मनी जे धरावे
ते जाणून घ्यावे
तया योग्य काय हे
स्वतःस पुसावे!!
खेळ म्हणोनि का
ज्ञान व्यक्त करावे
स्वतः जगावे
मग जगास वदावे!!
अर्थ–
मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ही गोष्ट खूप आवडते, मला अमुक गोष्ट सारखी करावीशी वाटते. या सारख्या अनेक विषयाच्या वाटा आपल्या मनातल्या मार्गावर सतत मार्गक्रमण करीत असतात. पण त्यातलं नक्की काय करावं हे काही केल्या समजत नाही.
माझ्या मित्राने एकदा फोन केला की मला संभाजी महाराजांचे चरित्र वाचायला देशील का ? मला इच्छा आहे, म्हटलं देईन की त्यात काय उद्या घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी मी निघायच्या आधी फोन केला की आणतोय मी चरित्र संभाजी महाराजांचे तशी म्हणाला की अरे नको राहुदेत मी कालच हिटलर वाचायला घेतलं. मी एकदम आश्चर्य चकित झालो आणि विचारलं की एकदम संभाजी वरून हिटलर कसा काय ? तर म्हणाला की अरे काल संध्याकाळी documentry पाहिली एक हिटलर वरची आणि लगेच पुस्तक घेऊनच आलो.
यात नक्की काय वाचायचे आहे हेच मुळी मनात ठरत नसते त्यामुळे आवड की सतत बदलत रहाते, त्यानंतर हिटलर 50 पान वाचून त्याने मोदी वाचायला घेतलं ही गोष्ट अजून वेगळी.
पण सांगायचं मुद्दा असा की मनात एकदा का ठरवलं की मला हे करायचे आहे की पहिले खरंच ते करायचे आहे का?हे विचार करून ठरवावं आणि मगच त्या गोष्टीला हात घालावा. आणि केवळ एखादं पुस्तक किंवा एखादा विषय वरवर पाहिला म्हणून त्यावर लगेच इतरांना लेक्चर देणे हेही मूर्खपणाचे लक्षण आहे.
एक विद्वान गायक भागवत सांगायचे, त्यात भागवत कमी आणि गाणं जास्त असायचं, एकदा एका जाणकारांनी विचारलं की मी काल आपलं निरूपण ऐकलं त्यात आपण असे म्हणालात त्याचा काही रेफेरेन्स सापडत नाही हो भागवतात. नक्की कुठून आपण माहिती घेतली हे कळू शकेल काय? त्यावर त्या गायकाची मान खाली गेली आणि त्याने त्या श्रोत्या समोर हात जोडले.
एखाद्या विषयांत पूर्ण पारंगत झाल्या शिवाय किंवा एखादा विचार आपण पूर्ण जगल्या शिवाय त्याविषयी लोकांना सांगणं हे चूक आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply