|| हरि ॐ ||
श्री विनायक स्वरुपात ओळखली जाणारी मूर्ती व्कांगताम प्रांतात मि-सोअन येथील एका मंदिरात मिळाली. ती ७ व्या – ८व्या शतकातील असावी. तिची दिसण्यातील भव्यता, प्रौढता अगदी अद्वितीयच आहे. मूर्ती उभी असून चार हात आहेत. पूढील डाव्या हातात पात्र असून उजव्या हातात पाने असलेली डहाळी असल्याचे दिसून येते. ह्याला त्याच्या संकृतीनुसार विशेष सांकेतिक अर्थ आहे. हे ह्या मूर्तीचे पहिले वैशिष्ट्य.
मूर्तीतील दुसरे आश्चर्य म्हणजे तीला दोन मस्तके असल्या सारखी वाटतात. पूढील मस्तक गजमस्तकासारखे व मागचे मनुष्यासारखे वाटते. गजमस्तकाच्या कपाळावर गंडस्थळ आहे. हा भाग बराच पुढे आलेला आहे. गोल व समोर पाहणारे डोळे गजमस्तकावर आहेत. तर कान मोठे व पंख्याच्या आकाराचे असून हे मात्र मागच्या मस्तकावर आहेत. माथ्यावर पसरट आकाराचे कमलपुष्प तर डोके जाळीदार शीरवस्त्राने झाकलेले आहे.
डोके खांद्यामध्ये रुतल्यासारखे दिसते. सोंड भरदार असून डाव्या हातातील पात्राकडे वळलेली आहे. गळ्यात रत्नमाला व छातीवर सर्पाचे जानवे आहे. कमरेभोवती व्याघ्रचर्म गुंडाळून तिहेरी दोर्याने ते आवळलेले आहे. पट्ट्यावरच्या बाजूला रत्नयुक्त पद्म गुंडाळलेला आहे. तिहेरी पट्टा हे ह्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
ही मूर्ती शिल्पकलेच्या दृष्टीने प्रमाणबद्ध असून तिच्यात विलक्षण जिवंतपणा व सामर्थ्य आहे.
हिंदू धर्माचे सर्व संकेत ह्या मूर्तीत असले तरी प्रत्येक बाबतीत चाम्प येथील कला आणि संस्कृतीचा ठसा तिच्यावर उमटलेला आपल्याला स्पष्ट दिसतो.
।। ॐ गं गणपतये नम: ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply