मराठी अभिनेते सुनील अभ्यंकर यांचा जन्म १७ जून १९७४ रोजी झाला.
मुळशी पॅटर्नचा वकील, देऊळबंद चा बल्लाळ , महानाट्यातील स्वा. सावरकर किंवा सरसेनापती हंबीरराव मधील अनाजीपंत भुमिका कुठलीही असो १००% न्याय देणारा अभिनेता म्हणजे सुनील अभ्यंकर. काही प्रमुख गाजलेल्या मालिका, प्रामुख्याने प्रायोगिक नाटके आणि काही मराठी चित्रपटात आगळ्यावेगळ्या भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याचे नाव सुनील अभ्यंकर असले तरी ते मराठी नाट्य चित्रपटसृष्टीत ‘राया’ म्हणून सर्वपरिचित आहेत.
‘लहानपणापासून असलेली अभिनयाची आवड आणि त्यासाठी आईने आणि शाळेतील शिक्षकांनी प्रोत्साहन याच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत एक अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सुनील अभ्यंकर हे तसे मुळचे पुण्याचेच. चक्क सदाशिवपेठी. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र मंडळाच्या कटारिया हायस्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच पाठांतर, वक्तृत्व स्पर्धा यातून त्यांना अभिनयाचे वेड निर्माण झाले. आई वीणाताई या गृहिणी असल्या तरी त्यांनाही अभिनयाची आवड होती. त्यामुळे आईबरोबरच सर्वश्री काळे, गोखले, पटवर्धन, अभ्यंकर, आपटे या शाळेतील शिक्षकांनीदेखील सुनील अभ्यंकर यांना खास प्रोत्साहन दिले. शिवाय घरासमोर असलेल्या स्काऊट ग्राऊंडवरील त्यांच्या जोशीकाकांनीही ‘नटसम्राट’, ‘छावा’ यांसारख्या प्रमुख नाटकातील प्रसंग लहान वयातच त्यांच्याकडून बसवून घेतले. त्यानंतर उपेंद्र लिमये यांच्या ‘परिचय’ संस्थेतर्फे ‘कोण म्हणतंय टक्का दिला’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली, त्याचे शंभर प्रयोग झाले. याशिवाय ‘पाषाणकर तुमचं काय चाललंय’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’, ‘येथे चेष्टेची मस्करी होते’ यासारख्या प्रायोगिक नाटकांमधूनही कामे केली. अभिनयाचे हे वेड इतके वाढत गेले की अभ्यंकर यांनी शिक्षण सोडून मित्राबरोबर मुंबईला गुपचूप पळून जाण्याचाही निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा बेत कळताच आई आणि आपटे सरांनी शिक्षणाचे मात्र, त्यांचा हा बेत कळताच आई आणि आपटे सरांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्याप्रमाणे सुनील अभ्यंकर यांनी नंतर स. प. महाविद्यालयातून बी. कॉम करून नंतर सीए केले. आजही त्यांची पुण्यात फर्म असून ते सीएची उत्तम प्रॅक्टिस करतात.
महाविद्यालयात शिकत असतानाच सुनील यांनी ‘धडपड’, ‘समन्वय’ आदी नाट्यसंस्थांच्या काही प्रायोगिक नाटकांमधून कामे केली. तसेच श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित काही ग्रिप्स’ नाटकांचाही अनुभव घेतला. याशिवाय, ‘पडघम’, ‘केस डिसमिस्ड’, ‘महापूर’, ‘प्रपोजल’, ‘रामभरोसे’, ‘संगीत मित्रद्रय’, ‘छान छोटे, वाईट मोठे’, ‘युगांत’, ‘राजा बायोस्कोपवाला’, ‘तदैव लग्नम’, ‘चार गोष्टी प्रेमाच्या’, ‘बेगम बर्वे’, ‘स्वप्नात पाहिली राणीची बाग’, ‘एकदा काय झाले’ आदी प्रायोगिक तसेच काही व्यावसायिक नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्यामुळे त्याचा अभिनय विकसित होत गेला. मधल्या काळात छोट्या पडद्यावर मालिकांमधून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. ‘प्रारब्ध’ ही त्यांची पहिली मालिका. त्यानंतर ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘अग्निहोत्र’, ‘अमर प्रेम’, ‘पिंपळपान’, ‘आवर्तन’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि ‘रुद्रम’ अशा विविध मालिकांमधून त्यांनी आगळ्यावेगळ्या भूमिका रंगविल्या. यातील ‘एका लग्नाच्या ‘दोन’ गोष्टींमुळे त्यांची ‘घरोघरी’ ओळख झाली. अगदी सुरुवातीला नाटकांमधून कामे करीत असतानाच अभ्यंकर यांचे ‘दहावी फ’ चित्रपटांद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले होते. त्यानंतर बऱ्याच काळाने परेश मोकाशी यांच्या ‘हरिश्चंद्रांची फॅक्टरी’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली आणि त्यानंतर ‘सुखांत’, ‘चिंट’. ‘यलो’,लग्न मुबारक,मंत्र, अवताराची गोष्ट,देऊळ बंद,चि.व चि.सौ.का,मुळशी पॅटर्न’, ‘वेडिंगचा सिनेमा’,’सरसेनापती हंबीरराव’ आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अभ्यंकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटांतील त्यांची प्रत्येक भूमिका वेगवेगळी आहे.. ‘चि. व चि. सौ. कां मध्ये त्यांनी तीन मुलांच्या पोक्त वडिलांची भूमिका केली आहे; तर ‘मुळशी पॅटर्न’ मधील त्यांचा लाचार वकील ही प्रेक्षकांना चांगलाच भावला. परेश मोकाशी यांच्याच ‘खटला बिटला’ या आगामी चित्रपटातदेखील त्यांनी बचाव पक्षाच्या वकिलाची सुंदर भूमिका केली आहे.
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही. पुढे-मागे दिग्दर्शन करण्याचीही त्यांची इच्छा आहे. सध्या मराठी चित्रपटांना अतिशय चांगले दिवस आल्याबद्दल त्यांना आनंद आणि समाधान वाटत असले तरी दरवर्षी निर्माण होणाऱ्या सुमारे शंभर चित्रपटांपैकी प्रेक्षकांपर्यंत किती चित्रपट पोहचतात आणि त्यातील प्रेक्षकांना किती आवडतात याचाही सर्व संबंधितांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. ग्वाल्हेरचे माहेर असलेल्या त्यांच्या पत्नी चित्रा याही उच्चशिक्षित असून अभ्यंकर यांच्या पाठीशी त्या नेहमीच खंबीरपणे उभ्या असतात. सातवीत शिकत असलेला अभ्यंकर यांचा मुलगा पलाश यालाही अभिनयाचे वेड असून बालकलाकार म्हणून तो सध्या अभ्यंकर यांच्या अभिनयाची परंपरा चालवीत आहे.
सुनील अभ्यंकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— श्रीकांत ना. कुलकर्णी.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply