माणूस कधी बोलू लागला, हा संशोधकांच्या अत्यंत उत्सुकतेचा विषय आहे. मानवी बोलण्याची सुरुवात काही अचानक झालेली नाही. मानवी बोलणं, हे मानवी उत्क्रांतीचाच एक भाग आहे. हे बोलणं अर्थातच हळूहळू विकसित होत गेलं आहे. मानवी बोलण्याची मूळं ही आजच्या होमो सेपिअन्स या प्रजातीचे पूर्वज असणाऱ्या विविध प्रजातींपर्यंत पोचतात. आतापर्यंत ही सुरुवात पन्नास लाख वर्षांपूर्वी झाली असल्याचं मानलं गेलं होतं. परंतु नवं संशोधन ही सुरुवात त्याच्या खूपच अगोदर झाली असल्याचं दर्शवतं…
नुसते आवाज काढण्याच्या पलीकडे जाऊन, स्पष्ट बोलता येण्यासाठी घशातील स्वरयंत्राची विशिष्ट रचना, मेंदूतील विशिष्ट रचना, विकसित झालेले श्रवणयंत्र, विशिष्ट जनुक, अशा विविध गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टींचा विकास अर्थातच काहीसा समांतर पद्धतीने झाला असावा. यातील, मेंदूतील ‘आरक्युएट फॅसिक्यूलस’ ही मेंदूतील नसांची जुडी, भाषा विकसित होण्यासाठी आवश्यक असणारे विविध भाग एकमेकांना जोडते. आर्क्युएट फॅसिक्यूलस हा भाग किती विकसित झाला आहे, यावरून त्या प्राण्याची बोलण्याची क्षमता कळू शकते. परंतु संशोधकांच्या दृष्टीने प्रतिकूल गोष्ट ही की, जुन्या जीवाश्मांत मेंदू टिकून राहू शकत नसल्यानं, जुन्या मानवसदृश प्रजातींच्या मेंदूतील आर्क्युएट फॅसिक्यूलस या भागाचा अभ्यास करणं अशक्यंच ठरलं आहे.
यावर इंग्लंड, अमेरिका आणि जर्मनीतील संशोधकांनी वेगळाच मार्ग अवलंबला. नरवानर गणातील, चिम्पांझी, मॅकाक आणि मानव यांची जनुकीय घडण, त्यांची उत्क्रांती एकाच पूर्वजापासून झाल्याचं दर्शवते. जनुकीयदृष्ट्या मानवाशी साधर्म्य दर्शवणाऱ्या, चिम्पांझी या कपीच्या व मॅकाक या माकडाच्या मेंदूंतील आर्क्युएट फॅसिक्यूलसचा या संशोधकांनी एमआरआय तंत्राद्वारे तपशीलवार अभ्यास केला आणि त्याची तुलना माणसाच्या मेंदूतील आर्क्युएट फॅसिक्यूलसशी केली. आश्चर्य म्हणजे, या तिघांच्या आर्क्युएट फॅसिक्यूलसमधील, श्रवणसंस्थेशी जोडणाऱ्या भागात मोठे साम्य असल्याचं या संशोधकांना आढळलं. या संशोधकांनी यावरून निष्कर्ष काढला की, मेंदूचा हा भाग या तिघांच्या पूर्वजाच्या काळातच विकसित होऊ लागला असावा. हा काळ होता किमान अडीच कोटी वर्षांपूर्वीचा… म्हणजे मानवाचा जन्म होण्याच्या खूपच आधी!
इंग्लंडमधील न्यू कॅसल युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधील टिमोथी ग्रिफिथ आणि क्रिस्तोफर पेटकॉव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली केलं गेलेलं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं संशोधन मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठरलं आहे. कारण या संशोधनानं भाषेच्या उत्क्रांतीची सर्वच गणितं बदलून टाकली आहेत. या संशोधनानं भाषेचा उगम हा किमान दोन कोटी वर्षं मागे नेला आहे!
आभार: डॉ.राजीव चिटणीस
(विज्ञानमार्ग संकेत स्थळ)
छायाचित्र सौजन्य : brain.labsolver.org / Wikimedia.
Leave a Reply