MENU
नवीन लेखन...

माणसं काळजात उतरलेली..

अमरजित आमले; चित्रपटांत जाऊ इच्छिणाऱ्या ‘वेड्यां’चं आयुष्य घडवण्यासाठी स्वत:चं आयुष्य उधळवलेला एक ‘मिशनरी’..

अमरजित माझा मित्र. आमची ओळख बँकेत झाली. एकाच बँकेत आम्ही नोकरीला. तो दादर शाखेत तर मी पार्ले शाखेत. हो अगदी सरधोपट आणि अगदी फॉर्मल ओळख झाली. खरं सांगायचं, तर अमरची ओळख करून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे, कारण हे व्यक्तिमत्व मला नेमक्या शब्दात पकडता येईल कि नाही, याची मलाच खात्री नाही.

अमरला चित्रपट आणि चित्रपटाची दुनिया या विषयी अतोनात आकर्षण. आपल्यालाही अनेक आकर्षणं असतात आणि ती वयपरत्वे बदलतही असतात. पुढे जगण्याचे टक्के टोणपे खाताना सगळीचं आकर्षणं लुप्त होऊन केवळ ‘दिवस ढकलण्या’चंच काम बहुतेकजण करताना दिसतात. अमर मात्र आपल्या चित्रपटाच्या आकर्षणावर कायम राहिला. कसंही चित्रपटात काम करणं हेच त्याचं ध्येय होते. बँकेत निम्न स्तरावर काम करताना तो त्याची ही हौस नेहेमी बोलून दाखवायचा. त्याचं वागणं, बोलणं, राहाणं जणू काही तो एखादा बडा फिल्लम स्टार असावा असंच असायचं. चित्रपटाच्या वेडाने पछाडलेले असे अनेकजण आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात, त्यातलाच एक असं समजून आम्ही अमरला गांभीर्याने कधी घेतलं नाही.

अशातच एक दिवस बातमी आली, की अमरने नोकरी सोडली. चित्रपट क्षेत्रासारख्या अत्यंत बेभरवशाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बँकेसारखी सुरक्षित नोकरी सोडणं, हे मला तरी तेंव्हा वेडापेक्षा वेगळं काही वाटलं नव्हतं. पुढे बराच काळ त्याच्याशी संपर्क नव्हता. परिस्थिती अत्यंत गरीब, त्यामुळे काय करत असेल, कसं जमत असेल असं कधीतरी वाटायचं, पण ते तेवढ्यापुरताच..

अमरने नोकरी सोडली, आमचा संपर्क तुटला. अधून मधून अमरला कुठेतरी संधी मिळाल्याची बातमी कोणीतरी देई, पण तो विषय तिथेच थांबे. मग एक दिवस अशीच बातमी आली, की अमरला ‘जजंतरम ममंतरम’ या मोठ्या हिन्दी चित्रपटात मोठं काम मिळालं म्हणून. साल असावं २००३-०४. या चित्रपटात जावेद जाफरींचा प्रमुख भुमिकेत तर सेकंड लीड मधे अमर होता. आम्हालाही बरं वाटलं की अमरची गाडी मार्गावर आली म्हणून. पुढे पुन्हा संपर्क तुटला, पण अधून मधून बातम्या यायच्या की अमर या चित्रपटात आहे आणि त्या चित्रपटात आहे. रोल किरकोळ असायचे आणि अमरच्या नांवाचा बोलबालाही नसायचा..

पुढे बराच काळ वाहून गेला. दरम्यान अमर विस्मृतीत गेला.. २००७ साली मी बँकेच्या बदल्यांच्या नोकरीला कंटाळून राजीनामा दिला. अर्थात, माझा राजीनामा आणि अमरने काही वर्षांपूर्वी दिलेला राजीनामा, यात जमीन अस्मानाचा फरक होता. मी अधिक चांगली संधी, पण नोकरीच मिळावी म्हणून राजीनामा दिला होता, तर अमरने त्याच्या छंदासाठी राजीनामा दिला होता. आमच्या दोघांचीही क्रिया एकाच असली तरी त्याच्या गुणवत्तेत जमीन अस्मानाचा फरक होता, अर्थात, हे मला पुढे जाऊन लक्षात आलं. तो पर्यंत माझ्या मते अमर वेडाच होता.

नंतरची माझी अमरशी गाठ पडली ती थेट २०१२ साली. कणकवलीचे तत्कालीन आमदार श्री. प्रमोद जठार यांनी २०१२च्या जुलै महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुला-मुलींसाठी एक ‘फिल्म अप्रिसिएशन’ शिबिर आयोजित केलं होतं. संपूर्ण सिंधुदुर्गच कशाला, पार कोल्हापूर-सोलापुरातून सिनेमाविषयी आकर्षण असलेले शिबिरार्थी या शिबिरात सहभागी होण्यासाठी आलेले होते आणि त्यांची वयं होती १८ ते ६० दरम्यानची. शिबिर दोन रात्रींचं आणि मार्गदर्शन करणार होते ज्येष्ठ नाट्य-चित्र निर्माते दिग्दर्शक श्री. पुरुषोत्तम बेर्डे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिल्म समीक्षक श्री. अशोक राणे, चतुरस्त्र अभिनेते व कवी श्री. किशोर कदम ‘सौमित्र’ आणि ज्येष्ठ कवी नलेश पाटील. मी श्री. जठारांच्या वतीनं या शिबिराचा आयोजक/निमंत्रक होतो.

‘सिनेमा कसा पाहावा’ या विषयावरचं हे अत्यंत वेगळं आणि सुंदर शिबिर सुरु असतानाच अचानक अमर तिथे अवतरला. प्रमोद, मी व अमर, आम्ही तिघेही एकाच बॅंकेत काम केलेले व म्हणून एकमेंकांचे मित्र. या शिबिराच्या दरम्यान तो मित्र म्हणूनच आला होता. त्याला शिबिराची काहीच कल्पना नव्हती. अमर फिल्म क्षेत्रात असल्याची आम्हाला माहित असल्याने, प्रमोदने बेर्डे सरांना विनंती केली, की अमरला मुलांशी थोडा वेळ बोलू द्यावं म्हणून. आणि पुढे काही वर्षांनी अमरने सिंधुदुर्गात एक इतिहास घडवला. पुढची कथा त्याच इतिहासाची आहे..

फिल्म ॲप्रिसिएशन शिबिर झालं आणि आम्हाला अमरच्या फिल्मविषयक ज्ञानाच्या डेप्थचा अंदाज आला. आम्ही समजत होतो तसा अमर काहीतरी किरकोळ रोल करुन आपली आवड पूर्ण करणारा अभिनेता नसून, हे काहीतरी वेगळंच आणि भन्नाट प्रकरण दिसतंय, असं आमच्या लक्षात आलं. प्रमोदने अमरला जिल्ह्यातील फिल्मवेड्या मुलांसाठी एक स्वतंत्र कार्यशाळा घेण्याची विनंती केली. अमरच्या आवडीचंच काम ते. त्याने लगेच होकार दिला. १५ दिवसांचं निवासी शिबिर करायचं ठरवलं. खर्चाचा सर्व भार प्रमोदनेच उचलला. तारीख- वेळ ठारली. पेपरात जाहिराती सुटल्या आणि सिंधुदुर्गातील फिल्मवेड्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. इच्छूक मुला-मुलींचा अमरनेच वैयक्तिक इंटरव्ह्यू घेतला आणि ठराविक २०-२५ मुलं निवडली आणि ठरलेल्या दिवशी शिबिराला सुरुवात झाली.

शिबिराला आलेली सर्व मुलं, चित्रपट, त्यातही स्वत:ला मोठ्या स्क्रिनवर पाहण्यात, पिटातल्या पब्लिकने आपल्याला डोक्यावर घेतलंय अशी भाबडी स्वप्न डोळ्यात साठवून घेऊन आलेली. अमरने पहिलं काय केलं असेल, तर त्यांना स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात आणलं. अमर त्यातल्या प्रत्येकाशी बोलला. त्या शिबिरार्थीचं अंगभूत पोटेन्शिअल माहित करुन घेतलं. त्यांच्यातील सुप्त गुणांना माहित करुन अमरने त्यातील मुलांना काम वाटून दिलं. एका-दोघांना स्टोरी रायटींग दिलं. एका-दोघांनी दिग्दर्शन करायचं. दोघांनी मिळून म्युझीक कंपोज करायचं. एका टिमनं कास्च्यूम तर एका टिमनं लायटींग सांभाळाची. ज्याच्या अंगात अभिनयाचं कसब दिसलं त्यांनी अभिनय करायचा, अशा अमरच्या आज्ञा सुटल्या.

कामं तर वाटून दिली, पण ती कशाशी खातात याची कोणाला माहिती? सर्वच ग्रामिण भागतली राॅ मुलं. चित्रपटाचं जबर आकर्षण हेच समान सुत्र. मग अमरची टिम मुंबईतना आली. त्यात प्रत्येक क्षेत्रातला जाणकार होता आणि सर्वांचा मुख्य होता अमर. मुलांचं खडतर प्रशिक्षण सुरू झालं. शिबिरातून ३०-३५ मिनिटांच्या एका लघु चित्रपटाची पूर्व तयारी करायची ठरली. शाॅर्ट फिल्मची भाषा स्थानिक मालवणीच ठेवायची ठरली कारण त्या मुलांची ती मातृबोली होती. स्टोरीवाल्यांना त्यांच्या मनानेच एक गोष्ट रचायला सांगीतली. त्याने लिहिलेल्या स्टोरीवर अमरने संस्कार केले. अक्षरक्ष: एका ओळीची कथा अर्ध्याएक तासांच्या चित्रपटात कशी रुपांतरीत करायची याचं अत्यंत कठोर प्रशिक्षण अमर आणि त्याच्या टिमने दिलं. त्यांच्याकडूनच कथेतली पात्र आणि त्यांचे मालवणीतले संवाद लिहून घेतले. हाच प्रकार म्युझीकसाठी, गाण्यांसाठी, लाईटसाठी आणि काॅस्च्यूमसाठी केला गेला. गाणं म्हणून स्टोरीशी सुसंगत कोकणातली भजनंच निवडली. कथा कोकणच्याच पार्श्वभुमीवरची. शिबिराच्या शेवटी शिवडी सर्व शिबिरार्थींच्या एकत्र मिटींग सुरु झाल्या. कसलेल्या फिल्म मेकर्सच्या आत्मविश्वासाने मुलं त्यांच्या पहिल्याच फिल्मवर चर्चा करत होती. ती मुलं एका वेगळ्याच आत्मविश्वासाने भारलेली दिसली.

चित्रपटाचं नांव मुक्रर झालं, ‘मुक्ती’..! हे नांव सर्वार्थाने योग्य होतं. कथेच्या अनुषंगाने आणि मुलांना फिल्मविषय असलेल्या कल्पनेतून ‘मुक्ती’ देण्याच्या अर्थानेही. एक तीस-पस्तीस मिनिटांचा लघू चित्रपटाच्या प्रसवकळा सुरू झाल्या..

आता इतक्या दिवसाची मेहेनत पडद्यावर साकारायची, स्वत:ची कलाकृती पडद्यावर पाहायची, तर आता पैसे हवेत. पुन्ह सर्व प्रमोदकडे गेले. प्रमोदने खर्चाचा अंदाज विचारला आणि एका क्षणात होकार दिला. अवघ्या वातावरणात आनंद भरला. मुलांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. चित्रपटाचं चित्रिकरण करण्यासाठी योग्य लोकेशन्सचा शोध सुरु झाला. जवळ१५ दिवस सर्व टिम अख्ख्या जिल्ह्यात लोकेशनस शोधत होती. कथेशी सुसंगत लोकेशन्स कशी शोधायची, याचंही प्रशिक्षण या काळात अमरने मुलांना दिलं. लोकेशन्स मुक्रर झाल्यावर प्रत्यक्ष शुटींग सुरू झालं. शुटींगमधे कॅमेरा कसा हाताळायचा, सिनेमॅटोग्राफी, ॲंगल म्हणजे काय याचं शास्त्रशुद्ध ऑन जाॅब ट्रेनिंग मुलांना अमर आणि त्याच्या टिमने मुलांना दिलं. स्टोरीच्या गरजेप्रमाणे पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत शुटींग सुरू असायचं. अखंड परिश्रमांनंतर शुटींग संपलं. चित्रपट पोस्ट प्राॅडक्शनला गेला. एडीटींग, स्पेशल इफेक्टस कसं करतात यासाठी काही मुलांना पुण्याला पाठवलं आणि ती मुलं नंतर येताना सोबत ४० मिनिटांची ‘मुक्ती’ ही पूर्ण तयार झालेली फिल्म घेऊनच आली. चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला. मुलांच्या आनंदाला तर सीमा नव्हती. निर्मितीची झींग असतेच तशी.

त्याच दरम्यान गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरणार होता. मुलांनी तयार केलेल्या चित्रपटाचं पहिलं प्रदर्शन आम्ही या महोत्सवात देशी-विदेशी चित्रपट तज्ञांसमोर करायचं ठरवलं. चित्रपटाला सेन्साॅरचं प्रमाणपत्र घेतलं. आम्ही आमची एन्ट्री टाकली. आम्हाला चित्रपटात्या महात्सवातल्या प्रदर्शनाची तारीख कळवण्यात आली. एका सिमोल्लंघनासाठी सिंधुदर्गातली चित्रपटाचं स्वप्न पाहाणारी मुलं सज्ज झाली..

अखेर ती संध्याकाळ उजाडली. गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या व इतर देशी-परदेशी जाणकारांच्या उपस्थितीत भव्य पडद्यावर चित्रपट सुरू झाली आणि चित्रपटाच्या सुरुवातीच्याच दृष्यावर चित्रपटाने कडाडून टाळी घेतली आणि पुढची चाळीस मिनिटं मुख्यमंत्र्यांसहीत सर्वांनी तल्लीन होऊन संपूर्ण चित्रपट पाहिला. चित्रपटाला ‘रेड कार्पेट’चा बहुमान घोषीत केला गेला. सिंधुदुर्गातील मुलांनी अमरच्या मार्गदर्शनाखाली बनवल्या पहिल्याच लघुपटाने गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली..मुलं कृतकृत्य झाली..

चित्रपटाच्या क्रेडीट लिस्टमधे, तो तयार करणाऱ्या मुलांचीच नांव होती..निर्माता म्हणून प्रमोद जठार तर सहनिर्माता म्हणून अमरच्या ‘स्पंदन परिवार सिनेमा मुव्हमेंट’ या संस्थेचं नांव होतं. अमरचं स्वत:चं नांव तिथे कुठंही नव्हतं.

या शिबिरातून काय साध्य झालं, असा प्रश्न मनात येणं सहाजिकच आहे. ‘मुक्ती’ची निर्मिती हे अमरचं साध्य नव्हतंच. अमरला मुलांना संपूर्ण चित्रपट क्षेत्राची माहिती करून द्यायची होती. या क्षेत्रात आपण काय करु शकतो याची जाणीव अमरने या शिबिराच्या माध्यमातून त्या मुलांना करुन दिली. या शिबिरातल्या वृषाली खाडीलकरने पुढे मुंबई विद्यापीठात ‘नाट्यशास्त्र’ विषयात उच्च शिक्षण घेऊन ती नाट्यक्षेत्रात स्थिरावली. तर शिबिरात काॅस्च्यूम डिझायनिंगची जबाबदारी घेतलेल्या पूजा गांवकर या मुलीने पुण्याच्या FTI या संस्थेत प्राॅडक्शन डिझायनींगची पदव्युत्तर पदवी घेतली व पुढे फ्रान्सला जाऊन याच क्षेत्रातलं आणखी मोठं शिक्षण घेतलं..बाकीच्यानी चित्रपट हे आपलं क्षेत्र नाही हे ओळखून अन्य मार्ग पकडला..चित्रपट क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना त्यांच्या अंगभूत क्षमतांची ओळख करून देऊन, त्याबर हुकूम शिक्षण घेण्यास भाग पाडणं, हे अमरचं मुख्य साध्य..

चित्रपट क्षेत्रात अमर नेमकं करतो काय, हे कळण्यासाठी मला वरची सर्व कथा सांगणं भाग होतं. आपण पडद्यावर एखाद्या हिरोला रोमान्स करताना पाहातो किंवा एखाद्या हिराॅईनला कंबर हलवताना पाहातो, त्यासाठी त्या पडद्यामागे अक्षरक्ष: शेकडो जणांची सुसूत्र मेहेनत असते, हे अनेक जाणत्यांच्याही गांवी नसते, तिथे चित्रपटापाई वेड्या झालेल्या मुलांची काय कथा. शाहरुख, अक्षय किंवा कतरीना-दिपीकासारखं हिरो-हिराॅईन होणं, हे एकच स्वप्न घेऊन देशभरातून मुलं मुली घरदार सेडून मायानगरी मुंबईच्या दिशेने येतात. स्ट्रगल करतात आणि नंतर निराशेच्या गर्तेत सापडून आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतात.चित्रपटांच्या वेडापायी मुलांनी आपल्या आयुष्याची बरबादी करून घेऊ नये, या एकाच ध्यासाने पाछाजलेला अमर जे काम करतो आहे, त्याला ‘मिशन’ हा एकमेंव शब्द लागू पडतो.

देशभरातल्या शाळा-काॅलेजांत किंवा संस्थाना भेटी देऊन तो चित्रपटवेड्या मुलांना चित्रपट क्षेत्राविषयी नीट माहिती देतो, त्यांना डोळस करतो. या क्षेत्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलं, तर चित्रपट हे करीयर म्हणूनही स्विकारता येतं हे त्या मुलांच्या मनावर बिंबवतो व त्यांना त्याचं मार्गदर्शनही करतो.. वर दिलेल्या कथेतल्या ‘मुक्ती’ सारखी शिबिरं आयोजित करतो, मुलांचा कल ओळखुन त्यांना त्या क्षेत्रात जास्तीचं शिक्षण घेण्यास प्रोत्साहीत करतो. मुलांमधे गुणवत्ता असेल आणि तरीही मुलांच्या घरच्यांचा विरोध असेल, तर त्या मुलांच्या घरच्यांची समजूत काढायचं कामही तो करतो. प्रसंगी वर्गणी काढून त्या मुलांच्या फिचीही व्यवस्था करतो..

यासाठी तो कोणाकडूनही मोबदला घेत नाही, कुणी काही देऊ केलंच, तर प्रवास भाडं, ते ही एसटीच्या लाल डब्याचं. कुणी प्रशिक्षणाच्या काळात राहायची सोय केली तर ठिक, नाहीतर रात्रीचा प्रवास करायचा आणि रात्र गाडीत काढायची..सतत पायाला भिंगरी लावून घेतलेला अमर या क्षेत्रातला ‘मिशनरी’च म्हणावा लागेल. मिशनरी जसे कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता आपल्या ध्य्याच्या दिशेने पुढे जात असतात, अमरही तेच करतो..मोबदल्याची कोणतीही अपेक्षा न ठेवता चित्रपटापायी वेड्या झालेल्या मुलाना त्यांच्या आवडीच्या चित्रपटक्षेत्रातच, परंतू सन्मानाने जगायचं कसं, ते अमर शिकवतो. या क्षेत्रात त्याने स्वत: जे भोगलंय, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी स्वत:चं आयुष्य या अवलीयाने पणाला लावलंय..

अमरच्या ‘स्पंदन परिवार सिनेमा मुव्हमेंट’चे आज अनेक सदस्य आहेत. डाॅक्टर, इंजिनिअरींगचं शिक्षण घेत असलेल्या मुलांपासून ते फेरीवाले, रिक्शावाले ‘स्पंदन’चे सदस्य आहेत. सदस्य होण्यासाठी अट एकच, चित्रपटाचं पॅशन..! ‘स्पंदन’च्या मिटींग्स शिवाजी पार्कच्या उघड्या मैदानात मोकळ्या आभाळाखाली..’मुव्हमेंट्स’ खुल्या मैदानातच होत असतात, एसी हाटेलात बसून दारू पीत करायची ही गोष्टच नव्हे..

उत्तम कवी, प्रतिभावंत लेखक आणि तितकाच नॅच्युअर्ड अभिनेताही असलेल्या अमर आणि त्याच्या ‘स्पंदन परिवार’वर ‘सत्यमेंव जयते’ या अमिर खानची मालिका बनवणाऱ्या सत्यजीत भटकळांनी डाक्युमेंटरी बनवलीय ती काय उगाच नव्हे..

अमरने तयार केलेली अनेक मुलं एफटीआय, मुबंई विद्यापीठ सारख्या चित्रपटांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या प्रतिष्ठीत संस्थांत नाट्य-चित्रपटांचं उच्च शिक्षण घेत आहेत. अनेकजण शिक्षण घेऊन चित्रपटातील अनेक क्षेत्रात स्थिरावली आहेत, आपापली आयुष्य घडवतायत, अण्णा हजारेच्या ‘वाया गेलेल्या’ मुलांच्या शाळेतली मुलंही अमरकडून प्रशिऱ्क्षण घेत असतात..आणि अमर?

अमर तसाच आहे. पुढच्या पिढ्या घडवतोय. दुसऱ्या मुलांना एक स्थिर आयुष्य लाभावं म्हणून स्वत: अस्थिर आयुष्य जगतोय. हे त्याने स्वत:हून आणि मिशन म्हणून स्विकारलंय. त्याला त्याची ना खंत, ना खेद..पदरमोड करून, कुठल्यातरी चित्रपटात लहान मोठी कामं करुन अमर स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबियांचा खर्च कसातरी भागवत असतो. टिचभर भाड्याच्या खोलीत तो, त्याची तेवढीच गुणी कलावंत असलेली पत्नी, मुलगा आणि असंख्य पुस्तकांसह राहातो..महिन्याच्या रेशनची बहुतेकदा मारामारच असते. अमरने तयार करून फिल्म क्षेत्रात स्थिरावलेली मुलं मदत देऊ करतात, पण तो ती मदत निग्रहाने नाकारतोय..

अमरसारख्याला सरकारी‘पद्म’ सन्मान मिळणार नाही. सामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत:चं आयुष्य उधळवलेल्या अमरची तेवढी पंहूंच नाही, पैसा नाही आणि म्हणून प्रतिष्ठाही नाही..अमरला त्याची गरजही नाही.

आयुष्यातं ध्येय पूर्ण करण्यासाठी जो आयुष्य उधळवतो, तो कोणत्याही पुरस्कारांची तमा बाळगत नाही. त्याला मिळालेले ‘जिवंत’ पुरस्कार, अमरचं ध्येय पुढे नेण्यासाठी ताठ कण्याने प्रत्यक्ष कार्यरत असतात, अशा अमरला ‘कागदी’ पुरस्कार आणि बेगडी इतमामाची आवश्यकता नाही.. अशा माणसांमुळेच समाज घडतो, श्रीदेवीमुळे नाही..

अमर, तू तुझं ’अमरजीत’ हे नांव सार्थ केलंस मित्रा..

— ©️ नितीन साळुंखे
9321811091

अमरवर चिन्मय मांडलेकरांनी ८ जानेवारी २०१७च्या लेकसत्तेत एक अप्रतीम लेख लिहिला होता. त्याची लिंक सोबत देतोय, ती आवर्जून वाचावी ही विनंती.
https://www.loksatta.com/ekmake-news/amarjeet-amle-1378856/… : अमर

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..