मनी वसला एक छंद
त्याचा घ्यावा आनंद
तेच कर्म न करावे
व्यसन जडती
व्यसन, छंद व्याख्या वेगळया
काम नाही येरागबाळ्या
मोजीतो गुलाब पाकळ्या
तो व्यसनाधीन असतो
अर्थ–
बदलणारा काळ पाहून कर्म काय करावे हे ठरवणे गरजेचे आहे. आपण सर्वच रोजच्या सवयींच्या आहारी गेलो असतो, अगदी सकाळी उठल्या पासून रात्ती झोपे पर्यंत. कोण चहाबाज, तर कोण कॉफी चा वेडा म्हणजे अगदी कोणाचे पोट साफ देखील होत नाही चहा प्यायल्या शिवाय. पण हे ठीक आहे. याला व्यसन नाही म्हणू शकत, पण जेव्हा एखादा व्यक्तीच्या हाताला तंबाखू मळल्या शिवाय पोट साफ होण्याचे आवाहन झेपतच नाही त्याला मात्र व्यसन म्हणावे. इथे व्यसन आणि आवड यात फरकाची बारीक रेषा आहे. सकाळी कोमट पाणी चूळ भरण्या आधी प्यायल्यास तसेच काही व्यायाम केल्यास पोट साफ होण्यासाठी कोणत्याही क्रियेची गरज नाही.
व्यसन आणि छंद यातला फरक इतकाच की व्यसनातून प्राप्त काहीच होत नाही तर छंद तुम्हाला तुमच्या मनाला शांतता, आनंद तसेच मानसिक भक्कम पणा देण्यास खूप मदत करतो.
मला पुस्तक वाचायचा छंद आहे, ते वाचून मी त्यातल्या गोष्टींवर विचार करतो, त्यातुन काय घ्यायचे हे लक्षात घेतो. भले ते पुस्तक वाचायला वेळ का लागेना. पण मला पुस्तक वाचायचं व्यसन आहे, मी एका रात्रीत 500 पानी पुस्तक उडवतो, अत्ता पर्यंत 1000 वर पुस्तकं मी वाचली आहेत. पण त्यातून काय मिळालं? ह्याला व्यसन म्हणतात.
मला ट्रेकिंग प्रचंड आवडतं, खूपच जास्त आवडतं पण तो माझा छंद आहे. जेव्हा मला जमेल तेव्हा मी ट्रेकिंग करतो.
एखादा छंद अति झाला की त्याचं व्यसनात रूपांतर होते आणि व्यसनाकडे रस्ता गेला की त्याची किंमत मोजावी लागतेच. काही दिवसांपूर्वीच एकाचा अति ट्रेकिंग मूळे मृत्यू झाला कारण ते ट्रेकिंग छंदा पलीकडे गेले.
यातून एवढंच वाटतं की छंद या शब्दाला कलेचं, आनंदचं, आपलेपणाचं, सत्कर्माचं वरदान आहे तर व्यसन हे नेहमीच अंधाऱ्या भविष्याकडे घेऊन जातं.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply