नवीन लेखन...

मन कि बात – ओळख

नुकतेच दहावी-बारावीचे रिझल्ट लागले. दरवर्षी याच महिन्यात थोडेसे पुढं-मागे होऊन लागतात. निकाल पास अथवा नापास असाच लागणार असला, तरी उत्सुकता, हुरहूर, टेन्शन असं सारं काही होतंच. अर्थात मी सांगतोय ते पूर्वीचं, तेंव्हा पास-नापास येवढ्या दोनच कॅटेगरी असायच्या. बाळंत होणाऱ्या बाईला कशा मुलगी किंवा मुलगा होणार या दोनच शक्यता असतात, तरी काय ती उत्सुकता असते सर्वांना, तसंच काहीस दहावी-बारावीच्या रिझल्टच्यावेळी व्हायचं. आता दिवस बदलले. नापासांचं (म्हणजे नापास करण्याचं) प्रमाण लक्षणीयरित्या घसरलं आणि पास होण्याचं वाढलं. आता उत्सुकता असते, ती किती मार्क्स पडले याची. डिलिव्हरीचंही काहीसं तसंच झालंय. ‘गाॅडेस सोनोग्राफी’च्या आशीर्वादामुळे निर्णय आधीच कळतो किंवा फिक्सही करता येतो, फक्त ‘तो’ कसा असेल याचीच उत्सुकता जास्त असते, मार्क्स किती मिळालेसारखी..असो. कालाय तस्मै नम:..।

रिझल्ट तर लागले, आता वारी काॅलेज प्रवेशाची. आॅनलाईन प्रवेशाचा घोळ न चुकता याच महिन्याच्या मागेपुढे येणाऱ्या आषाढीच्या वारीसारखा घातला जातो किंवा होतो. फरक एकच, आषाढीच्या प्रचंड मोठ्या वारीला कोणी नियंत्रक असा नसतो, ती वारकऱ्यांच्या स्वयंशिस्तीनेच चालते आणि म्हणून तित गोंधळ नसतो. आॅनलाईन प्रवेशासाठी मात्र दस्तुरखुद्द शासन सर्व नियंत्रण स्वत:च्या हाती घेतं आणि मग घोळ होतो. किंबहूना घोळ झाल्याशिवाय आपलं असणं जनतेला जाणवणार नाही अशी भिती शासनाला वाटत असावी, कारण ते एरवी कुठेच दिसत नसतं. ‘पारदर्शी’ शासनाचा ‘कुठेच न दिसणं’ असा शब्दश: अर्थ असेल याची कल्पना नव्हती. काही का असेना, शासन ‘पारदर्शी’ शब्दाला जागतं याचा अनुभव कृतकृत्य करून जातो राव.

आॅनलाईनचा घोळ, ‘नेमोची येतो मग पावसाळा’प्रमाणे नित्यनेमाने होतो, त्यातून अनेकांना प्रवेशही मिळतात आणि मग कधीतरी अशा प्रवेशाची मुदत संपते. मनचाह्या काॅलेजात प्रवेश मिळालेले खुष असतात तर हवं ते काॅलेज न मिळालेले नाराज. कुठेच प्रवेश न मिळालेलेही कमी असतील, पण असतात. ज्यांना मार्कांच्या जोरावर हवा त्या काॅलेजात प्रवेश मिळतो त्यांचं ठिक आहे, पण ज्यांना तसा प्रवेश मिळालेला नसतो किंवा ज्याना अजिबात प्रवेश मिळालेला नसतो, त्यांच्यासाठी मग खास भारतीय खेळ सुरु होतो, त्या अमुक-तमुक काॅलेजात “कुणाची ‘ओळख’ आहे का”?

‘ओळख’. आपल्या देशातील एक प्रचंड ताकद असलेला परवलीचा शब्द. प्रशासनाचा पोलादी पडदा असो किंवा कडक नियम असो, अहो एवढंच कशाला, अति संवेदनशील ठिकाणची सुरक्षा यंत्रणा असो, सर्वप्रकारचे चक्रव्युह भेदण्याची ताकद ‘ओळख’ या शब्दात आहे. इतर कुठल्याही देशांप्रमाणे आपला देशही नियमांवर चालतो. खरं तर नियमांवर चालतो असं म्हणायचं, परंतू तो चालतो ‘ओळखी’वर. ओळख असली की मग तुमच्याकडे काही नसलं तरी बिनधास्त राहायचं, तुमचं काम होणारच. अशी एकदा एखाद्या ओळखीच्या माणसाची ओळख निघाली, की मग ‘गांधीं’ची ओळखही दुय्यम ठरते.

शाळा-काॅलेजातील प्रवेश असो किंवा आणखी कोणतंही काम असो, आपण सवयीनुसार त्या प्रवेशाचे किंवा काम होण्यासाठी नियम काय आहेत, कागदपत्र काय लागणार आहेत याची माहिती घेतो, योग्य ती तयारीही करतो, परंतू जिथे प्रवेश घ्यायचाय किंवा जिथं काही काम आहे, त्या ठिकाणी काही ओळख आहे का याची सर्वात पहिली माहिती घेतो. आपल्या देशात नियमापेक्षा ओळखीनेच कामं होतात यावर आपला अनुभवसिद्ध विश्वास असतो आणि तो खराही असतो. ओळख असली, की नियम तोडले जात नसले, तरी कमाल मर्यादेपर्यंत वाकवले जातात याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी न कधी घेतलेला असतो. कामं नियमानं व्हावीत याचा आग्रह आपण सर्वच आपापल्या सोयीने धरत असतो परंतू वेळ आली, की ओळखीची कासंही आपण साळसुदपणे धरत असतो. तिथं मग तत्व वैगेरे गुंडाळून ठेवली जातात. पाश्चात्य देशात कशी सर्व कामं नियमानं होतात आणि नियम सर्वांना सारखेच असतात याचं वर्णन आपण तिखटमिठ लावून करतो, परंतू आपल्यावर वेळ येताच नियमाला बगल देण्यासाठी आपणही ओळख शोधतोच. ओळख आणि पेशन्स असले की कुठल्याही काॅलेजात कशाला, कुठंही प्रवेश मिळतोच आणि कामंही होतात.

‘तिळा तिळा दार उघड’ या अलिबाबाच्या परवलीच्या शब्दासारखा आपल्याकडे ‘ओळख’ हा शब्द आहे. बायको बाळंत व्हायची वेळ आली, की डाॅक्टर, हाॅस्पिटल शोधलं जाते ते ‘ओळखीचं’च, मुल जन्मल्यावर जन्म दाखल्यासाठी मुनिसिपालीटीत ‘ओळख’ शोधली जाते. हा सिलसिला जीवनाच्या सर्वच टप्प्यांवर सुरू राहातो व मृत्युनंतर डेथ सर्टीफिकेट देण्यासाठी ओळखीचा डाॅक्टर व नंतर स्मशानात नेण्यासाठी तिकडचा स्मशान क्लार्क व लाकडं काढून देणाराचीही ओळख काढली जाते. स्मशानातल्या तिन-चार चितांपैकी चांगली(?) चिता मिळावी यासाठी ओळख काढलेले महानुभावही माझ्या माहितीत आहेत.

एक मात्र आहे, ओळख ही प्रत्येक वेळी नियम वाकवण्यासाठीच काढली जाते असं नाही. बऱ्याच वेळा ती आपलं काम पटकन व्हावी यासाठी काढली जाते. नागरीकांचं कोणतं काम किती वेळात व्हावं याचं ‘सिटीझन चार्टर’ हा हल्ली हल्ली आलाय, याच्या किती तरी अगोदरपासून ‘ओळख’ हे काम बिनबोभाट करत आलीय. गम्मत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपली ओळख असतेच असं नसलं, तरी आपला कोणीतरी त्या ठिकाणी ओळख असणारा मिळतोच. नुसती ओळखच नव्हे, तर त्याचं कुणीतरी ‘खास’ त्या ठिकाणी असतंच, याचं मला नेहेमीच आश्चर्य वाटत आलं आहे. ‘प्रत्येक भारतीय माझा बांधव आहे’ हे एरवी अनुभवायला न येणारं प्रतिज्ञा वचन किंवा पृथ्वी गोल आहे किंवा आपले सर्वांचे हजारो वर्षांपूर्वीचे पूर्वज एकच होते, हे सत्य मात्र या वेळी अक्षरक्ष: हटकून अनुभवायला येतं.

आपल्या देशात नियमांपेक्षा ओळखीनेच कामं होतात यावर माझा विश्वास आहे. नियम सारखेच असले, तरी त्या पलिकडच्या खुर्चीत बसलेला बाबु त्याचा कसा अर्थ लावेल हे ब्रम्हदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही, तिथं आपली काय कथा..! इथं ओळख कामाला येते. ओळखीची जादुची छडी एकदा का त्या बाबुवर फिरली, की मग तुमचं काम झालंच म्हणून समजा. मग नियमांचा बागुलबुवा मवाळ होतो. एखादा कागद कमी असला, तरी ‘तो नंतर द्या’ इथपर्यंत विश्वास ठेवला जातो व आपलं काम झालेलं असल्यानं, नंतर तो कागद द्यायचा आपण विसरतो आणि घ्यायचा तो ही विसरतो.

नियम असले, तरी ते राबवणारा माणूसच असतो आणि एकदा का ह्या हृदयाचं कनेक्शन त्या हृदयाशी जोडलं गेलं, की जीवा-शिवाची गाठ पडून मग नियम वैगेरे दुय्यम बनतात हे आपल्या देशात तरी अनुभवायला येतं. ‘अयमात्मा ब्रह्म। सोऽयं त्वयि च मयि च।’ अर्थात, हाच आत्मा ब्रह्म आहे. तो तुझ्यातही आहे आणि माझ्यातही आहे. जे तत्व तुझ्यात आहे, तेच माझ्यात आहे आणि तेच तत्व यत्र तत्र सर्वत्र असलेल्या सजिवांत आहे हे भारतीय तत्वज्ञान इथं अनुभवायला येतं असं मला तरी वाटतं. ‘ओळख’ ही त्या तत्वाचंच एक स्वरूप असावं. यामुळेच माझा देश कसाही, मागासलेला असला तरी मला जिवंत वाटतो आणि पुढारलेले देश नियमांच्या प्रोग्रामवर चालणारे रोबो..

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..