मराठवाड्याची गानकोकीळा ,कवयित्री, ललित ग्रंथ लेखिका संजीवनी तडेगांवकर जन्म २ मार्च रोजी झाला.
कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर या मराठीतील एक संवेदनशील मनाच्या भावकवयित्री. त्यांच्या कविता मनाला संमोहित करणारी आहेत. स्त्रियांमधील राधा,मीरेच्या तरल भाववृत्तीला काळजातल्या शब्दातून कवितेत टिपणारी कवयित्री आहेत. त्यांची कविता म्हणजे सर्व वयोगटातील स्त्रियांच्या मनातली घुसमट व्यक्त करणारी सखी. मनाच्या कोवळ्या फांदीला फुटलेले लुसलुसी फुटवे.त्यांची कविता म्हणजे बंद घरातून, अरुंद दारातून बाहेर पडतांना होणा-या यातनांचा जागर आहे. त्यांची कविता ही अनेक मुक्या मनांची पालखी घेऊन येते, आणि कबीराचे गाणे गात गात भूपाळीतून भैरवी पर्यंत पोहोचते.त्यांच्या कवितेला स्वत:ची लय आहे, पोत आहे.त्यांची कविता ही गावखेड्यातील बाया बापड्यांच्या मुक्या गंधवेणा घेऊन येते. तशीच अनेक लेकीबाळींच्या जिवाचा कोंडमारा,वेदनेचा विरह,मनाचं आक्रंदन, घेऊन येते. स्त्रीजीवनाच्या अंतर्मनाचे निनाद टिपताना दिसते. थोडक्यात कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकरांची कविता ही अस्सल जीवनानुभवाच्या दु:खाची, उध्वस्त, उद्विग्न मरणासन्न यातनांची कविता आहे.
कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांचे ‘फुटवे’, ‘अरुंद दारातून बाहेर पडताना’, ‘संदर्भासहित’ हे तीन काव्यसंग्रह ‘चिगूर’ ललित लेखसंग्रह, ‘पापुद्रे’ निवडक लेखिकांचा मुलाखतसंग्रह, ‘ आणि झरे मोकळे झाले ‘ समीक्षा , ‘ एक होती सारा ’ अमृता प्रीतम यांच्या पुस्तकाचा अनुवाद, इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. आगामी ‘ समीक्षा: मराठवाड्याची कविता ’ हा समीक्षाग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मराठी विषयात एम.ए करून ११८० नंतरच्या मराठी कवयित्रींच्या कावितेतील स्री जाणीवा – एक चिकित्सक अभ्यास या विषयात पीएच्.डी केलेली आहे. जालना येथून प्रकाशित होणा-या ‘ आशयघन ’ त्रैमासिकाच्या संपादनाचे काम करतात. त्या महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ सदस्य आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती इंदिरा संत पुरस्कार, प्रसाद बन पुरस्कार, नांदेड, भि.ग. रोहमारे काव्य पुरस्कार, कोपरगाव. यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार पुणे ,चंद्रभागा साहित्य पुरस्कार, जालना.धोंडीराम माने उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, औरंगाबाद.सुभद्रा राज्य काव्य पुरस्कार, सेलू, परभणी, कला गौरव राज्यसाहित्य पुरस्कार, तरडगाव, सातारा, कुसुमाग्रज उत्कृष्ट राज्यकाव्य पुरस्कार वैजापूर,अजिंठा काव्य पुरस्कार, जालना, मराठवाड़ा कलागौरव पुरस्कार, औरंगाबाद व इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्यकृती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड,संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
प्रा. लक्ष्मण महाडिक
संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply