिहासात! हा इतिहास आजचा माणूस जन्माला येण्यापूर्वीचा इतिहास आहे. कारण आजचा माणूस जन्माला येईपर्यंत अजून बराच काळ जायचा होता. किमान सहा लाख वर्षांचा… हा अग्नी वापरला असावा तो, एका मानवसदृश प्रजातींनं… ही प्रजाती म्हणजे आजच्या माणसाच्या पूर्वजांपैकी असणारी ‘होमो इरेक्टस’ ही प्रजाती!

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: Matt / National Museum of Mongolian History, Evron Quarry / Excavation Archive, Filipe Natalio and Zane Stepka

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..