मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ही फक्त आपल्या मुंबईचीच मक्तेदारी नाही तर संबंध देशातील प्रत्येकाने मराठी अस्मिता जपायला हवी, अशी माझी धारणा आहे. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता मा. राजसाहेब ठाकरे जे मराठी भाषा आणि अस्मितेबद्दल बोलतात ते उगीच नाही. काही करंटे लोक त्यांना संकुचित वृत्तीचे बोलतात, मात्र ते द्वेषापोटी बोलतात असे वाटते. रशिया सारख्या देशात, ऑस्ट्रेलिया सह इतर अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत. त्या अनेक देशांमध्ये निश्चितच मराठी भाषा जाणणारे लाखो लोक असतील म्हणूनच तर रेडिओ स्टेशन उभारली आहेत. एखाद दोन माणसांसाठी कशाला कोण रेडिओ केंद्र काढेल ?
इतकेच नव्हे तर आपला दुष्मन समजला जाणारा देश म्हणजे पाकिस्तान ! त्या देशातील कराची येथे नारायण जगन्नाथ विद्यालय नावाची मराठी शाळा असून इथले विद्यार्थी त्याच्या राज्यात गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात, ही वस्तुस्थिती आहे. मराठी भाषा तिथे संस्कृत सहित शिकवली जाते. मराठी भाषेला त्या ठिकाणी अनन्य महत्व आहे. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही, ही गोष्ट देखील आपल्या अभिमानाचीच आहे. आपल्या देशात जो इतिहास शिकवला जातो त्याच्यात इतर भाषिकांचा द्वेष नजरेस पडतो. अन्यथा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच “मी माझी झाशी देणार नाही” असे ठणकावून म्हटले होते, त्याऐवजी आपल्याला हिंदीत सांगितले गेले.
मराठी भाषा बोलायला , ऐकायला जेवढी गोड आहे त्यापेक्षा कितीतरी पट ती आत्मसात करायला कठीण. करण इतर भाषेपेक्षा मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रमच आहे. आपल्या भारतातच कितीतरी राज्यात अनेक मराठी भाषिक आहेत. त्यातल्या त्यात फक्त हरयाणा या राज्यामध्ये अंदाजे दहा ते अकरा लाख मराठी बांधव गुण्या गोविंदाने राहतात.
मराठी भाषेची ताकद इतकी अफाट आहे की सुमधुर गाण्यांचा स्रोत मराठीतून खूप सुंदर व सुमधुर येतो. मराठी भाषेतून भावना व जाणीव इतक्या स्पष्टपणे मांडता येतात ज्या दुसऱ्या भाषेतून तितक्या स्पष्ट मांडता येत नाहीत. महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी तर “गणित” आणि “विज्ञान” हे विषय आता मराठीतच शिकवण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. इतकेच नव्हे तर कॉम्पुटरवर म्हणजेच संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात. देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा हा देखील मराठीच्या या महाराष्ट्राचाच आहे. व्यवसाय क्षेत्रात सुद्धा सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे. पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठ्यांचे मराठी राज्य विस्तारले होते. तेव्हा संपूर्ण भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर होती त्यावेळी हिंदी भाषा ही तृतीय क्रमांकावर होती.
मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल यात शंकाच नाही!
शेवटी जाता जाता इतकेच सांगावेसे वाटते की, कधीकाळी प्रथम क्रमांकावर असलेली आपली मायभाषा मराठी आपल्याच काही मूर्ख लोकांमुळे किंवा त्यांच्या मुर्खपणामुळे मागे पडली. ज्या भाषेत सर्वात जास्त साहित्यप्रकार आहेत, ज्या भाषेला सर्वात जुना इतिहास आहे, ज्या भाषेत १३० पेक्षा अधिक कलाप्रकार आहेत आणि ज्या भाषेला संतांचे बोल आहेत अशा आपल्या मराठी भाषेचा आपण अभिमान हा बाळगायलाच हवा .
— डॉ. शांताराम कारंडे
मोबा. क्र. ९८२०१५८८८५
Leave a Reply