मनी स्वप्न कल्लोळ ज्याच्या असे
कृती कदापि त्या ठायी नसे
निश्चयी वृत्ती सोडती ठसे
पराक्रम करुनि
गगन धरुनी कवेत न घ्यावे
न कोणा तसे उपदेश द्यावे
सहज करावया म्हणून न जावे
अहित घडते
अर्थ–
मनी स्वप्न कल्लोळ ज्याच्या असे, कृती कदापि त्या ठायी नसे, निश्चयी वृत्ती सोडती ठसे, पराक्रम करुनि
(असंख्य विचार मनात भरलेले असले की नक्की कशावर कृती करावी आणि कोणत्या गोष्टींना आहुती द्यावी हे सहसा कळत नाही. मला क्रिकेट सुद्धा आवडतं, विज्ञान सुद्धा आवडते आणि गाणं सुद्धा आवडतं असं डोक्यात असणारा नक्कीच हॉटेल चालवतो. कारण एका गोष्टीला प्राधान्य देण्याची क्षमता नसली की असंच होणार. पण जो निश्चयी असतो, ज्याच्या मनात असंख्य विचार असले तरी त्यातला कोणता हे त्याला पक्के माहीत असते त्याची कृती ही त्याला प्रगती पथावर घेऊन जाते आणि त्यातूनच इतिहास घडतो.)
गगन धरुनी कवेत न घ्यावे, न कोणा तसे उपदेश द्यावे, सहज करावया म्हणून न जावे, अहित घडते
(दुसरा कोणी काय करतो ते बघुन उगाच आकाशात उडायला जाऊ नये, आपल्याला काय झेपेल आणि आपल्याला जे जमेल तेच करावे. किंवा तुम्ही काही आकाशात झेपावणारे कार्य केलेत म्हणून दुसऱ्या कोणास तसेच कर असे सांगणे योग्य नव्हे. प्रत्येकाची क्षमता, आवड आणि कार्यक्षेत्र हे वेगळे असते. त्यांनी केले मग मी पण करणार म्हणून भलते साहस करायला जाऊ नये, त्यातून काहीतरी फटका बसायचे चान्सेस हे जास्त असतात. कुणा एकाने नवीन बिझनेस सुरू केला आणि तो जोरात चालतोय म्हणून आपणही आपली हातची नोकरी सोडून काहीतरी उद्योग करायला जाऊ नये त्यातून नुकसान होण्याची शक्यता जास्त.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply