मालती विश्राम बेडेकर म्हणजेच विभावरी शिरुरकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९०५ रोजी त्यांच्या आजोळी अलिबाग आवास येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाळूताई असे होते. त्याच्या वडिलांचे नाव अनंतराव खरे तर आईचे नाव इंदुताई असे होते. त्यांचे वडील गुहागर येथून मुबंईला आले परंतु तेथे त्यांना कोणताच आधार नव्हता. ते गुहागरच्या फाटक या माणसाकडे शिवणकाम आणि इतर काम करत राहिले. दुपारच्या वेळी दुकान बंद असल्यामुळे ते चित्रकलेच्या वर्गाला जात असत तेथे त्यांनी चित्रकलेच्या परिक्षा दिल्या. त्यानंतर ते मुबंईला फणसवाडीमध्ये म्हणजे गिरगावात रहावयास आले. मुंबईत असताना त्यांची ओळख रावसाहेब रेगे यांच्याशी झाली आणि त्यांच्यावर टिळक-आगरकर यांच्या विचाराचा पगडा बसला.
पुढे प्लेग सुरु झाल्यामुळे ते शिरूर येथील अमेरिकन मिशन स्कुल मध्ये चित्रकलेचे शिक्षक म्ह्णून नोकरी करू लागले. तेव्हा त्यांना दुसरी मुलगी झाली तिचे नाव बाळूताई ठेवले. त्यांच्या मोठी मुलगी म्हणजे कृष्णाबाई मोटे . त्यांना आणखी दोन मुली होत्या एक मुलगी स्टॅटीस्टिशिअन होती तर दुसरी डॉक्टर . त्यांना आपल्या मुलींना खूप शिकवयाचे होते . ते पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी आपल्या मुलींना मिशनच्या स्कुलमध्ये टाकले. बाळुताईंचे शिक्षण शिरूरला झाले. बाळूताई पुण्याला कर्वे शिक्षण वसतिगृहात असत. त्या १९१९ साली संस्थेच्या मॅट्रिकच्या परिक्षेत पहिल्या आल्या. कर्वे विद्यापीठाच्या जी. ए . च्या परिक्षेत त्या पहिल्या आल्या. त्यांनी ‘ प्रघोगमा ‘ या पदवीसाठी ‘ अलंकारमंजुषा ‘ हा प्रबंध १९२८ साली लिहिला. पुण्याच्या कन्याशाळेमध्ये १९२३ ते १९३३ या काळात शिक्षिका आणि लेडी सुप्रिडेंट म्हणून त्यांनी काम केले. मुंबईला जाऊन त्या बी. टी .ची परिक्षा उत्तीर्ण झाल्या. श्री. मा . माटे यांच्यामुळे मालतीबाई अस्पृश्यांच्या उद्धाराच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
त्यांना त्या काळात ‘ महाराष्ट्राची विद्युलता ‘ म्हणून ओळखले जात होते. त्या कर्वे आश्रमात रहात असल्यामुळे त्यांच्या मनावर तेथे आलेल्या स्त्रियांबद्दल , त्यांच्या वास्तव प्रश्नाचे दर्शन घडत असे त्यामुळे त्यांच्या संवेदनशील मनावर परिणाम होत असे. त्यांच्यावर टिळक , आगरकर , कर्वे , माटे यांचा प्रभाव होता . त्यांची कळ्यांचे निश्वास , हिंदोळ्यावर आणि विरलेले स्वप्न ही पुस्तके ह . वि . मोटे यांनी प्रकशित केली होती ती ‘ विभावरी शिरुरकर ‘ या नावाने. ‘ कळ्यांचे निश्वास ‘ या पुस्तकात ११ कथा आहेत . हे पुस्तक मराठी साहित्यामधील मैलाचा दगड ठरले आहे. त्यामधील ‘ बाबांचा संसार कसा होणार ! ‘ ह्यामधील निर्भीड सत्यकथन सनातनी संस्कृती रक्षकांना झोबले होते , टोपणनावाने कोण लिहितो ह्याचा कसून शोध झाला होता. महाराष्ट्रांमध्ये त्यावरून चर्चा , ठिकठिकाणी सभा , वादविवाद झाले . कुणालाही कळत नव्हते ‘ विभावरी शिरुरकर ‘ कोण आहे . ही माहिती १९४९ साली प्रकाशित झालेल्या ‘ विभावरीचे टीकाकार ‘ या पुस्तकात त्याची सविस्तर माहिती आहे. अनेकांनी त्यांना विरोध केला. विरोधक ‘ विभावरीचा पत्ता द्या ‘ असा एकच घोषा सुरु झाला होता त्यावेळी. न.चि .केळकर , आचार्य अत्रे , वा. म . जोशी , मामा वरेरकर , कमलाबाई टिळक इत्यादीनी विभावरी यांच्या साहित्याची प्रशंसा केली. त्याकाळी कादेशीर घटस्फोटाची कायदेशीर सोय नव्हती . ६०-६५ वर्षांपूर्वी लग्न न करता चिरागवर प्रेम करून मातृत्वाचा अधिकार मिळवण्यावर ‘ अचळा ‘ ठाम असते. हाच क्रातींकारी विचार अनेक संस्कृती रक्षकांना झोंबला होता.
मालतीबाई यांनी कौटिल्याचं अर्थशास्त्र, वात्सायन, भारतीय संस्कृतीमध्ये असलेले स्त्रियांचे उल्लेख, वेदांपासून स्मृतींपर्यंत अफाट वाचन केले त्याचप्रमाणे त्यांनी अलंकार मंजूषा हा प्रबंध लिहिला.
मालतीबाई बेडेकर उर्फ विभावरी शिरुरकर यांची ‘ हिंदोळ्यावर ‘ ह्या कादंबरीतून वैचारिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्त्रीमुक्तीचा महत्वाचा टप्पा गाठला होता आणि आजही २०१७ साली आपण किती पुरोगामी आहोत यांचा विचार करणे आवश्यक आहे. पुढे त्यांनी विभावरी शिरुरकर या नावाने विरलेले स्वप्न , बळी , बाई , दोघांचे विश्व आणि इतर कथा , शबरी ही पुस्तके लिहिली आहेत . तर रानफुले , हिंदू-व्यवहार धर्मशास्त्र , स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा ही पुस्तके त्यांनी ‘ बाळूताई खरे ‘ या नावाने लिहिली. त्याचप्रमाणे चार भाषांतरे , घराला मुकलेल्या स्त्रिया , काळाची चाहूल , संकटमुक्त स्त्रियांचे पुनर्वसन , उमा , काही नाटके आणि साखरपुडा , चित्रपट , मनस्विनीचे चित्रं , प्रौढ साक्षरतांसाठी लेखन असे विविध लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर यांच्या नावावर आहे. ‘ खरेमास्तर ‘ ही मालती बेडेकर यांच्या वडिलांच्या जीवनावर आधारित चरित्रवजा कादंबरी असून त्याचा इंग्लिश भाषेत अनुवाद झाला आहे.
त्यांच्या ‘ पारध ‘ या नाटकाला मुंबई साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला होता तर बळी , शबरी , घराला मुकलेल्या स्त्रिया आणि काळाची चाहूल यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते.
पुढे १९५६ नंतर मालतीबाई बेडेकर यांनी ‘ महिला सेवाग्राम ‘ मध्ये विनावेतन काम केले. त्या अनाथ मुलांना वेळप्रसंगी घरी सांभाळत असत.
श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी किंवा बाळुताई खरे या नावांनीही मालतीबाईंनी लेखन केले आहे. सामाजिक प्रश्नांविषयीची कळकळ, स्त्रीप्रश्नांविषयीची आस्था, वस्तुनिष्ठ पण संवेदनशील चित्रण ही मालतीबाईंच्या लेखनाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. १९६० नंतरच्या स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणांमध्ये त्यांच्या लेखनाचा मोठा वाटा आहे. त्याआधी १९३४ ला मुंबईत बी.टी. करीत असताना प्रसिद्ध लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्याबरोबर त्यांची ओळख झाली. त्याचं रूपांतर १९३८ मध्ये विवाहात झालं. तेव्हा बाळुताई खरेच्या ह्या मालतीबाई बेडेकर झाल्या.
१९५१ साली मालतीबाई पुण्यात असताना प्रथम काँग्रेसने त्यांना निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून विचारलं. पण काँग्रसची धोरणं त्यांना पसंत नव्हती. म्हणून त्या नाही म्हणाल्या. मग प्रजासमाजवादी पक्षातर्फे नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी यांनी त्यांना सभासदत्व दिलं आणि त्या विधानसभेसाठी उभ्या राहिल्या. मतदान झालं , गंभीर आणि गमतीदार गोष्ट म्हणजे मालतीबाईंना एकही मत मिळालं नाही. मालतीबाई सांगत होत्या. ‘इतकंच काय स्वत:चं मतही त्या पेटीत नव्हतं.’ तेव्हा पुन्हा यात पडायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलं.
लेखिका संमेलन आणि अखिल भारतीय स्त्री परिषदा पाच ठिकाणी भरल्या त्याच्या त्या अध्यक्ष होत्या. धर्म परिषद, राम मनोहर लोहिया यांची इंग्रजी हटाव परिषद याच्याही त्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्रात त्यांनी दिलेल्या स्त्रीविषयक व्याख्यानांची संख्या दोन हजारांवर झाली आहे त्या व्याख्यानांमधून त्यांनी आपले पुरोगामी विचार मांडले, त्यांच्या पुस्तकांना अनेक पारितोषिकं मिळाली.
१९८१ साली अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मालतीबाई उभ्या होत्या. पण अवघ्या सात मतांनी त्यांचा पराभव झाला गो.नी. दांडेकर निवडून आले. त्या संमेलनात मंत्र्यांनी हस्तक्षेप केला , महाराष्ट्र सरकारने तीन पुस्तकांना बक्षिसे नाकारली. याचा निषेध म्हणून त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत समांतर साहित्य संमेलन भरले. हे संमेलन लेखक व पत्रकारांनी भरवले होते. या समांतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मालतीबाई बेडेकर होत्या.
१९८१ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील रूपारेल कॉलेजच्या प्रांगणात घातलेल्या मांडवात हे अभूतपूर्व संमेलन पार पडले. कार्यक्रम दोन दिवसांचा होता. उद्घाटनासाठी व्यासपीठावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पु.ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, वा.ल. कुलकर्णी ही मंडळी होती. दुर्गाबाई भागवत प्रेक्षकांत बसल्या होत्या. मालतीबाई बेडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात ‘आविष्कार स्वातंत्र्याची ‘ व्याप्ती नेमक्या शब्दांत सांगितली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पु.ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ आणि वा.ल. कुलकर्णी यांची भाषणे झाली. ही ऐकायला रसिकांनी खूप गर्दी केली होती. मला आठवतंय मी त्या ‘ समांतर साहित्य संमेलनाला ‘ गेलो होतो.
या समांतर साहित्य संमेलनात रात्री कविसंमेलन, दुसऱ्या दिवशी चर्चा, परिसंवाद, कथाकथन आदी कार्यक्रम झाले. कविसंमेलनाला नागपूरहून सुरेश भट आले होते. दुर्देवाने आजही २०१७ साली परिस्थिती बदलली नाही. तसेच चालले आहे. अशा बुद्धिवादी आणि स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या मालतीबाई बेडेकर यांचे ७ मे २००१ रोजी निधन झाले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply