मा. दत्ताराम म्हणजे दत्ताराम वळवईकर त्यांचा जन्म १० जून १९१६ रोजी गोव्यातील वळवई नावाच्या खेड्यात झाला.
विष्णूपंत बोरकर त्या काळी वळवई येथे नाटके करीत. त्यांनी दत्तारामांना नट म्हणून , माणूस म्हणून घडवले. मा. दत्तारामांचे ते मित्र, तत्त्वज्ञ , मार्गदर्शक होते आणि दत्ताराम बापूंनीही त्यांना अखेरपर्यंत पित्याचा मान दिला. वयाच्या ९व्या वर्षी मास्टर दत्ताराम यांनी नाटकांच्या ओढीने घर सोडले आणि ‘कुंजविहारी ‘ नाटकात पेंद्याची विनोदी भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. ते गोव्यामधील प्रभात संगीत मंडळीमध्ये पोहोचले. तेव्हा तिथे जुन्या मराठी संगीत नाटकांचा जमाना चालू होता. पण म्हणावी तशी नाटके चालत नसत.
उमेदीच्या काळात गोव्यातील नाटकांत अभिनय करून वयाच्या २२ व्या वर्षी मास्टर दत्ताराम मुंबईत लालबागला वास्तव्यास आले. तेव्हा दत्तारामच खऱ्या अर्थाने ‘लालबागचा राजा’ होते. त्यांच्या अभिनयामुळे सर्व लालबाग त्यांच्या प्रेमात होते. वर्षाचे बारा महिने ते थंड पाण्याने आंघोळ करायचे. त्यांची आंघोळ अर्धा ते पाऊण तास चालायची. आंघोळ करताना त्या रात्री होणाऱ्या नाटकांचे संवाद जोरजोरात बोलणे चालू असायचे. लालबाग गणेशगल्ली येथील ‘ महाराष्ट्र सेवा मंडळा ‘ चा नळसुद्धा दुपारी दत्तारामबापूंसाठी रिझर्व्ह असायचा. ते आंघोळ करून जाईपर्यंत दुसरा कुणीही आंघोळ करण्यासाठी तिथे येत नसे.
मा. दत्ताराम यांचे अभिनयकौशल्य कसाला लागून मान्यता पावले. अभिनयामध्ये आणि दिग्दर्शनामध्ये नव्या-जुन्या दोन्ही शैलींचा सुयोग्य वापर ते करू लागले. मास्टर गंगाराम आणि मा. दत्ताराम हे दोन वळवई येथील अभिनेते रंगभूमी गाजवू लागले.
पुढे लालबागमध्ये आल्यावर परळच्या ‘ दामोदर हॉल ‘ मध्ये त्यांची नाटके व्हायची. तिथे दत्तारामांच्या भूमिका पाहून गिरगांवातील साहित्यसंघाच्या नाटकांसाठी त्यांना बोलवणे आले. साहित्यसंघाच्या कौन्तेय , दुसरा पेशवा , भाऊबंदकी , वैजयंती , राजकुमार यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या कसलेल्या अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ ही मिळवले. पुढे ‘ ललितकलादर्श ‘ च्या दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, पडछाया या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
मास्टर दत्ताराम म्हटले की ‘ गोवा हिंदू असोसिएशन ‘ च्या कलाविभागाने २५ ऑक्टोबर १९६२ रोजी भारतीय विद्या भवनात सादर केलेल्या ‘ रायगडाला जेव्हा जाग येते ‘ मधला त्यांनी साकारलेला ‘ शिवाजी ‘ विसरता येणार नाही .
मा. दत्तारामांनी हाताशी आलेली प्रत्येक भूमिका अशीच जिवंत केली. रंगभूमीकडे त्यांनी एक व्रत म्हणून पाहिले आणि व्रताचा सांभाळ देवव्रताच्या निःस्पृह प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आयुष्यभर केला. त्या अर्थाने मास्टर दत्ताराम म्हणजे मराठी रंगभूमीवरचे देवव्रतच. मास्टर दत्ताराम यांनी ‘ मत्स्यगंधा ‘ या नाटकात केलेली देवव्रताची भूमिका विशेष गाजली. त्या नाटकातील एका प्रयोगात, नाटक एका विशिष्ट उंचीवर जाऊन स्तब्ध होते आणि गंगापुत्र देवव्रताच्या भीष्मप्रतिज्ञेने प्रेक्षागृह अवाक् होत असे.
रंगभूमी पवित्र आहे आणि तिचे पावित्र्य आपणाकडून राखले पाहिजे असे ते म्हणायचे आणि म्हणूनच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकातील एक प्रमुख नट दारू पिऊन रंगमंचावर अभिनय करायला लागला, तेव्हा मा. दत्तारामांनी नाटकाच्या निर्मात्याला सांगून त्या प्रमुख नटाला काढून दुसऱ्या नटाला त्याच्या जागी उभे केले, पण मा. दत्तारामांना नाटकातून सोडले नाही. दत्तारामांसारख्या व्रतस्थ माणसांच्या शब्दांना तेव्हाच्या रंगभूमीवर मान होता. मास्टर दत्ताराम यांनी तर नव्या दमाचे अभिनेते ,अभिनेत्री डॉ. काशीनाथ घाणेकर, कृष्णकांत दळवी, रमेश देव, सीमा, श्रीकांत मोघे आणि पुढे सुप्रसिद्ध झालेल्या दिग्दर्शिका , अभिनेत्री विजया मेहता यांना नाट्यदिग्दर्शन केले होते. विशेष म्हणजे मा. दत्ताराम हे प्रॉम्प्टरवर त अवलंबून नसायचे. नाटक दोनदा तीनदा खड्या आवाजात सुस्पष्टपणे वाचायचे आणि चक्क आपल्या हस्ताक्षरात लिहून काढायचे. लिहून झालं की ती संपूर्ण लिखित नक्कल तोंडपाठ करायची. संवाद विसरायचा प्रश्नच नाही. त्यांची कुठलीही भूमिका करायची तयारी असे. या भूमिकांच्या जोडीने कलाकारांच्या जेवणाची जय्यत व्यवस्था. स्वतःच नाटकाचे बोर्ड लिहून जाहिरात, रंगमंचावर पडदे लावण्यापासून तिकीटविक्रीसाठी सुद्धा बापू चटपटीतपणे बसणारे. बुकिंगचा हिशेब चोख ठेवणारे मा. दत्ताराम स्वतःबद्दल म्हणत की, “देवाच्या मला भरपूर काही मिळाले. जीवनाबद्दल माझी कसलीच तक्रार नाही. माझ्यावर लोकांनी खूप प्रेम केले. मी व्यवसाय प्रामाणिकपणे करायचा, निष्ठेने करायचा ही शिकवण मला बालपणीच मिळाली. वसईला स्वतःच्या मालकीचे एवढे घर मी बांधेन असे मला कधीही वाटले नव्हते. मी पूर्ण समाधानी आहे.”
मा. दत्ताराम यांनी सुमारे ३० नाटकांमधून भूमिका केल्या. त्यामध्ये इंद्रजितवध , कीचकवध , कुंजविहारी , कौन्तेय , दुरितांचे तिमिर जावो , पंडित जगन्नाथ , पतंगाची दोरी , पुण्यप्रभाव ,भाऊबंदकी , मत्स्यगंधा , मानापमान , मीरामधुरा , मृच्छकटिक , ययाति आणि देवयानी , रायगडाला जेव्हा जाग येते , राक्षसी महत्त्वाकांक्षा , लोकांचा राजा , वैजयंती , सवाई माधवराव यांचा मृत्यू , संशयकल्लोळ , सुंठीवाचून खोकला गेला , सौभद्र , होनाजी बाळा अशा अनेक नाटकांचा समावेश आहे.
मा. दत्ताराम यांचे १२ जून १९८४ रोजी निधन झाले.
सतीश चाफेकर.
Leave a Reply