नवीन लेखन...

माणुसकीचा सातबारा

चार वर्षांपूर्वी वाराणसी येथे घडलेली ही गोष्ट आहे. महेंद्र हा चाळीशी उलटलेला ड्रायव्हर, आपल्या आईबरोबर सुखाने रहात होता. भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तो नोकरीला होता.

एका सकाळी त्याला काठमांडूला जाण्याची वर्दी मिळाली. नेहमी प्रमाणे आईचे चरणस्पर्श करुन तो निघाला. आईने आशीर्वाद देताना ‘जपून ड्रायव्हींग कर’ असे बजावून सांगितले.

महेंद्र ट्रक घेऊन निघाला. प्रवास लांब पल्ल्याच्या होता. तरीदेखील तो काळजीपूर्वक आगेकूच करीत होता. नेपाळच्या हद्दीत प्रवेश केल्यावर त्याला हायसं वाटलं, आता काही तासांतच तो मुक्कामी पोहचणार होता.

ट्रक आता अवघड वळणे घेत घाट उतरत होता. एवढ्यात एक दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करुन चुकीच्या दिशेने पुढे आला. महेंद्रने करकचून ब्रेक दाबला तरीदेखील तो त्या दुचाकीस्वाराला धडकलाच. गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराने जागेवरच प्राण सोडला.

महेंद्रने आईच्या संस्कारानुसार पळून न जाता ट्रक कडेला उभा केला व जवळच्या पोलीस चौकीत हजर झाला. घडलेली घटना त्यानं तेथील अधिकाऱ्याला सांगितली. नेपाळ पोलीसांनी पंचनामा करुन त्याला अटक करुन कस्टडीत टाकले.

यथावकाश कोर्ट कचेऱ्या होऊन नेपाळ कोर्टाने महेंद्र यास दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल तुरुंगात टाकले. ही बातमी महेंद्रच्या एकाहत्तर वर्षांच्या आईस समजल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एकमेव आधार असलेला महेंद्र तुरुंगात गेल्यामुळे ती मनाने पार खचून गेली.

तिने विचार केला, महेंद्र हा निरपराध आहे. मात्र हे सांगूनही कोणीही मान्य करणार नाही. त्यासाठी आपणच त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करायला हवा. ती शिकलेली नव्हती, त्यामुळे तिला विनंती अर्ज, पत्रव्यवहार करणे शक्य नव्हतं. तिच्याकडे महेंद्रची जी काही कागदपत्रे होती ती घेऊन नेपाळच्या दूतावासाला भेटली. नेपाळच्या कायद्यानुसार दंड भरुन तुरुंगातून सुटका करण्याची तरतूद असल्याचे दूतावासाने तिला सांगितले. मात्र त्यासाठी लागणारी सात लाख एवढी रक्कम तिच्याकडे नव्हती.

सात लाख रुपये उभे करणे ही तिच्या दृष्टीने अशक्यप्राय गोष्ट होती. तरीदेखील तिने प्रयत्न करणे सोडले नाही. तिच्या हातात फक्त सरकारला विनंती करणे शक्य होते. वाराणसीत कोणीही मंत्री आला की, ती धावत त्याच्या गाडीपुढे जायची. सुरक्षारक्षक तिला अडवायचे, ओरडायचे. मात्र ती आपले निवेदन त्या मंत्र्याला द्यायची. असे अनेक वेळा तिने केले, परंतु कोणत्याही प्रशासनाने तिची दखल घेतली नाही.

पाहता पाहता तीन वर्षे निघून गेली. महेंद्र नेपाळच्या तुरुंगात सजा भोगत होता. त्याच्या आईने हताश होऊन वाराणसीच्या रस्त्यावर भीक मागायला सुरुवात केली. येणारे जाणारे तिच्या हातावर पैसे ठेवत होते. तिचा प्रत्येक दिवस मुलाच्या काळजीने उदास जात होता.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी तिला भीक मागताना पाहिलं.‌ जवळ जाऊन चौकशी केली. पोटच्या मुलाच्या सुटकेसाठी सात लाख रुपये दंड भरु न शकल्याने एका आईची झालेली त्यांनी अवस्था पाहिली. त्यांनी तिला मदत करायचे ठरविले. बनारस हिंदू विद्यापीठातील प्रत्येकाला भेटून मदत गोळा केली. सात लाख तर नाही जमा झाले, पण निम्मे जमले. उरलेल्या रकमेसाठी काही सेवाभावी संस्था पुढे आल्या. सात लाख पूर्ण झाल्यावर ती रक्कम दूतावासाकडे सुपूर्द केली.

दूतावासाने नेपाळ सरकारला ती रक्कम पाठवून महेंद्र याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. त्याच्या प्रयत्नाला गेल्या आठवड्यातच यश आलं.

चार वर्षांनंतर महेंद्र वाराणसीत येऊन आपल्या आईच्या, अमरावतीदेवीच्या गळ्यात पडला. मायलेकाची ही गळाभेट पाहणाऱ्यां बनारस हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. या जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही, या माजी विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवून मदत गोळा केली नसती तर, महेंद्र नेपाळच्या तुरुंगात खितपत पडला असता व आईने मुलाची वाट पहात डोळे मिटले असते…

आज ना उद्या महेंद्र पुन्हा कामावर रुजू होईल. मायलेक आनंदाने राहतील आणि त्या सर्व मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या, सेवाभावी संस्थांच्या सातबाऱ्यावर माणुसकीच्या या सत्कर्माची नोंद नक्कीच होईल…

‘लोकमत’मधील बातमीवरुन केलेला कथाविस्तार.

– सुरेश नावडकर २५-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..