पुढे जाण्यापूर्वीच पहिला खुलासा करतो, ‘जाकिट’ म्हणजे दिल्लीच्या मोदींपासून एखाद्या फुटकळ गल्लीतला राजकारणात असलेला कुणीही वापरतो ते. आणि अर्थातच पुरुषांचेच..!
अंगात, स्वत:ला शोभो अथवा न शोभो, जाकिट हा राजकारणाचा ‘युनिफाॅर्म’ झालाय हल्ली. नाक्यावर नेहेमी उभा चकाट्या पिटत उभा असलेला एखादा रिकामटेकडा, अचानक जाकिटधारी झालेला दिसला, की मी समजतो, की हा आता ‘मार्गा’ला लागला आणि त्या परिसरातल्यांची ‘वाट’ लागली. पूर्वी एखाद्या महत्वाच्या पदावरच्या नियुक्तीची माहिती जनतेला दवंडी पिटवून देत, आता जाकिट घालून व तसा फोटो असलेला बॅनर लावून देतात.
राजकारणात माझ्या लहानपणी राजकारण हा आताएवढा लोकप्रिय उपक्रम नव्हता. ते तेंव्हा खरोखर लोकसेवेचं व्रत होतं आणि सेवा करणं तेंव्हा खरंच ‘खाण्या’चं काम नव्हतं. लोक खरोखर म्हणजे खरोखर सेवा करत. साधा पांढरा सदरा-लेंगा, एखादी शबनम व क्वचित कुणाच्या डोक्यावर पांढरी गांधी टोपी, हा तेंव्हाच्या राजकारणात असलेला सर्वमान्य गणवेश होता. या गणवेशाला आदर होता आणि त्याचा प्रसंगाला आधारही वाटायचा. हा गणवेश बस, यश्टीतून फिरायचा आणि सोबत पीए, बाॅडीगार्ड असली काही दिखावूगिरीची थेरं नव्हती. बाॅडीगार्ड ठेवतीलच कशाला, त्यांच्याबद्दल लोकांना भिती नव्हती तर आदर होता. ज्यांच्याबद्दल आदर असतो त्याचे पाय धरले जातात, ओढले जात नाहीत.
आता मात्र मात्र परिस्थिती पार बदलली. सेवेच्या नांवाखाली मेवाच दिसू लागला. मेवा प्रथम व नंतर जमलंच तर सेवा. सेवाही प्रथम घरच्यांची, लांब-जवळच्या नातेवाईकांची. का, ते काय नागरीक नव्हेत, हे आणखी वर कारण. खरंच आहे ते, मुलं-नातेवाईक नागरीकच आहेत, मग त्यांची जनतेची म्हणून प्रातिनिधिक सेवा केली तर काय बिघडलं? पूर्वीच्या सदऱ्याला दोन बाजूला दोनच खिसे असत, आताचं जाकिट मात्र बाहेर तिन-चार व आतल्या बाजूनेही तेवढेच खिसे असतात. ‘सेवे’चा परिघ वाढल्यावर येवढे खिसे हवेतच नाही का?
शबनमची जागा पीएने घेतली. पूर्वी एखादा कागद आला की निगुतीने वाचून शबनममधे ठेवला जायचा व त्याचा पाठपुरावाबी केला जायचा, आता तो पीएच्या डायरीत व नंतर पुढे कुठं जातो ते माहीत नाही अशी परिस्थिती. काही लोकांची सेवा करायची तर काही लोक नाराज होणारच. ते म्हणतात ना, ‘लोकशाहीत यू कॅन नाॅट सॅटीसफाय आॅल द पिपल आॅल द टाईम’. आताच्या *’लेकशाही’*त ( ही टायपिंग मिश्टेक नाही बरं का) जे नाॅन सॅटीसफाय आहेत त्यांच्यापासून धोका राहाणारच, मग बाॅडीगार्ड्स नको का? हल्ली कोणतीही सार्वजनिक वापराची गोष्ट ‘लोकार्पण’ नव्हे, तर ‘लेकार्पण’ करतात. एखाद्या अक्षराचा काना अतिवापराने झिजून (म्हंजे गळून) जाऊ शकतो असं भाषाशास्त्र सांगते, म्हणूनच कदाचित ‘लोक’चं ‘लेक’ झालं असावं आणि त्यात काय चुकीचं नसावं असं मला वाटतं. सर्वांनाच वाटत असावं आणि सर्वांना वाटतं ते चुकीचं कसं बरं असेल..?
पूर्वी राजकारणात यायचं तर खरोखर xx घासायला लागायची. आता फक्त एक समर्थ गाॅड ‘फादर’ असला व एक जाकिट घातलं, तर मग काहीही कर्तुत्व नसलं तरी चालतं. किंबहूना एकदा का जाकिट घातलं, की काही करायचंच नसतं. तुम्ही आपोआप थेट वयानुसार नेते, युवा नेते वैगेरे होता, वकूब असायलाच हवा असा काही आग्रह नाही.
मला जाकिट न घातलेला राजकारणी, हल्ली राजकारणी वाटतच नाही. आणि जाकिट घातलेला स्वच्छ आहे असंही वाटत नाही. यामुळे मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभू, चंद्रकांत पाटील वैगेरे मंडळी मला माझ्यासारखीच सामान्य व माझी वाटतात तर बाकी जाकिटधारींबद्दल उगाच काहीतरी वाटते. बहुतेक ‘जाकिट फोबिया’ नांवाच्या आजाराची लागण मला झाली असावी असा संशय माझ्या डाॅक्टरांनी मागे अस्पष्टसा बोलून दाखवला होता.
तसं जाकिट दिसतंही छान (हे मी मोदींबद्दल म्हणतोय, इतरांबद्दल नाही. प्रत्येकाची सौंदर्यदृष्टी वेगळी असते.). म्हणून कदाचित हल्ली, लग्नातही जाकिट घालायचा ट्रेन्ड जोरात आहे. ‘जाकीट’ आणि ‘पाकिट’ यांचा काहीतरी संबंधं नक्की आहे, हा माझा समज लग्नसमारंभात अगदी दृढसमज होतो. काही तरी डाक्टरी इलाज आता करायलाच हवा आता माझ्यावर, नाहीतर माझ्या जगण्यातली चव बिघडून जाईल.
अरे होऽऽ, चवीवरून आठवलं, आताचा हा राजवेष माझ्या लहानपणी मी फक्त ‘मिठवाल्या’च्या अंगात बघीतला होता. जाकिट हे मिठवाल्याचं अविभाज्य अंग होतं. किबहूना, कुणी जाकिटवाला दिसला, की तो मिठवालाच असणार हे समिकरण त्या वेळी मनात चटकन उभं राहायचा. डोक्यावर टोपली, टोपलीत जाडं, खड्याचं मिठ ( तेंव्हा आयोडीन वैगेरेची गरज नव्हती. डाॅक्टर आयोडीन जखमेवर लावतात येवढंच माहीत होतं, ते पोटातही घ्यायचं असतं हे टिव्हीमुळे कळलं. टिव्ही नसता तर आपण मागासलेलेच राहीलो असतो असं मला वाटतं.) आणि, “अॅऽऽड्या इंठ्ठ” अशी न समजणारी परंतू तो मिठवाला आहे याची ओळख देणारी आरोळी ठोकत तो सकाळी १० ते ११ च्या दरम्यान तो यायचा. ही सकाळची जेवण बनवायची वेळ. बरोबर ती वेळ साधून तो यायचा.
तो मिठवाला जाकीटधारी त्या वेळी जेवणाची वाढवायचा आणि आताचे जाकीटधारी मात्र जीवनाची चव बिघडवतात असं मला वाटतं.
जाकीट तेच पण परिणाम किती विरूद्ध नाही..?
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply