DNA ( Deoxyribo Nucleic Acid). डीएनए मध्ये जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मनुष्य प्राण्यासहीत सर्वच सजीवांमधे हे घडतं. शाळेत असताना कधीतरी उत्तरापुरती घोकंपट्टी केलेली ही माहिती.
कोणत्याही प्राण्याचं स्वरूप कसं असावं हे DNA ठरवतात. जसं की रूप, रंग, डोळ्याचा रंग, आकार, केस/कातडीचा रंग इ. इ. हे सर्वच जीवांच्या बाबतीत घडतं. इथपर्यंत मनुष्य प्राण्यासहीत सर्वच सजीवांमधे घडतं.
मग मनुष्य आणि इतर प्राणी यांत वेगळंपण काय? तर काहीच नाही. बुद्धीने मनुष्य मोठा आहे यात वाद नाही परंतू छोटी-मोठी कामापुरती बुद्धी तर प्रत्येक जीवाला असतेच..मग मनुष्यात असं वेगळेपण काय?
मनुष्य आणि इतर सजीव प्राणी यांच्यात DNA चा प्रभाव सारखाच असला तरी मनुष्य इतर सजीवांपासून वेगळा ठरतो तो Dna, म्हणजे ‘ज्ञ’, म्हणजे ‘ज्ञाना’मुळे..! DNA मुळे मनुष्य’प्राणी’ घडतो, तर Dna (ज्ञ)मुळे मनुष्यातून प्राणीत्व वगळून त्याचा माणूस घडण्याचा प्रवास निरंतर चालू असतो..!
‘ज्ञ’ म्हणजे बुद्धी. सर्वच सजीवांत असते ती. परंतू मनुष्याच्या बुद्धीचा प्रवास सतत सुरूच असतो. पहील्या DNA मुळे अनेक गोष्टी आपल्याला काहीही कष्ट न करता आपोआप मिळत असतात. तर दुसऱ्या Dnaसाठी आपल्याला विषेष प्रयत्न करावे लागतात. दुसरा Dna वारसाहक्काने मिळत नाही. तो मिळवावा लागतो. तो निसर्गात मिळतो, परिसरात मिळतो. तो आपल्याला भेटणाऱ्या विविध माणसांतून मिळतो तर कधी वाचलेल्या पुस्तकांतून मिळतो..तो सर्वत्र आहे फक्त नाक-कान-डोळे आदी पंचेद्रीये सतत सजग ठेवावी लागतात आणि हे प्रयत्नाने अगदी सहज साध्य आहे..!
DNA आपल्याला मिळालाच आहे आई-वडीलांकडून, आपण दुसरा Dna मिळवण्याचा प्रयत्न करू व त्यालाठी गुरूची आवश्यकता असते. तो गुरू निसर्ग, परिसर, पुस्तकं किंवा आपल्याला ज्यापासून शिकायला मिळेल अशी कोणतीही सजीव-निर्जिव गोष्ट असू शकेल..आपण फक्त टिपकागद होणं गरजेचं आहे..!
-नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply