कालचा माझ्या घरातला प्रसंगं. वेळ रात्री ११.३० ची. माझा मुलगा शौनक या वर्षी इयत्ता १२वी/सीईटी पास झाला, त्याचा आॅनलाईन रजिस्ट्रेशम फाॅर्म भरायचा माय-लेकराचा समरप्रसंग सुरू होता. आॅनलाईन फाॅर्म भरणं आणि तो तसा भरत अस्ताना ती ती पात्र पाहाणं, हा एक युद्धापेक्षा कमी प्रसंग नसतो आणि म्हटलं तर मनोरंजनाचा सोहळाही असतो. मी या बाबतीत ‘आऊट आॅफ डेट’ झाल्यामुळे माझी बहुश्रुत पत्नी, नुकतीच उच्चशिक्षीत या कॅटेगरीमधे जागा मिळालेलं कन्यारत्न आणि स्वत: उत्सवमुर्ती मुलगा, हे सर्व मला या युद्ध-कम-मनोरंजन प्रकारापासून दूरच ठेवतात.
तुमचं माहित नाही, पण मी हा प्रकार छान एन्जाॅय करतो. आॅनलांईन फाॅर्म भरणं हा तसा संगणकाचं थोडंफार ज्ञान असणाराला अत्यंत सोपा प्रकार आहे. पण प्रश्न काॅलेजमधील अॅडमिशनचा असल्याने, हा सोपा प्रकार आपल्याला उगीचच गुंतागंतीचा वाटतो. भरलेली माहिती चुकीची आहे असं सारखं वाटत असतं त्यामुळे वारंवार तपासणी करत राहावं लागतं व त्यात काही चुकीचंही नाही. असंही हल्लीचे दिवसं आपण बरोबर वागत असलो तरी, चुकीचे वागतोय की काय, असं वाटण्याचेच आहेत, त्यात आणखी एक भर.
तर, फार्मचे सर्व रकाने भरून व चार चार वेळेस तपासून झाले आणि मुलगा, मुलगी व पत्नी यांची गाडी ‘जात’ या टाळावा म्हटला तरी न टाळता येणाऱ्या प्रकारापाशी येऊन बंद पडली. म्हणजे गाडी चालुच होती, पण पुढे सरकत नव्हती. त्यांची आपापसात त्या रकान्यात काय भरावं याची गहन चर्चा सुरू झाली व काहीच न सुचल्यानं ते सर्व खटलं निर्णयासाठी माझ्या कोर्टात आलं.
या आॅनलाईन रजिस्ट्रेशन फार्ममधे ‘जात’ हा काॅलम येतो, तिथं आपण आपली जात लिहायची हा खरं तर साधा सोपा प्रकार. मी म्हटलं, की लिही ‘हिन्दू’ म्हणून. मग उत्तर आलं की तो धर्म आहे म्हणून. ते ही बरोबर आहे. मग मी मुलाला म्हटलं, की जे सर्टीफिकेटवर लिहीलं आहे तेच लिही, मग व्हेरीफिकेशनच्या वेळेस अडचण नको. अॅक्चुअली, माझ्या मुलाची, मुलीची व पत्नीची वास्तविक अडचण हीच होती, माझ्या दोन्ही मुलांच्या जन्मदाखल्यावर / शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्म आणि जात या सध्याच्या अतिमहत्वाच्या रकान्यात फक्त ‘हिन्दू’ असं लिहीलेलं आहे, जात लिहीलेलीच नाही. म्हणजे शाळेतून तसा आग्रह असुनही मी तसं काही लिहीणं हट्टाने नाकारलं होतं, कारण मुलांनी अभ्यासाच्या आधारावर पुढं जावं, जातींच्या कुबड्यांवर नाही असं माझं ठाम मत होतं व आहे. माझं ‘जात नको’ हे मत असं पुढे अडचणीचं ठरेल ह्याची काही कल्पना त्यावेळी आली नव्हती.
असो, मी म्हटलं, की “तू लिही हिन्दू म्हणूनच, जे आहे ते लिहावं.” इथं त्यांच म्हणणं पडलं, की “जात तर लिहीलीच पाहीजे, नाही तर माझं अॅडमिशन अडचणीत येईल.” मी म्हटलं, की “अरे तुला इतके उत्तम मार्क्स आहेत, तर तुला ‘जाती’मुळे अडचण येणारच नाही. आपण जातंच लिहीली नसल्याने आणि आपण जातीसाठीच्या रिझर्वेशनचाही कोणताही फायदा घेत नसल्याने, आपल्याला जातीची कोणतीही खरी-खोटी सर्टिफिकेट्सही गोळा करायची गरज नाही. आपल्याला तर केवळ आपल्या उत्तम मार्कांवरच प्रवेश मिळणार, तो ही मुंबईच्या पहिल्या तिन सर्वोत्तम काॅलेजमधे”. त्याला ते पटल्यासारखं वाटलं, पण इथं सरकारी अधिकारी असलेल्या माझ्या पत्नीचं सरकारीपण जागं झालं. खरंतर तिलाही माझं म्हणणं पटलं होतं, पण तिची अडचण वेगळीच होती. ती म्हणाली, “व्हेरीफ्केशनच्या वेळेस जर तुम्ही काहीच ‘जात’ लिहीलेली नाही असं त्या सरकारी अधिकाऱ्यांनी आॅब्जेक्शन काढलं तर काय करायचं? तुम्ही फायदा घ्या अथवा नका घेवू, पण जात लिहीणं कम्पलसरी आहे असं म्हणाले तर काय?”. तिच म्हणणं विचार करण्यासारखच होतं. सरकारी बाबु कुठे अडवतील आणि कुठे नाही, हे प्रत्यक्ष बुद्धीदात्या परमेश्वरालाही सांगणं अवघड, तिथं आपली काय कथा?
इथं काहीतरी निर्णय घेणं भाग होतंकारण कंम्प्युटर जात लिहील्याशिवाय पुढे जात नव्हता. खरं तर कंम्प्युटर हे स्मार्ट मशीन, लाॅजिक वापरून निर्णय घेतं अशी त्याची ख्याती, पण त्याचं प्रोग्रामिंग करणारी त्याच्याहून स्मार्ट पण लाॅजिकच्या आघाडीवर माठ असलेली डोकी ‘जाती’त अडकलेली, त्याला काय करणार. शेवटी मी ‘जात’ या रकान्यात दाखल्यावर असल्याप्रमाणे हिन्दू असं लिहीण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलाला सांगीतलं, की त्याला अॅडमिशन मिळवून देण्याची जबाबदारी माझी. आपण जे काही लिहीलंय ते जर कोणी नाकारलं तर मी कोर्टात जाईन व तिथेही नाही टिकलो तर मग तुला रिक्शा-टॅक्सी चालनायला सांगेन, ते ही नाही जमलं तर घरात बसवून ठेवेन पण जातीच्या आधारावर प्रवेश घेणार नाही. दुसरं मी काय करू शकणार?
आपल्या देशात जात नको असं हट्टाने म्हणण्याच्या इतक्या अडचणी, त्या ही एकवीसाव्या शतकात, येतील हे खरंच वाटत नाही. महासत्ता वैगेरेचा विजय असो. जयहिन्द..!!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply