मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते बाबूराव पेंढारकर यांचा जन्म २२ जुन १८९६ रोजी झाला.
बाबूराव पेंढारकरांचे बालपण हे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या जमान्यात गेले. त्यांच्या राजाश्रयाखालील मंजीखाँ, अल्लादिया खाँ, बाबालाल रहमान, चित्रकार पेंटर बंधू, कृष्णराव मिस्त्री यांसारख्या कलावंतांमुळे कोल्हापूरला ‘कलापूर’ म्हणून महाराष्ट्र ओळखू लागला. याच कोल्हापूरच्या मातीत बाबूरावांवर कलेचे नि रसिकतेचे संस्कार झाल्यामुळे त्यांच्यातला नट घडला. त्यातून त्यांच्या मातोश्रीने ध्येयवादाचे बालामृत पाजल्याने त्यांचे जीवन भलतीकडे न भरकटता अभिनयकलेचे उच्च शिखर गाठू शकले, असे अत्रेंना वाटते.
अत्रे व पेंढारकर हे दोन्ही मित्र एकमेकांची बलस्थाने व मर्मस्थाने चांगलीच ओळखून होते. दोघांमधील जिव्हाळा पराकोटीचा. अत्रेंच्या साठीच्या वेळी अत्रेंमधील तेरा अत्र्यांचे दर्शन घडवणारा लेख अत्रे गौरव ग्रंथासाठी बाबूरावांनी लिहिला. त्यावेळी त्यांच्या डोळय़ासमोरून गेल्या तीन दशकांचा कार्यकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकला.
कोल्हापूर सिनेटोन सोडून मा. विनायक यांच्याबरोबर चित्रसंस्था काढण्याच्या बेतात बाबूराव होते. चित्रीकरणपटू पांडुरंग नाईक मदतीला. प्रभावी बोलपट साकारण्यासाठी लेखक म्हणून अत्रे, फडके, खांडेकर, वरेरकर अशा साहित्यिकांचे सहाय्य घेण्याचे त्यांनी ठरवले. वरेरकरांच्या कथानकावर पूर्वी ‘विलासी ईश्वर’ चित्रपट काढला होता.
प्रभातचा व्यवस्थापक या नात्याने साहित्य संमेलनास आलेल्या कविमंडळींच्या काव्यवाचनाचे चित्रीकरण करण्याच्या निमित्ताने अत्रे यांची ओळख झाली होती. बोलपटासाठी एखादे कथानक देण्याची त्यांनी गळ घातली असता अत्रे म्हणाले, ‘मला चित्रपट तंत्र फारसं अवगत नाही. सध्या मी नाटक लिहितोय, तेव्हा खांडेकरांकडून प्रथम गोष्ट घ्या. मग दुसरी ‘फर्स्ट क्लास’ गोष्ट मी देईन.’
अत्रेंचा ‘फर्स्ट क्लास’ शब्द बाबूरावांच्या डोक्यात असा काही घुसला की तो कायमचा त्यांच्या ओठावर वसला. त्याप्रमाणे खांडेकर लिखित ‘छाया’ चित्रपट प्रथम निघाला. स्वत:ची संधी आपल्या साहित्यिक मित्राला बहाल करताना महामनी अत्रेंच्या माणुसकीचे दर्शन बाबूरावांना झाले.
‘हंस पिक्चर्स’चा त्यानंतर आलेला ‘ज्वाला’ चित्रपट न चालल्यामुळे संस्था डबघाईला आली. त्यामुळे निराश झालेले बाबूराव आपल्याबरोबर अत्रेंना घेऊन पुण्याहून कोल्हापूरला गेले. ‘आठवडय़ाभरात नव्या चित्रपटाचा मुहूर्त न केल्यास संस्थेची पत राहणार नाही.’ हे बाबूरावांचे उद्गार ऐकून, ‘आठ दिवसाऐवजी तीन दिवसातच पटकथा लिहून देतो.’
त्याप्रमाणे ‘बह्मचारी’ या विनोदी बोलपटाची कथा लिहून देऊन अत्रेंनी ‘हंस’ला जीवदान दिले. बाबूरावांना त्यांच्यामधील माणुसकीचे दर्शन झालेला हा दुसरा प्रसंग.
बहुदा मराठी नट चित्रपटात ठरावीक साच्याच्या भूमिका साकारताना आढळतात. पण याला अपवाद होते बाबूराव. नावीन्याचा ध्यास, अभिनयाचा व्यासंग यामुळे विविध तऱ्हेच्या भूमिका नाटक, चित्रपटात केल्या.
‘अयोध्येचा राजा’ मधील ‘गंगानाथ महाराजाच्या’ भूमिकेने चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. पण तशी भूमिका पुन्हा केली नाही. अत्रेंच्या ‘महात्मा फुले’मधील जोतिबांची त्यांनी केलेली भूमिका तर पार दुस-या टोकाची. अत्रेंनी त्यासाठी बाबूरावांपुढे ‘विनोबा वाङ्मय’ ठेवले.
बाबूरावांनी तर ते एखाद्या विद्यार्थ्यांप्रमाणे मन लावून अभ्यासले. आत्मचिंतनामुळे चित्तशुद्धी होऊन त्यांची भाववृत्ती बदलली. त्यामुळे भूमिकेशी इतके समरस झाले की, खुद्द अत्रेंना आपल्यासमोर साक्षात ‘जोतिबा’ असल्याचा भास झाला.
धर्मवीर, देवता, अर्धागी अमृत, पहिला पाळणा, भक्त दामाजी, जय मल्हार, मी दारू सोडली, पुनवेची रात, श्यामची आई, महात्मा फुले हे मराठी चित्रपट तर ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ ‘नवरंग’ ‘दो आँखे बारह हाथ’ ‘आम्रपाली’ हे हिंदी चित्रपट बाबूरावांनी केले. अशा नानाविध भूमिका करून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला.
गणपतराव जोशी व बालगंधर्व यांच्या भूमिका पाहात आलेल्या संस्कारातून त्यांचा अभिनय सहज बनला होता.
बालगंधर्वाच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी श्रद्धायुक्त अंत:करणाने त्यांच्यावर ‘एकमेवाद्वितीय कलानिधी’ हा लेख लिहिला.
पन्नाशीनंतर बाबूराव रंगभूमीकडे वळले. अत्रेंच्या सूचनेवरून त्यांनी ‘झुंझारराव’ साकारला. घनश्याम, सुधाकर, शहाजी, अंभी या त्यांच्या विविध नाटकांतील भूमिका रसिकांच्या स्मरणात राहण्याजोग्या झाल्या.
‘प्रभातचा’ व्यवस्थापक, नाटक, चित्रपटातील प्रभावी नट ते मराठी साहित्यात ‘मैलाचा दगड’ ठरणारे ‘चित्र आणि चरित्र’ हे आत्मचरित्र लिहिणारा लेखक हा बाबूरावांचा प्रवास लक्षणीय ठरला. त्याची दखल खुद्द अत्रे यांना अग्रलेख लिहून घ्यावी लागली.
मित्र म्हणून बाबूराव हे अत्रेंच्या जीवनातील चढ-उताराचे सखेसोबती होते. काव्य, नाटक वा चित्रपट यांच्या निर्मितीसाठी ‘अभ्यासोनी प्रकट’ होताना बाबूरावांनी अत्रेंना पाहिले. इतकंच काय, ‘तुकाराम’ साप्ताहिक चालवताना, ज्ञानोबा-तुकोबा-एकनाथ-रामदास यांच्या वाङ्मयाचा धांडोळा घेतल्याचे प्रतिबिंब आत्रेय लेखनात पडलेले त्यांना आढळले.
संबंधीतांशी झालेल्या चर्चेत एखादा उल्लेख केल्यावर, अत्रे लगेच आपल्या ग्रंथालयातील पुस्तक काढून तो संदर्भ साऱ्यांना त्यात दाखवत. अर्धवट असलेला अग्रलेख प्रवासात ते पूर्ण करताना लेखातील सुसंगती मात्र कायम असायची. अशा अत्रे यांच्या अद्भुत स्मरणशक्ती प्रयोगांचे साक्षीदार हे अनेक वेळा बाबूराव होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, ना. सी. फडके यांच्यासारख्या थोरांच्या भेटीत आढळलेल्या अत्रेंच्या दिलदार वृत्तीने बाबूराव चकित झाले होते.
‘श्यामची आई’ (१९५३) चित्रपटानंतर भारत शासनाने बोलपटांसाठी पारितोषिक योजना सुरू केली. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही, बाबूरावांच्या आग्रहावरून अत्रेंनी पटकथा व चित्रपटाची प्रत अंतिम तारखेला पाठवली. चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक लाभले. या समारंभास बाबूराव उपस्थित होते.
पदक स्वीकारल्यावर केलेल्या भाषणात अत्रेंनी यशाचे श्रेय सानेगुरुजींना, विनोबांच्या आशीर्वादास देऊन दोष आपल्या पदरी घेतले. ‘श्यामची आई’मध्ये गुरुजींचे मूळ संवाद अत्रेंनी कायम ठेवले, तसे ‘महात्मा फुले’ चित्रपटात डय़ुक ऑफ कॅनॉट भेटीवेळचे जोतिबांचेही इंग्रजी संवाद. त्या चित्रपटासही राष्ट्रपतींचे रौप्यपदक लाभले. त्यानिमित्ताने झालेल्या अत्रेंच्या मुंबईतील सत्कार सभांचे देखील बाबूराव साक्षीदार होते. रशियाला आपल्याबरोबर येण्यासाठी, अत्रेंनी बाबूरावांना आग्रह केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही.
सत्तरी गाठली तरी, तालमीत तयार झालेल्या बाबूरावांचा उत्साह मात्र पंचविशीतला. ते आजीवन कलेचे, सौंदर्याचे नि ऐश्वर्याचे उपासक होते. एरव्ही काहीसे अनियमित असले तरी त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही. रोज दंड-बैठकांचा तासभर व्यायाम, देवावर श्रद्धा, जेवताना फळे नि दुधाची साय, साथीला आनंदी व सकारात्मक स्वभाव. एरव्ही ते मितभाषी, पण अनुभव सांगताना त्यांची बुद्धी अशी काही तळपत असे की, ऐकणारा बघतच राही. सुशिक्षित व कार्यमग्न मुले, सुगरण पत्नी असा त्यांचा सुखी संसार. मृत्यूपूर्वी दोन वर्षे त्यांना पोटाच्या कर्करोगाने ग्रासले.
शस्त्रक्रियेनंतरही म्हणावा तसा गुण आला नाही. अत्रेंना पाठवलेल्या पत्रात बाबूरावांनी लिहिले होते, प्रकृतीचे काही खरे नाही. वजन घटतेय, अशक्तपणा वाढतोय. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ अशी मनस्थिती आहे. घरीच पडून असतो. ‘फुले’ चित्रपटाच्या वेळी वाचन-लेखन-भाषणाची जी तुम्ही गोडी लावलीत ती आज कामी येतेय. माझे विचार पत्ररूपाने लिहून ही माझ्या मन:शांतीची कबुतरे तुमच्याकडे पाठवतोय आणि मृत्यूच्या हाकेला ओ देण्याची तयारी करतोय.’ अशाही मन:स्थितीत अत्रेंचे जोरात चाललेले ‘डॉ. लागू’ नाटक बघण्यास बाबुराव उत्सुक होते.
बाबूराव पेंढारकर यांचे ९ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply