मला 24 नोव्हेंबर, 1990ची ती उत्तररात्र आजही आठवतेय. रात्रीचा सव्वादोन-अडीचचा सुमार असेल. माझ्या पत्नीला दुसऱयांदा दिवस गेले होते. प्रसृतीची तारीख 30 नोव्हेंबर होती. एक पाच वर्षांचा मुलगा आधी होता. आता तो 21 वर्षांचा आहे.
माझ्या पत्नीला सहा दिवस अगोदरच प्रसृतीवेदना होत होत्या. मी माझ्या आईला व पत्नीला तयार राहण्यास सांगितले. एखाद्या वाहनाची व्यवस्था होते काय, हे बघण्यास घराबाहेर पडलो. तेव्हा आम्ही मुलुंड (पू.) मध्ये रहायचो. आम्ही नाव नोंदविलेले प्रसृतीगृह मुलुंड (प.) ला होते. मला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी मिळाली नाही. शेवटी आसपासच्या दोन-तीन रिक्षावाल्यांच्या घरी गेलो; पण त्यातील दोघे जण गावाला गेले होते. तिसरा म्हणाला, की त्याची रिक्षा नादुरुस्त आहे. मला खूपच दडपण आले. शेवटी मी पूर्व महामार्गावर उभा राहिलो. दिसेल त्या वाहनाला थांबण्याची विनंती करीत होतो; पण कोणीही आपले वाहन थांबविण्यास तयार नव्हता. त्यात त्यांची तरी काय चूक होती म्हणा! त्या उत्तररात्री वाहन थांबविण्याचा धोका कोण पत्करेल? इकडे माझ्या पत्नीचा व आईचा काळजीयुक्त, वेदनायुक्त चेहरा दिसत होता. इतक्यात मुलुंड चेक नाक्यावरून एक मारुती मोटर आली. मी तिला हात केला. आश्चर्य म्हणजे ती थांबली. मी त्यांना माझी असहाय्य व अगतिक परिस्थिती विशद केली. ते गाडी घेऊन माझ्या घरी आले.
घरी आई व पत्नी डोळ्यांत प्राण आणून माझीच वाट पाहात होत्या. मी त्यांच्यासह गाडीने प्रसृतीगृह गाठले. तिथले प्रवेशाचे सोपस्कार पार पडले. खाली येऊन गाडीवाल्याचे आभार मानले व किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली; पण तो भला मनुष्य होता. तो म्हणाला, “मी माझ्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं असं समजतो. तेव्हा त्याचे कसले पैसे? उलट काही गरज भासली, तर मला
केव्हाही हाक मारा.” माझ्या स्वतवर विश्वासच
बसला नाही. सध्याच्या काळात माणुसकीचा गहिवर असणारी अशीही माणसे असतात. बोलण्याच्या ओघात त्याने मला सांगितले, की त्याचे नाव शेट्टी असून, चेकनाक्यावर त्याचे हॉटेल आहे. ते बंद करून घरी जात असताना माझी भेट झाली. तो म्हणाला, “करायचं असेल तर एकच करा. जेव्हा तुमची पत्नी बाळंत होईल, तेव्हा मला हॉटेलमध्ये येऊन पेढे द्या.” दुसर्याच दिवशी, म्हणजे 25 नोव्हेंबर 1990 ला मला सकाळी आठ वाजता कन्यारत्न झाले. मी लगेच त्याला मिठाई नेऊन दिली.
मनात विचार केला, की तो जर देवरूपाने मला भेटला नसता, तर आमची काय अवस्था झाली असती? तेव्हाच मी ठरविले, की आपल्याला संधी मिळाली तर आपणही दुसऱयांच्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी निरपेक्षपणे मदत करून सात्विक समाधान प्राप्त करून घ्यायचे.
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.
Leave a Reply