MENU
नवीन लेखन...

मराठी भाषेचा ‘पण’!

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला शकुंतला मुळ्ये यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. मात्र आजही हे संदर्भ सद्य परिस्थितीत जसेच्या तसे लागू पडतात. 


अलीकडेच म्हणजे काही महिन्यांपूर्वी (2010 मध्ये) महाराष्ट्र शासनाने, मराठी भाषेच्या काळजीपोटी एक समिती नेमली, मराठीच्या संवर्धनासाठी काही लक्ष रुपयांची तरतूदही केली. या बातमीपाठोपाठच, काही वृत्तपत्रांनी मराठी शाळांचा प्रश्न कळकळीने मांडला, प्रत्येक शाळेत मराठी ग्रंथांना विशिष्ट जागा दिलीच पाहिजे असा सरकारी फतवाही वृत्तपत्रांमधून जाहीर करण्यात आला. एकूणच मराठी भाषेला सोन्याचे दिवस आले, असे म्हणायला आता हरकत नाही!

मात्र, आपण ज्या मराठी भाषेचा अभिमान बाळगतो, (निदान ‘मी मराठी’ असं दाखवतो तरी) तिच्या दुर्दशेला आपणच जबाबदार आहोत, हे विसरून कसं चालेल? मराठी भाषेचा पूर्ण सन्मान करणारा, सहित्य संमेलनांसारख्या अखिल भारतीय पातळीवरचा सोहळाही भरवतो. यावर्षी (2010 मध्ये) हा सोहळा ठाणेनगरीत साजरा होतो आहे. मराठी भाषेच्या संदर्भातले परिसंवाद आणि चर्चात्मक कार्यक्रमही संमेलनात होणार आहेत. या निमित्ताने कोणताही अभिनिवेश न ठेवता, मराठीप्रेमी म्हणून काही सांगावंसं वाटतं.

मराठीचा भाषिक वापर शक्य तितक्या अचूक असावा, असं मानणाऱ्यांपैकी मी एक. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे, ‘मराठी’बाबत लिहिताना, कुसुमाग्रजांची ती सुप्रसिद्ध कविता सदोदित, जिथे जिथे उद्धृत केली जाते, आपण ती वाचतो तेवढ्यापुरत्या आपल्या संवेदना जाग्या होतात, बस्स! तेवढंच. भाषेची प्रगतीऐवजी अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे.

कसले हे पण?

अर्थवाही शब्दांची सुयोग्य मांडणी म्हणजे जर वाक्य असेल तर आपण त्याची कदर नको करायला? अतिरेकी व्यक्तिस्वातंत्र्याच्या आजच्या काळात, भाषेबाबतही आपण स्वैराचार करू लागलो आहोत. भाषा-तोडमोडीचे, विदूप करण्याचे हे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्याबाबत बरेच सांगण्यासारखे आहे. मात्र एका अगदी असह्य झालेल्या शब्दप्रयोगासाठी हा लेखप्रपंच! भाषेत शब्दयोगी अव्ययांचा वापर सर्रास होत असतोच.

आणि तो सहजगत्या होत असताना, अलीकडे मात्र शब्दयोगी अव्यय नामाला जोडून लिहिणे हा फार भयंकर प्रकार आहे. असेही आपण समजू लागलो आहोत की काय! कारण आहे ‘पण’ या शब्दाचा, शब्दयोगी अव्ययासारखा अर्थहीन वापर!

पूर्वीच्या गोष्टींमधले राजे-महाराजे एखादा ‘पण’ करायचे, राजकन्येच्या स्वयंवरासाठी ‘पण’ असायचा. तसे स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण ‘पणास’ लावले. अशा या ‘पण’ची आपण पूर्ण वाताहत केली आहे. ‘पणा’तला ठामपणा लयाला गेला. आता हा ‘पण’ फारच सवंग होऊ लागलाय. वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके, आणि चित्रवाणीच्या विविध मराठी वाहिन्या यातील मराठीची चिरफाड आणि ‘पण’ची असोशी पाहणे मनोरंजक ठरावे. उदा. हा परिच्छेद पाहा-

‘आम्ही सगळ्या मित्रांनी सिनेमाला जायचं ठरवलं . माझे बाबा पण येणार म्हणाले, आई पण यायला तयार झाली. मग माझा छोटा भाऊ पण हट्ट करू लागला. पण माझा आवडता मित्र रोहन आला नाही. पिक्चर पाहिल्यावर आइस्क्रिमपण खाल्लं आणि भेळ पण…’

वास्तविक ‘पण’ चा अतिरेकी वापर टाळून, मूळ नामाला शब्दयोगी अव्यय जोडून लिहायचं असतं, हे हल्लीच्या स्वतंत्र वृत्तीला मानवत नाही बहुधा. येथे बाबाही, आईसुद्धा, भाऊदेखील असे शब्द वापरायला हवे होते. सदोदित ‘पण’ ची खैरात करणारी ही व्यक्ती, लोकप्रिय लेखक आहे, हे विशेष! -ही, -सुद्धा, -देखील, -खेरीज अशी शब्दयोगी अव्यये वापरली असती तर हे वाचन सुसह्य झाले असते.

‘पण’ या शब्दाचा दुसरा, अगदी दररोज होणारा प्रयोग पाहा- (वाक्यांश)

– त्यांनी निसर्गसंवर्धनासाठी अशा अनेक गोष्टी तर सांगितल्याच पण निसर्गाच्या हासाची आकडेवारीही दिली.

– आता तिथे भरपूर वाघ तर आहेतच पण २० सिंह आहेत.

– सायना नेहवालने आपल्या कर्तृत्वाने स्वतःच्या कुटुंबार्च शान तर वाढवलीच पण देशाची मान पण उंचावली

– हे उत्कृष्ट लेखक आणि कवी होतेच पण चिंतनशी वृत्तीचे समाजसुधारकही होते.

– तो साधा तर आहेच पण हुशार आहे.

वरील सर्व वाक्यांत ‘पण’ हा शब्द ‘शिवाय’ ‘खेरीज’ या अर्थी वापरला गेला आहे. मात्र ‘पण’ च्या अशा वापरामुळे येथे अर्थाला बाधा येते. हा ‘पण’ नकारात्मक सूचन करतो. ते अर्थाला मारक आहे. वाचकाला दातांखाली खडा यावा तसं टोचत राहतं. जास्त खंत वाटते ती यासाठी, की ‘शिवाय’ हा शब्द उपलब्ध असताना (तो लिहिण्यास कठीण नाही.) पण वापरण्याचं कारण काय? वृत्तपत्रांतून हे रोज वाचायला मिळतंच. वाचकांचं दुर्दैव!

‘शिवाय’ सारखे काही शब्द आपण अकारण बाजूला टाकतो आणि चुकीच्या गोष्टी चटकन आत्मसात करतो. भविष्यात अशी स्थिती येईल, की न वापरल्याने चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरणे रूढच होईल आणि योग्य शब्द मृतप्राय होतील. मराठीने संस्कृत, इंग्रजी, हिंदी यांच्याबरोबरच अरबी, फारसी, पोर्तुगीज शब्दही आपलेसे केले आहेतच. दैनंदिन जीवनात ते अगदी सहजपणे रुळले आहेत.

मराठीच्या विविध बोलींचा गोडवा, प्रादेशिक ठसका, भाषेत जरूर हवा, त्यामुळे शब्दसंपत्तीत वाढ होते. संस्कृतीत ही देवाणघेवाण होते. मात्र माहिती, इतिहासलेखन, विज्ञानविषयक लेखन यात प्रमाणभाषाच हवी. विशिष्ट व्याखा, संकल्पना, या बोलीभाषेत/ घरगुती भाषेत लिहून चालणार नाही. प्रादेशिक गोडवा ललित लेखनात वापरणे इष्ट. प्रत्येकालाच आपली बोली प्रिय असते. मात्र ज्ञानभाषा ही व्याकरणशुद्ध हवी. किमान अर्थवाही तरी हवीच. हे माझे मत; ते सांगितल्यावर माझे एक उच्चशिक्षित स्नेही म्हणाले, ‘कशाला जीव पाखडता उगाच? अर्थ कळतोय ना दुसऱ्याला? बस्स झालं!’ असं सोपं समीकरण हिताचं नाही. क्लिष्टता नको, सुलभता हवी हे ठीकच आहे. मात्र अजिबातच नको व्याकरण असे म्हणणाऱ्यांना विचारावंसं वाटतं, फार खोलात नका जाऊ, पणे जे वाक्य बोलता, ते अर्थवाही शब्दाचं हवं हे तर गृहीतच धरलेलं असतं ना? कोणतेही शब्द कोणत्याही क्रमाने बोलून अर्थ समजेल का? आणि व्याकरण तयार करणारे, भाषेच्या शुद्धतेचा, सौंदर्याचा विचार करणारे सगळे वेडे होते का? एक साधं उदाहरण देता येईल, बोलणाऱ्याच्या स्वरावलीवरून, आविर्भावातून नेमका अर्थ समजणं शक्य होईलही; पण लेखन-वाचनाचं काय? आपण वाचतो तेव्हा मनातल्या मनात जे अभिवाचन करतो (मग ते नाटक, कविता, इतिहास असं काहीही असेल) तेव्हा विरामचिन्हांची गरज असतेच असते. त्या चिन्हांमुळे शब्दांचे स्वर कळतात. विरामचिन्हे नकोतच म्हणणारी मंडळी आपल्यात आहेत. त्यांच्यासाठी हा परिच्छेद-(अर्थातच वृत्तवाहिन्यांच्या कृपेने)

१. भारताच विजयाच स्वप्न भंगल (भारताचं विजयाचं स्वप्न भंगलं.)

२. त्या छोट्या मुलांना काय करावस वाटत, काय येत, काय आवडत, काय सोडाव लागत, त्याच मला काय पडलय म्हणू नका. ही मुल जबरदस्ती शाळेत जातात.

अशी उदाहरणे शेकडो. एका वृत्तपत्रावर तर बातमीतल्या स्त्रियांच्या हातात फलकावर लिहिलेलं होतं, शिक्षणखात करतय काय? (इथे शिक्षण खाल्लं जात आहे का? तारतम्याने आपण ‘खात’ म्हणजे खाते समजून घेता झालं. मात्रेऐवजी अनुस्वार नसल्याने असे घोटाळे !)
आणखी दुसरं उदाहरण शब्दांच्या लिंग-वचनाचं शब्द रचनेचं.

– त्या मिश्रणात थोडं गुळ टाकाव, कणिक टाकावं

– कडीपत्ता घालून फोडली दिल्यास थोडं हिंग टाकाव,

– मैद्याला धुवावं

– सर्वांचे धन्यवाद,माझी मदत करा

– आपआपल्या जागी बसणे.

चुकीच्या पद्धतीने लिहिले जाणारे शब्द:

पारंपारिक, उब्बा, तब्बेत, हार्दिक, वकृत्व, पुर्ननिर्माण, आर्शीवाद इ.

काही वाक्यरचना: (अर्थातच चुकीच्या)

– मुद्दाम आजारी माणसाला आराम पडावा म्हणून इथे पूर्वी

– थंड हवेत आणत असत.

– त्यांनी अनेक जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा केली.

– जुन्या भंगारातून, जुन्या देवांच्या मूर्ती माझ्या दिव्यांच्या शोधात भटकत असताना मिळाल्या

– पटापट झाडावरून त्यांनी उड्या मारल्या

– रीतसर कोर्टात केलेलंही लग्न यशस्वी झाले नाही.

– म्हणजे उदास कधीतरी वाटल्यास ठीक
अशी अनेक उदाहरणे आहेत.

विशेषणांचा वापर

विशेषणांचे नित्य वापरात असणारे ३ ढोबळ प्रकार म्हणजे गुण विशेषण, संख्य विशेषण, आणि भाव विशेषण.

वाक्यरचना करताना मात्र कशाचा कशाला मेळ नसतो.

उदाहरणार्थ:

– महाराष्ट्रात पंधरा-सोळा हजार डोळ्यांचे डॉक्टर्स….

– चार द्राक्षं पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या

– सुंदर दाराभोवतीच्या रांगोळ्या

– स्वादिष्ट ज्वारीची भाकरी

– खूप मन हलकं झालंय

या वाक्यरचना पुस्तके, मासिके वृत्तपत्रे यांच्यातील असून शब्दांची अशी तोडमोड करण्यात नामवंत लेखक, पीएच.डी. मिळवलेले प्राध्यापक, संपादक आहेत याची खंत वाटते,

सरकारीमराठीची तर फारच गंमत:

इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून शासन, सामान्यांच्या डोक्यावरून’
जाणारे शब्दच निवडते उदा. निकास, निष्कासित (याचा अर्थ
कोणाला कळतो?)

उदा.: हे काही फलक

१) १६ वर्षे वयाचा व्यक्ती…

२) थंड पिण्याचे पाणी (Cold Drinking Water चे
शब्दशः भाषांतर.)

३) प्रचंड माणसांची गर्दी

४) प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईबद्दल..
(प्रवाशांच्या गैरसोईबद्दल अस म्हणायला हवं.)

५) त्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरले ( पानी फेरना या हिंदी
वाक्प्रचाराचं रूपांतर. पाणी पडलं’ ऐवजी)

आजची तरुण पिढी शॉर्टकटस् वापरून बोलते, हिंग्लिश बोलते, फंडा, कंडा इ. शब्द वापरते म्हणून त्यांना नावे ठेवण्यात अनेकांना धन्यता वाटते. परंतु आज वयाने जे ज्येष्ठ म्हणून गणले जातात, त्यांच्यापैकी बहुसंख्यांनी उत्तम व तळमळीने शिकविणाऱ्या शिक्षकांकडून शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी तरी व्याकरणाची अशी वासलात लावू नये ही इच्छा! आपल्या व्यक्तिमत्त्वाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आपली भाषा, भाषेचा स्वर. आपलं दिसणं केवळं वेशभूषेवर अवलंबून नाही. समाजात वावरताना आपण चांगलं दिसण्यासाठी उत्तम, स्वच्छ नीटनेटके कपडे वापरतो, आपली देहबोली असते तशी वाणीतून आपली संस्कृतीही समजत असते. ती जर वेशाइतकीच कसोशीने उत्तम ठेवली तर व्यक्तिमत्त्व प्रभावशाली बनते. किंबहुना भाषांचा अभ्यास आणि वापर हा आपल्याला अधिक प्रगल्भ आणि समृद्ध बनवीत असते.

मुद्दाम नमूद करावेसे वाटते, की ठाणे शहरात ‘मराठी अभ्यास केंद्र’ तरुण मंडळीमार्फत चालविले जाते. मराठीच्या विकासासाठी संगणकाशी मराठी लिपीचे लेखनाचा सुयोग्य घालण्यासाठी ही मंडळी धडपडली, माहितीच्या अधिकाराचा वापर करून, शासनाचे मराठीसंबंधीचे धोरणात्मक निर्णय जाणून घेणे, आणि संगणकात मराठीचा वापर इत्यादीबाबत तसेच मराठीच्या संवर्धनाबाबतही ते प्रेरक काम करताहेत; तेही आपापले व्यवसाय सांभाळून. या निमित्ताने या मंडळींचे अभिनंदन!

सहित्य संमेलनाच्या या शुभवेळेला सर्वांना एक विनंती करावीशी वाटते, प्रत्येकाने हे भाषिक दोष दूर करण्याचा निश्चय करावा. मी स्वतः माझ्या सहवासातील चार-पाच तरुण मुलींना वेळोवेळी सांगून त्यांच्यात ह्या सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे बोलताना आणि वाचताना त्या विचार करतात. इतकेच नव्हे, तर हवेत उष्णता असताना जर कोणी, ‘काय गरमी होतेय’ असं म्हटलं तर तिथल्या तिथे, गरमी हा शब्द कसा अयोग्य आहे, त्यासाठी उष्मा शब्द वापरला पाहिजे; हेही त्या अगदी आपल्या आईवडलांनाही ठणकावून सांगतात.

एकूणच आपण ‘आस्था’ आणि ‘साक्षेप’ या वृत्तीच नव्हे, तर हे शब्दही सोडून दिले आहेत, असे खेदाने म्हणावे लागते.

मराठीच्या उत्सवात आपल्या मराठीचे लेणे जतन करून, आपली संस्कृती आणि आपला मराठी बाणा दाखवावा. तरच आपण स्वतःला खऱ्या अर्थाने ‘मी मराठी’ म्हणू शकू.

सर्व रसिकांना ही प्रेरणा मिळावी, अशी सदिच्छा!

— शकुंतला मुळ्ये

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला — शकुंतला मुळ्ये यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..