मुक्ता बर्वे यांचा जन्म १७ मे रोजी झाला . त्या मूळच्या पुण्याजवळील चिंचवड गावच्या आहेत. वडील वसंत बर्वे आणि आई शिक्षिका व नाट्यलेखिका विजया बर्वे. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्ताने अवघी चार वर्षाची असताना आईच्या ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. इ.स. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून (ललित कला केंद्र) नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.
अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटातून मुक्ताने आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले आहे. यासाठी अनेक पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले आहे. जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणार्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.
१९९८ साली ” घडलंय बिघडलंय ” या मालिकेतून मुक्ताने टेलिव्हिजन वरील पदार्पण केले. खेडवळ अशा चंपाची भूमिका तिने साकारली. ती रसिकांना खूप आवडली. त्यानंतर पिंपळपान , बंधन , बुवा आला , चित्त चोर , मी एक बंडू , आभाळमाया , श्रीयुत गंगाधर टिपरे आणि इंद्रधनुष्य या मालिकांमधून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या . २००१ मध्ये सुयोगच्या ” आम्हाला वेगळे व्हायचंय ” या नाटकातून त्यांना व्यावसायिक नाटकात काम करण्याची पहिली संधी चालून आली. २००४ साली, ” चकवा ” या चित्रपटातून मुक्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. चकवा चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा पदार्पणातील लक्षवेधी चेहरा हा त्यांना पुरस्कार मिळाला. २००५ मध्ये अमोल पालेकरांच्या “थांग” या मराठी आणि इंग्रजी द्वैभाषिक सिनेमात मुक्ताची छोटी भूमिका होती. याच वर्षी ” देहभान ” आणि ” फायनल ड्राफ्ट ” या दोन व्यावसायिक नाटकांमधून मुक्ताने काम केले . ” फायनल ड्राफ्ट ” मधील विद्यार्थिनीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. मराठी रंगभूमीवर नवनवीन नाट्य प्रयोग करून पाहायला नेहमीच उत्सुक असलेल्या मुक्ता बर्वे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये नसीम सोलेमानपूर (इराणी लेखक) लिखित आणि सिद्धेश पूरकर अनुवादित (मराठी अनुवाद) ” व्हाईट रॅबिट रेड रॅबिट ” या नाटकाचा पुण्यात भरत नाट्य मंदिर येथे प्रयोग सादर केला. जगभरातील अनेक भाषांमधील अनुवादित झालेल्या सदर नाटकाचे वैशिष्ट्य त्याच्या उत्फूर्त सादरीकरणात होते. दिग्दर्शक नाही आणि संहितेचे सादरीकारणापूर्वी वाचन नाही, कलाकाराला थेट रंगमंचावर संहिता हातात मिळते, नाटकात एका कलाकाराला एकच प्रयोग सादर करता येतो. रंगमंचावर कलाकाराने संहिता वाचत वाचत कलाकार आणि प्रेक्षकांनी नाटकाचा सह-अनुभव घ्यायचा अशा कलाकारासाठी धाडसी आणि प्रेक्षकांसाठी नवख्या वाटाव्या अशा प्रयोगाचे चॅलेंज मुक्ताने अगदी सहज पेलले.
मुक्ता बर्वे आणि विनय आपटे यांचे ‘ कबड्डी कबड्डी ‘ हे नाटक कोणीच विसरू शकणार नाही त्यात दोघानीही जबरदस्त अभिनय केला होता . ‘ छापा काटा ‘ ह्या नाटकात मुक्ता बर्वे , रीमा लागू , नीना कुलकर्णी , नंदू गाडगीळ ” यांनी काम केले होते . त्यानंतर त्यांचे लव्हबर्ड्स हे नाटक आले. मुक्ता बर्वे यांनी ‘ रंग नवा ‘ हा एक आगळावेगळा कवितांचा कार्यक्रम केला होता. ह्या वेगळ्या कवितांच्या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली होती. अर्थात हे वेगळेच धाडस होते . मुक्ता बर्वे यांची मैत्रीण रसिका जोशी यांच्या समरणार्थ त्यांनी निर्मिती संस्था काढली . ऑक्टोबर २०१६ मध्ये रसिका-अनामिका प्रॉडक्शन्स बरोबर मुक्ताने ‘दीपस्तंभ’ नाटक रंगभूमीवर आणले. त्याचप्रमाणे इंदिरा हे नाटक रंगभूमीवर आणले. फेब्रुवारी २०१७ मध्ये ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांबरोबर, मुक्ता बर्वे यांनी, ‘ सखाराम बाईंडर ‘ या विजय तेंडुलकर लिखित सुप्रसिद्ध नाटकाचे विशेष पाच प्रयोग रंगभूमीवर सादर केले. नाटकातील सर्व कलाकारांनी या प्रयोगांचे मानधन न घेता, या प्रयोगांमधून जमणारा निधी बॅकस्टेज कलाकार मदत निधी म्हणून दिला.
मुक्ता बर्वे यांनी आम्हाला वेगळे व्हायचे , देहभान , फायनल ड्राफ्ट , हम तो तेरे आशिक है ह्याही नाटकातून कामे केली. सध्या त्यांचे ‘ कोड मंत्र ‘ नाटक गाजत आहे . निर्माते दिनूकाका पेडणेकर आणि मुक्ता बर्वे हे मराठी रंगभूमीला उत्तम नाटके देऊन वेगळ्या अर्थाने मराठी रंगभूमीला समृद्ध करत आहेत . मुक्ता बर्वे यांनी चकवा , थांग , शेवरी , आघात , हायवे , वाय झेड , डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई , जोगवा , लज्जा अशा अनेक चित्रपटातून त्यानी भूमिका केल्या आहेत . सहज म्हणून सांगतो माझा ग्राफोलॉजीचा अभ्यास आहे म्हणून सांगतो मुक्ता बर्वे यांची स्वाक्षरी सर्व काही सांगून जाते . त्यांच्या स्वाक्षरीचे स्ट्रोक्स बरेच काही सांगतात , मुख्य म्हणजे त्यांच्यामधला ठामपणा आणि बुद्धिमत्ता हे विशेष गुण त्यात प्रकर्षाने दिसून येतात.
मुक्ता बर्वे यांच्याबद्दल एकाच वाक्यात सांगायचे झाले तर इतकेच सांगावे लागेल ‘सामाजिक भान असलेले एक बुद्धिमान आणि संयमी , प्रामणिक , आधी माणूस आणि मग कलाकार असणारे व्यक्तिमत्व’
– सतीश चाफेकर.
Leave a Reply