नवीन लेखन...

मन कि बात – नवीन वर्ष..

उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही..पण होतं काय की, गोड आठवणी आपण चटकन विसरतो आणि कटुता मात्र हृदयाशी कवटाळून ठेवतो..व ह्या कडू आठवणी घेऊनच आपण नवीन वर्षात प्रवेश करत असतो.. गेले काही दिवस सरणाऱ्या वर्षात काही चुका झाल्या असतील तर माफ करा असं सांगणारे भावनाहीन आणि कॉपी -पेस्ट केलेले मेसेज सर्वच दिशेहून येत आहेत व आपणही ते बॅडमिंटनचं कॉक ज्या त्वरेनं पलीकडे टोलवावं त्या त्वरेनं पुढे फटकावत आहोत..ह्या अश्या गुळगुळीत झालेल्या मेसेजेस मुळे त्यातील्या भावना संपून गेल्यात आणि उरलीय फक्त फॉर्मालिटी..

कडूपणा विसरावा आणि चांगुलपणा जपून ठेवावा हे सर्वच संत-महात्मे सांगून गेलेत. पण संत-महात्म्यांच ठीक आहे हो, आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते नाही जमत.. असं विसरणं शक्य असतं तर जगातली सर्व दु:खं कधीचीच संपून गेली असती आणि उरला असता नुसता गोडगोडपणा ज्यात अजिबात मजा नाही..असं विसरणं शक्य नाही आणि शक्य होऊही नये…विसरायला आपण देव नाही, आणि म्हणून मनुष्याने मनुष्यासारखं वागावं आणि सारं काही काळावर सोडून द्यावं, त्यातच मजा आहे कारण आपण जे विसरायचा प्रयत्न करतो तेच हटकून लक्षात राहातं..सरत्या काळानुसार त्याचं ठुसठुसणं कमी होत जातं..आणि असं विसरणं शक्य असतं तर प्रत्येक दिवस नवीन वर्ष झाला असता आणि मग वर्षाच्या त्या बदलणाऱ्या आकड्यांना काही वेगळे आकडे या पलीकडे महत्व राहिलं नसतं..

तसं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात रोज नवीन असं काय घडणार? तरीही रात्रीच्या वेळेत जगातले सर्व खड भटकून पुन्हा नव्याने आपल्यासमोर उगवलेला जुनाच सूर्य दररोज नवीन असं काहीतरी घेऊन येतच असतो. आपले आई-वडील कसे प्रवासावरून येताना आपल्यालाठी काहीतरी घेऊन येतात तसा..फक्त रोजच्या धावपळीत आपण डोळे आणि मन उघडे ठेवून ते पाहत नसतो एवढंच आणि कदाचित म्हणूनच नवीन वर्षात चांगलं काहीतरी (म्हणजे आपल्या फायद्याचं) घडेल या आशेने आपण नवीन वर्षाच्या सूर्याच स्वागत करत असतो..आपण तेच, आपल्या आजूबाजूचे सखे-सोबती आणि शत्रुही तेच, फरक फक्त वर्षाच्या बदललेल्या आकड्याचा, त्या बदललेल्या आकड्यामुळे नवीन काहीतरी चांगलं घडेल या अपेक्षेचा ..

उम्मीद पे दुनिया कायम है, आशा अमर आहे आणि म्हणून जीवन जगण्यात मजा आहे..नवीन वर्षातही अपेक्षेचं आणि त्यातून येणाऱ्या अपेक्षाभंगाचे प्रसंग येणारच नाहीत असं नाही..परंतु सरत्या वर्षाच्या सोबतीने वाढलेल्या वयाने तेवढा समजूतदारपणा आलेला असतो..हा समजूतदारपणा सोबतीला असला की मग कटूता कमी होते नि रोजचा सूर्य नवीन दिसायला सुरुवात होतो..

तुम्हा सर्वाना रोजचा जुनाच सूर्य रोज नवीन होवून भेटो आणि मग रोजचा दिवस नवीन वर्ष होवो या नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

– नितीन साळुंखे
9321811091
astroganesh.in
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..