जेंव्हा जेंव्हा जगात अन्याय. अत्याचार. आणि धर्माच्या नावाखाली भक्तीची आणि भक्ताची निर्भत्सना होते तेंव्हा तेंव्हा या पासून सुटका करण्यासाठी काही विभूती प्रगट होतात. भक्तांचे रक्षण करुन समाजाला योग्य दिशा दाखवतात. आणि धर्माचे संकट दूर होते. हे सगळे आपण वाचतो. आणि आपल्या मनांत श्रद्धा व भक्ती निर्माण होते. आणि हेच मालिका मधून बघितले की खूपच समाधान मिळते. आता श्री स्वामी समर्थांची एक मालिका सुरू आहे. मी ती नियमित पणे पाहते. वास्तविक ती मालिका आहे. त्यातील श्री स्वामी समर्थ म्हणजे एक अभिनेता आहे हे माहीत असूनही ते सगळे खरेच वाटते. नकळतच हात जोडले जातात. परकाया प्रवेश केलेला असतात हे अभिनेते म्हणून अभिनय असला तरी विश्वास वाटतो. ते कथेत एकरुप झालेले असतात. काही लोकांना हे पटत नाही. जेव्हा इतर मालिका सुरू असतात तेंव्हा त्यातील पत्राबद्दल चांगली वाईट प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. मग ते कसे काय पटते. आणि काही नटांनी आपले अनुभव सांगितला आहे की देवाची भूमिका केलेल्या व्यक्तीला रस्त्यावर भेटल्यावर पाया पडणारे भेटले. आपल्या पेक्षा वयाने मोठी व्यक्ती पाया पडतांना त्यांना संकोच वाटतो. अजूनही काही लोकांना याचा अनुभव आलेला आहे. पण कुणाला काही वाटो मला लहानपणात पासून अगदी आत्तापर्यंत ते पात्र खरेच वाटते कारण माझी श्रद्धा आहे मग ते साईबाबा. गजानन महाराजन महाराज किंवा श्री स्वामी समर्थ कोणीही असो.
आता या मालिकेत प्रत्येक भक्ताला अडचणीतून सोडवले आहे. वाईट लोकांना धडा शिकवला आहे अशावेळी ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यावेळी हाताने आशीर्वाद देताना पाहिले की मलाच धीर येतो. यामागे पण एक अनुभव आहे माझा. मला दवाखान्यात दाखल केल्यानंतर अर्धांगवायू झाला आहे असे निदान केले होते. मला एक तर याची माहिती नव्हती त्यामुळे वाटले की होईन मी बरी. देवाची कृपा होती म्हणून फक्त एका हातावर परिणाम झाला आहे. बाकी चेहरा. स्मरणशक्ती. वाचा यावर काहीच परिणाम झालेला नाही. औषध वगैरे काहीच नाही पण थेरपी साठी बाहेर न जाता घरीच करण्याचे ठरविले. तशीही मी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होते. म्हणून चौदा डिसेंबर पासून दोन वेळा ते डॉक्टर आले होते . त्याच दिवशी मी घरी आले होते. डॉ म्हणजे वयाने लहानच होते मला त्यांनी या आजाराची व्यवस्थित माहिती दिली. मी मात्र खचून गेले होते. पण ठरवले की आजपर्यंत आयुष्यात अनेक खडतर प्रसंगी मी डगमगून गेले नाही. डॉ म्हणतात तसे जिद्दीने त्यांना साथ दिली तर कदाचित लोळागोळा होऊन पडणार नाही. डॉ वयाने लहान आणि माझे वय बहात्तर म्हणून त्यांनी करवून घेतलेल्या व्यायामाचा मला खूपच त्रास झाला होता. सहन होत नव्हत डोळ्यात पाणी यायचं
तीन चार दिवसांनी त्यांनी मला गॅलरीतील आणून म्हटले की आज्जी बघा जग किती सुंदर आहे पण ते बघण्यासाठी बाहेर यावे लागते. आणि त्यांनी शब्द दिला की आत्मविश्वास आणि जिद्दीने साथ दिली तर या पार्किंग मध्ये तुम्ही चालू शकाल. माझी अवस्था अशी आणि हे म्हणतात की एक महिन्यात मी चालू शकते. खरं वाटलं नाही. चला तर आता शुभस्य शीघ्रम तुम्ही भिंतीला धरून पावलं टाका. मी प्रयत्न करत होते पण एका पायाने कसे चालणार? तेंव्हा ते मागे असायचे आणि म्हणायचे मी तुमच्या पाठीशी आहे भिऊ नका. चाला चाला. ते माझ्या मागे होते पण मला वाटले की हे डॉ नाहीत हे तर आपले श्री स्वामी समर्थच आहेत. मग कशाला भ्यायचे. आणि खरोखरच मला त्यांनी पार्कमध्ये चालवत नेले. हळूहळू मी स्वतः ला सावरले. आणि बऱ्याच बाबतीत स्वावलंबी झाले. एका पायाला ओढत ओढत चालू लागले. आता या वर्षात मात्र वयानुसार माझी शारीरिक शक्ती कमी होत आहे म्हणून आता आधार लागतोच.
आता पहा मला माहित होते की ते डॉक्टर आहेत वयाने खूपच लहान आहेत माझ्या पेक्षा. पण मी त्यांच्यात श्री स्वामी समर्थांनाच पाहिले होते म्हणून तर ते माझ्या पाठीशी उभे आहेत या एकाच विश्वासाने मी थोडी का होईना स्वावलंबी झाले. म्हणून आजही ही मालिका पाहतांना मला खरेच समोर स्वामी समर्थ आहेत असे वाटते.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply