नवीन लेखन...

मराठी चित्रपट दिशा आणि मार्ग

2020 च्या मार्च महिन्याआधी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून गृहीत धरुन चाललो होतो, त्यात भरलेल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्न खात मजेत सिनेमा पहाणं, ही एक गोष्ट होती. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाउनमधे थिएटर्स बंद होणं आणि टेलिव्हिजन हे आपलं करमणुकीचं प्रमुख साधन बनणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता…..

अनघा दिवाळी अंक 2021’ मध्ये प्रकाशित झालेला गणेश मतकरी

यांचा हा लेख.


सरासरी मराठी चित्रपटाला सध्या प्रेक्षक नाहीत, म्हणजे नव्हते. अर्थात चित्रपटगृहे बंद झाली तेव्हा. दर्जेदार चित्रपटांची संख्याही वाढत न जाता अलीकडे कमी होत गेलेली आहे. 2018/19 चे आकडे पाहिले तर दिसेल की वर्षाला शंभरच्या वर चित्रपट बनत होते, पण चित्रपटगृहात प्रतिसाद असलेले किंवा प्रतिसादाशिवायही दर्जेदार म्हणता येतील असे चित्रपट हाताच्या बोटांवर मोजण्यासारखेच असत.

2020 च्या मार्च महिन्याआधी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून गृहीत धरुन चाललो होतो, त्यात भरलेल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्न खात मजेत सिनेमा पहाणं, ही एक गोष्ट होती. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाउनमधे थिएटर्स बंद होणं आणि टेलिव्हिजन हे आपलं करमणुकीचं प्रमुख साधन बनणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता. चित्रपटाचा शोधच मुळात लागला, तो सार्वजनिक माध्यम म्हणून. 1895 साली पॅरीसमधे ल्यूमिएर बंधूंनी चित्रपटाचा केलेला खेळ हा सिनेमाचा निर्मितीक्षण म्हणून धरला जातो त्याचं कारण केवळ पडद्यावर हलणारी चित्र या खेळात होती म्हणून नाही, तर त्या चित्रांना समूहाने एकत्रित पहाणारा प्रेक्षकवर्ग हादेखील त्या प्रयोगाचा महत्वाचा भाग आहे. सर्वप्रथम सिनेमाचा शोध लागला तेव्हा जे अनेक संशोधक त्यावर काम करत होते, त्यात प्रख्यात संशोधक एडिसन याने एकेका व्यक्तीने हलती चित्र पहाण्याचं ‘किनेटोस्कोप’ हे यंत्र ल्यूमिएर यांच्या ‘सिनेमॅटोग्राफ’ आधी शोधलं होतं, आणि असं मानलं जातं की ते यंत्र अधिक लोकप्रिय ठरतं, तर वैयक्तिक अनुभव देणारं टेलिव्हिजन माध्यम हे सामूहिक अनुभव देणाऱ्या चित्रपटापेक्षा वरचढ ठरलं असतं. आता सिनेमाच्या जन्मानंतर सव्वाशे वर्षांनी टेलिव्हिजनला वरचढ ठरण्याची  ही संधी या काळात पुन्हा एकदा चालून आली आहे.

अर्थात, जेव्हा आपण पॅन्डेमिक काळात टेलिव्हिजन राहिला, आणि  सिनेमा बंद झाले म्हणतो, तेव्हा आणखीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. की हा फरक प्रामुख्याने वितरणाच्या माध्यमांमधला आहे, निर्मितीमधला नाही. लॉकडाऊन लागले तेव्हा चित्रीकरणालाच जे टाळं लागलं त्याने जशी चित्रपटांच्या नवनिर्मितीची प्रक्रिया थांबली तशीच टेलिव्हिजनवर येणाऱ्या मालिकांचीही प्रक्रिया थांबली. त्यानंतर पुढे ती पूर्ववत सुरु व्हायला बराच काळ गेला. आताही ती चालू असली तरी कोविड प्रोटोकॉल पाळून चालताना तिची गती काही प्रमाणात मंदावली आहेच. पण गती वा खर्चाचा प्रश्न हा त्यामानाने दुय्यम स्वरुपाचा आहे. एकूण माध्यमाचं स्वरुप आणि भविष्य यात होणाऱ्या संभाव्य बदलांचा विचारच प्रत्येकाच्या मनात आधी येणारा आहे. पण वर्तमान आणि भविष्याकडे वळण्याआधी आपण मराठी चित्रपटांचा नजीकचा वर्तमानकाळ काय होता याकडे एक नजर टाकायला हवी.

मी अनेकदा माझ्या लेखांमधून आणि व्यासपीठावरुन बोलतानाही हे विधान केलंय, की मराठी चित्रपटाने गेल्या पंधराएक वर्षांच्या काळात स्वत:मधे जो बदल घडवून आणला, तितक्या प्रमाणात त्याचा प्रेक्षक बदलू शकला नाही. तो जुनाटच राहिला, आणि सध्या मराठी चित्रपट उद्योग ज्या अडचणीत आहे, त्याला काही प्रमाणात हा प्रेक्षक जबाबदार आहे. सोशल मिडियावर हे लिहिलं की अनेकदा या विधानाचा प्रतिवाद केला जातो. न चाललेल्या चित्रपटाचं खापर प्रेक्षकावर फोडू नका, चांगला सिनेमा प्रेक्षकांना कळतोच, या प्रकारची उत्तरं दिली जातात पण तशी वस्तुस्थिती नाही. गेल्या आठदहा वर्षात तिकीट खिडकीवर यशस्वी ठरलेल्या आणि अपयशी झालेल्या चित्रपटांची यादी काढून पाहिली तर सरासरी प्रेक्षक चांगल्या चित्रपटामागे उभा रहात असल्याचा कोणताही पुरावा नाही हे लक्षात येईल. श्रीमंत निर्माते, कॉर्पोरेट्स किंवा झी, व्हायकॉम यासारख्या टिव्ही इन्डस्ट्रीत आधीपासून असलेल्या संस्थांची निर्मिती वा वितरण असलेलेच चित्रपट आर्थिक दृष्ट्या कमाई करू शकले आहेत. त्यांना दर्जा नव्हता असं नाही, उदाहरणार्थ झी ने आजवर विविध प्रकारचे चित्रपट आपल्यापुढे आणले आहेत. ‘सैराट’, किंवा ‘कट्यार’ काळजात घुसली यासारखे प्रेक्षकांना खेचण्याच्या हमखास शक्यता असलेले चित्रपट जसे त्यांनी केले तसेच ‘फँड्री’ किंवा ‘किल्ला’ सारखे महोत्सव गाजवणारे चित्रपटही त्यांनी वितरीत केले आहेत. पण हे चित्रपट त्यांच्या दर्जाबरोबरच झी कडे असलेल्या मार्केटिंग शक्तिमुळेही चालले. पाठिंबा नसताना केवळ दर्जा असणाऱ्या आणि महोत्सव गाजवणाऱ्या किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटांना यश मिळालंच असं सांगता येत नाही. निव्वळ संख्या पाहिली, तर यश न मिळालेल्या चित्रपटांची संख्याच अधिक भरेल. आता याचा अर्थ काय होतो ?

संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ नंतर मराठी चित्रपटांचं पुनरुज्जीवन झालं असं आपण म्हणतो. या काळातल्या पहिल्या चारपाच वर्षांकडे आपण पाहिलं तर लक्षात येतं की तो काळ दिग्दर्शकांचा होता. या काळात मराठीमधे काही नवं घडतंय असं वातावरण होतं. राष्ट्रीय पुरस्कारात सुवर्ण कमळ आणि ऑस्करला शिफारस, या दोन गोष्टी एकाच मराठी चित्रपटाने मिळवून दाखवल्यावर इतर भाषांमधे आपल्या उद्योगाबद्दलचं कुतूहल वाढलं, तेवढ्यापुरती चित्रपटांची प्रेक्षकसंख्या वाढली, अनेक निर्माते (काही व्यावसायिक तर काही नव्याने उभे रहाणारे) हा सिनेमा बॅक करण्यासाठी पुढे झाले, ज्याचा फायदा नव्या तरुण दिग्दर्शकांना झाला. निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, सतीश मनवर, परेश मोकाशी, असे तरुण वेगळ्या वाटा चोखाळणारे दिग्दर्शक येत गेले. पण हा काळ फार टिकला नाही, कारण प्रेक्षकांचा उत्साह तेवढ्यापुरता राहिला, दीर्घकाळ टिकला नाही. 2010 मधे रवी जाधवच्या झीची निर्मिती असलेल्या ‘नटरंग’ चित्रपटाला जे यश मिळालं, तिथपासून मोठ्या निर्मात्यांचा काळ सुरु झाला आणि दिग्दर्शकांना महत्व असलं, तरी त्यांची भूमिका दुय्यम झाली. या पुढल्या काळात प्रेक्षक जर दिग्दर्शक वा आशय यांना प्रमुख ठेवून चित्रपटाला नेमाने जात राहिले असते, तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण तसं झालं नाही. त्यांनी आशयापेक्षा परिचित नाट्य आणि रंजनाच्या पारंपरीक कल्पना, यांनाच महत्व दिलं. ‘नटरंग’च्या प्रसिद्धीदरम्यानच हे दिसलं की, चॅनलकडे त्यांच्या मालिकांचा जो प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग आहे, तो कमर्शिअल ब्रेक्समधे सतत केलेल्या जाहिरातींमधून प्रेक्षागृहाकडे वळवता येईल. पुढल्या काळात हाच यशाचा निश्चित फॉर्म्युला झाला.

आपला प्रेक्षक दोन प्रकारचा आहे. पहिला आहे तो मराठी मालिकांचा प्रेक्षक जो चित्रपटही पहातो. हा प्रचंड प्रमाणात आहे, आणि यातही एक मोठा वर्ग हा जुन्या पद्धतीची करमणूक आवडणारा आहे. मालिकांमधे जे भडक कौटुंबिक नाट्य दाखवलं जातं, त्याचंच या प्रेक्षकाला व्यसन आहे, आणि त्यापलीकडे जाण्याची त्याची इच्छा नाही. यातले अनेक जण निवृत्त आहेत, वा घरात अधिक काळ घालवणारे आहेत. टिव्हीला चिकटूनच त्यांच्या बऱ्याच संध्याकाळी जातात. चित्रपटाला जर आर्थिक यश हवं असेल, तर या प्रेक्षकाला हलवल्याखेरीज ते मिळणार नाही. आणि ब्रेक्समधला जाहिरातींचा मारा हा त्यावरचा एकच उपाय आहे.

2010 पासून पुढच्या काळात असं दिसून आलं की वर्षाला येणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढत चालली असली, नाव घेण्यासारखे दिग्दर्शक या क्षेत्रात उतरत असले, आणि चांगले चित्रपटही काही प्रमाणात बनत असले, तरी प्रेक्षक आहे, तो या मोठ्या निर्मात्यांच्याच चित्रपटांना. हे जर आपल्या लक्षात येऊ शकत असेल, तर ते निश्चितच मल्टीप्लेक्स चालकांच्याही लक्षात येणारच. त्यांनी या गोष्टीची नोंद केली, की हिंदी, इंग्रजी, वा दाक्षिणात्य चित्रपटांनाही महाराष्ट्रात प्रेक्षक आहे, पण मराठी चित्रपटांना काही तो फारसा नाही. या चालकांसाठी चित्रपट लावणं हा व्यवसाय आहे, भाषिक अस्मितेशी त्यांचा संबंध नाही. त्यामुळे जर प्रेक्षक या चित्रपटांची तिकिट काढत नसेल तर ते तोटा सहन करुन ते चित्रपट का चालवतील ? त्यापेक्षा एखाद्या चालण्याची शक्यता असणाऱ्या भिन्नभाषिक चित्रपटाचे खेळ वाढवले, तर त्यात नफ्याची शक्यता अधिक नाही का? हे मल्टीप्लेक्सच्या लक्षात येणं हा देखील आपल्या उद्योगाला मोठा धक्का मानता येईल कारण तेव्हापासून आपल्या चित्रपटांवर जबाबदारी आली, ती पहिल्या तीन दिवसातच आपल्याला प्रेक्षक आहे हे सिद्ध करण्याची. तो जर दिसला नाही, तर चौथ्या दिवशी मराठी चित्रपटांचे आधीच कमी असलेले खेळ अधिकच कमी होत, वा अनेकदा चित्रपटही उतरवले जात. पूर्वी सिंगल क्रीनच्या काळात एक माउथ पब्लिसिटी नावाचा प्रकार असे. लगेच सिनेमा यशस्वी झाला नाही, तरी जर आलेल्या प्रेक्षकांना तो आवडला, तर त्याबद्दल बोललं जाई, आणि ते ऐकून, वा समीक्षणं वाचून हळूहळू प्रेक्षक येत आणि काही दिवसांनी सिनेमागृह भरलेली दिसत. या तीन दिवसांच्या गणिताने ती शक्यताच मावळली. चित्रपट जर रविवारपर्यंत चालला नाही, तर सोमवारनंतर तो दिसण्याची शक्यता कमीच होत असे. मी जेव्हा पुणे मिररमधे मराठी चित्रपटांचं परीक्षण लिहीत असे तेव्हा माझे बरेचसे सिनेमा पाहून होत. जर चित्रपट चांगला असला, तर मी आणि इतर लिहिणारेही सोशल मिडीआवर त्याबद्दल जरुर लिहीत असू आणि लोकांना तो पहिल्या तीन दिवसात पहाण्याची आठवण करत असू. त्याचा फार फायदा होत नसे कारण आपल्या प्रेक्षकाला दर्जेदार चित्रपट थिएटरमधून जाणार याचं फार सोयरसुतक नव्हतं. पुरेसे खेळ नाहीत, चित्रपटगृह घरापासून लांब आहे, चित्रपट टिव्हीवर आला की पाहू, असेच त्यांचे आडाखे असत.

मी मघाशी म्हणालो, की दोन प्रकारचे प्रेक्षक असतात. तर हा दुसऱ्या प्रकारचा प्रेक्षक कोणता? तर हा प्रेक्षक मी आधी दिलेल्या पारंपरीक मराठी प्रेक्षकांच्या लक्षणाशी फारकत घेणारा आहे. याने नवं पाहिलंय, किंवा नव्याची त्याला आवड आहे. गेल्या काही वर्षात टेलिव्हीजन, इन्टरनेट आणि आता ओटीटी या माध्यमातून त्याला जगभरातलं बरच काही पहायला मिळालय आणि तसं मराठीतही पहायला मिळावं असं त्याला वाटतं. नव्या प्रयोगांना तो प्रोत्साहन देऊ शकतो. पण याच्या दोन अडचणी आहेत. एकतर तो कमी प्रमाणात आहे. दुसरं म्हणजे तो तरुण वर्गातला आहे. त्यामुळे त्यातले अनेक जण कॉलेज विद्यार्थी आहेत, नोकरीधंद्यात अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांना चित्रपट पहाण्यासाठी पुरेसा वेळ नसतो, आणि जो असतो, त्यावेळात हिंदी आणि इंग्रजी चित्रपटच पहाता येतील, ही तजवीज मल्टीप्लेक्सचालकांनी करुन ठेवलेली आहे. केवळ या प्रेक्षकाच्या भरवशावर चित्रपट चालू शकत नाहीत.

थोडक्यात सांगायचं तर सरासरी मराठी चित्रपटाला सध्या प्रेक्षक नाहीत, म्हणजे नव्हता, अर्थात चित्रपटगृह बंद झाली तेव्हा. दर्जेदार चित्रपटांची संख्याही वाढत न जाता, अलीकडे कमी होत गेलेली आहे. 2018/19 चे आकडे पाहिले तर दिसेल की वर्षाला शंभरच्या वर चित्रपट बनत होते, पण चित्रपटगृहात प्रतिसाद असलेले, किंवा प्रतिसादाशिवायही दर्जेदार म्हणता येतील असे चित्रपट हाताच्या बोटांवर मोजण्यासारखेच असत. बरेचदा एका हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे. गंमत म्हणजे असा प्रतिसाद असूनही, म्हणजे नसूनही, निर्माण होणाऱ्या चित्रपटांची संख्या रोडावली नव्हती, उलट वाढत चालली होती. या काहीशा चिंताजनक पार्श्वभूमीवर आपल्याकडे लॉकडाऊन लागला.

लॉकडाऊन लागतालागता दोन चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले होते. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ आणि शशांक उदापुरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ यातला ‘मन फकीरा’ मला आवडला होता आणि मी जेव्हा तो चित्रपटगृहात पाहिला, तेव्हा प्रेक्षकसंख्याही बरी होती. चित्रपट रोमँटीक कॉमेडी होता आणि 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता, त्यामुळे ते अपेक्षितही होतं. एरवी तो चित्रपट चांगला चालू  शकला असता, पण परिस्थिती बिकटच होत गेली आणि लवकरच चित्रपटगृह बंदच झाली. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित वसंतराव देशपांडेंची बायोपिक असलेला ‘मी वसंतराव’, महेश मांजरेकरांचा ‘पांघरुण’ आणि इतर काही मोठे चित्रपट यावेळी येण्याच्या प्रतीक्षेत होते. हिंदीतही ‘83’ आणि ‘सूर्यवंशी’ बद्दल वाढत्या अपेक्षा होत्या. पण सगळंच बारगळलं. सर्वांनाच आपले चित्रपट पुढे ढकलावे लागले आणि चित्रपट उद्योगाला ब्रेकच लागला.

लॉकडाऊनने चित्रपट उद्योग बंद झाला म्हणजे निर्मिती आणि प्रदर्शन या दोन्ही गोष्टी थांबल्या. या सुरुवातीच्या दिवसात म्हणजे महिन्यादोन महिन्यात जरी वातावरण काळजीचं असलं, तरी कोणाला त्याचा दीर्घ परिणाम काय होईल याची कल्पना आली नव्हती आणि ते साहाजिकही होतं. त्या क्षणी विचार होता, तो आरोग्याचा, साथ पसरण्याआधी थांबवण्याचा. प्रत्येकालाच आपली, आपल्या कुटुंबाची काळजी होती. त्यात ही पाळी काही एका कुटुंबावर, एका राज्यावर, एका क्षेत्रावर आली नव्हती, तर सारे एकत्रितपणे या संकटात होते. त्यामुळे सुरुवातीचा काळ सर्वांचाच सरकार जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा असणारच होता. पण जेव्हा इतर उद्योग क्षेत्र हळूहळू कामाला लागली, वर्क फ्रॉम होम सुरू झालं, तेव्हा मनोरंजन क्षेत्राची अडचण सुरुच राहिली. चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपट वितरीत, प्रदर्शित होऊ शकत नव्हते. त्यामुळे निर्मिती संस्थांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतच होतं. त्याबरोबर चित्रीकरणंही थांबल्याने त्यांच्या ठरवलेल्या योजना अडचणीत येत होत्या. चित्रीकरण थांबल्याने अभिनेते, दिग्दर्शक, छायालेखक अशा त्यावर अवलंबून असलेल्या लोकांची अडचण झालीच, पण त्याचा मोठा परिणाम खालच्या श्रेणीत काम करणाऱ्या अनेक जणांवर झाला. रोजच्या रोज मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेले अनेकजण यात होते, विविध विभागांमधले सहाय्यक, लाईट/ कॅमेरा/ नेपथ्य याच्याशी संबंधित सारे, स्पॉटबॉईज, ज्युनिअर आर्टीस्ट, अशा अनेकांचा प्रश्न वाढत गेला. लहान मोठ्या भूमिका करणाऱ्या कलाकारांमधल्या अनेक जणांची कामंही बंद झाली. लॉकडाऊनचा काळ जसा वाढत गेला तशी या साऱ्यांच्या अडचणीत वाढ होत होती. सर्वच क्षेत्रांनी वर्क फ्रॉम होम फेजमधे नोकरदारांच्या पगारात कपात केली होती परंतु चित्रपट क्षेत्रात लेखक आणि निर्मिती संस्थांच्या ऑफिसातला काही स्टाफ वगळता घरुन कोण आणि कसं काम करणार? तरीही अडचणीचं अनपेक्षित आणि सर्वव्यापी स्वरुप पाहून सर्वांनी शक्य तेवढं शांत रहाण्याचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस हे कठीण होत होतं. मग काही जणांनी इतर मार्ग शोधले. गोष्टी स्थिरस्थावर होईपर्यंत इतर छोटे व्यवसाय करता येतील का याचा विचार केला. तर काहींनी ऑनलाईन माध्यम रुटीन होण्यामधेच काही नवी संधी असेल का, हे पहायला सुरुवात केली.

पहिल्या श्रेणीतले कलावंत आणि तंत्रज्ञ यांची परिस्थिती तशी ठीक होती, त्यातल्या अनेकांनी आपला स्टाफ किंवा आपल्याबरोबर काम करणारे आणि आता अडचणीत असलेले इतर यांना आपल्या परीने मदतही केली, जरी दीर्घकाळ लॉकडाऊनचा परिणाम कसा होईल याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. कलावंतांनी स्वत:ला क्रिएटीव दृष्ट्या व्यग्र ठेवण्याचा या काळात प्रयत्न केला. वर्क फ्रॉम होम संस्कृतीबरोबर झूम सारखं माध्यम घराघरात पोचलं. त्याचाच आधार घेऊन काही ऑनलाईन कार्यक्रम, वर्कशॉप्स, परीसंवाद, अभीवाचन, अशा कार्यक्रमात त्यांना सहभागी होता आलं. हृषीकेश जोशी, मोहीत टाकळकर यासारख्या रंगभूमीचा अनुभव असलेल्या दिग्दर्शकांनी ऑनलाईन माध्यमातून लाईव      परफॉर्मन्सचा अनुभव देता येतो का यादृष्टीने प्रयत्न केले, काहीजण आपल्या लेखन वाचन यासारख्या छंदांकडे वळले. नेटफ्लिक्स आल्यानंतर काही वर्षात ओटीटी माध्यमं आपल्याकडे रुळली होती. मग वितरण थांबलेलं असताना, या माध्यमाचा चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी कितपत वापर होईल या दृष्टीनेही विचार सुरू झाला.

गेल्या मार्चपासून आतापर्यंतचा काळ जर पाहिला, तर लक्षात येईल की, चित्रपट उद्योग तुकड्यातुकड्यात चालू आणि बंद आहे. पॅन्डेमिकचा पहिला मोठा भर ओसरला तेव्हा सरकारने नियम शिथील करुन चित्रीकरणाला परवानगी दिली, पण तरीही वातावरण काळजीचच होतं. या काळात चित्रपट निर्माते होईल ते पाहू या विचारात होते, पण मालिकांना चित्रणाची घाई होती, कारण गोष्टी सुरळीत असताना चित्रीत झालेल्या भागांचं प्रक्षेपण तर होऊन गेलं होतं आणि मालिकांच्या घरी असलेल्या आणि नव्याने घरी बसलेल्या प्रेक्षकांना नवं काही दाखवलं नाही, तर तो दुसरीकडे वळेल अशी चॅनल व्यवस्थापनाला भीती होती. पहिली संधी मिळताच मालिकांचं चित्रण सुरु झालं. मुंबईत प्रवासावर असलेली बंधनं, आणि वाढते आकडे पाहून त्यांनी मुंबईबाहेर चित्रीकरण करणं, सर्व कलावंतांनी एकत्र रहाणं आणि आजाराच्या लक्षणांसाठी त्याची वेळेवेळी तपासणी करत रहाणं, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं, या गोष्टी केल्या पण तरीही या मालिकांच्या सेट्सवर आजाराची लागण होण्याची त्या काळात बरीच उदाहरणं आहेत. 2020 च्या सप्टेंबरमधे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर साताऱ्याला ‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवर असताना त्यांना झालेला संसर्ग, आणि त्यातच ओढवलेला त्यांचा अंत, हे यातलं एक मोठं उदाहरण, पण हे एकमेव नक्कीच नाही. अशा केसेस होऊ नयेत यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली गेली, पासष्ट वर्षांपुढल्या ज्येष्ठांनी चित्रणस्थळी जाऊ नये असंही ठरवण्यात आलं, पण लाटेच्या गांभीर्याच्या प्रमाणात हा धोका तरीही राहिलाच.

मधे काही काळ चित्रपटगृहांना पन्नास टक्के प्रेक्षकसंख्येचा नियम पाळून प्रदर्शनाची परवानगी मिळाली पण तिथेही प्रतिसाद अल्पच राहिला. मराठी चित्रपटनिर्माते, वितरक यांना आधीच आपल्याला किती प्रमाणात मागणी आहे याची कल्पना आहे, त्यामुळे या काळात एखाद दुसरा अपवाद वगळता मराठी चित्रपटउद्योगाने चित्रपट लावणच टाळलं. प्रामुख्याने या दिवसात हिंदी आणि इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झाले. मी या दिवसात नेमाने चित्रपट पहात होतो, पण हा अनुभव काळजीच वाटायला लावणारा होता. रिकामी थिएटर्स, खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याला बंदी, जागोजागी होणाऱ्या तपासण्या, यामुळे चित्रपटगृहात जाण्यातली मजाच निघून गेली होती. जे मोठे हिंदी चित्रपट या काळात प्रदर्शनासाठी तयार होते, त्यांनी ते लावण्याची रिस्क घेतली नाही. कारण प्रेक्षकांचा चित्रपटगृहात येण्याचा मूड नाही हे दिसतच होतं. त्याशिवाय पन्नास टक्के प्रेक्षकसंख्या त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळवून देणार नाही हे स्पष्ट होतं. या दिवसात मी पाहिलेल्या दोनच चित्रपटांना गर्दी होती. पहिला होता क्रिस्टफर नोलनचा बहुचर्चित ‘टेनेट’ आणि दुसरा होता भव्य स्वरुपासाठी आधीपासूनच अपेक्षा तयार केलेला ‘गॉडझिला वर्सेस काँग’. पण या चित्रपटांनाही प्रेक्षागृह पूर्ण; म्हणजे पन्नास टक्के, भरलेलं नव्हतच. पुढे अर्थातच भीती वाढली, आकडे वाढले, आणि चित्रपटगृह पुन्हा बंद झाली हे आपल्याला माहीतच आहे. आता गेले काही महिने मालिका आणि चित्रपट या दोन्हीची चित्रीकरणं व्यवस्थित सुरु झाली आहेत. मालिकांचं एकवेळ ठीक आहे. पण पूर्ण झालेले चित्रपट लागणार कुठे, हा प्रश्न मात्र नव्याने समोर येतो आहे.

वर्षाला शंभर सव्वाशे चित्रपट, हा साधारण आकडा मी सांगितलाच. त्यातले सारेच प्रदर्शित होत नाहीत, होऊ शकत नाहीत. वर्षात जेमतेम बावन्न शुक्रवार, या सगळ्या शुक्रवारी नवे सिनेमा लागू शकत नाहीत. गणपतीसारखे सण, मुलांच्या परीक्षा, सलमान खानसारख्या मोठ्या स्टारच्या चित्रपटांच्या रिलीजचे दिवस, या काळात मराठी सिनेमा लावण्यात मुद्दा नसतो. मुळातच कमी असलेला प्रेक्षक या काळात आणखीच घटतो. मग उरलेल्या चाळीसेक शुक्रवारात शंभर सव्वाशे चित्रपट कसे प्रदर्शित करणार? आयडिअली आपला चित्रपट लागेल तेव्हा स्पर्धेला दुसरा मराठी चित्रपट नसावा असं प्रत्येकच निर्मात्याला वाटतं, पण तरी मोठ्या संख्येने चित्रपट पडद्यावर यायचे तर दर शुक्रवारी दोन तीन चित्रपट येण्यावाचून इलाजही नसतो. मध्यंतरी एकेका शुक्रवारी पाच सहा मराठी चित्रपट अशी परिस्थिती आल्याचंही मी पाहिलेलं आहे. आता हे एवढे सगळे चित्रपट गेल्या मार्चपासून अडकलेले आहेत. प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत, जे कधी करता येईल याची खात्री नाही. आत्ताच हा बॅकलॉग शंभरच्या आसपास वा त्याहूनही वर असू शकतो. त्याशिवाय निर्मितीचं काम चालूच आहे, त्यामुळे तयार चित्रपटांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. चित्रपटगृह चालू झाली तरी हा प्रश्न सुटत नाही. एकतर गेल्या वेळी प्रेक्षकांचा जो सूक्ष्म प्रतिसाद होता तो पहाता मराठी निर्माते फारच कॉन्फीडन्ट, किंवा फारच निष्काळजी असल्यास लगेच चित्रपट प्रदर्शित करणार नाहीत, तो करण्यात धोकाच आहे. त्यातल्या त्यात वेगळ्या प्रकारच्या, छोट्या बजेटच्या आणि तरुण पिढीचा प्रेक्षक डोळ्यासमोर असलेल्या चित्रपटांना एक प्रयोग म्हणून हे आव्हान स्वीकारता येईल, पण मोठे चित्रपट प्रदर्शनाची घाई करायचे नाहीत. ते दुसऱ्या कोणीतरी मोठा सिनेमा लावून प्रेक्षकसंख्या वाढण्याची, पन्नास टक्क्याचा नियम उठण्याची वाट पहातील. सरळ सांगायचं, तर प्रदर्शनावाचून असलेल्या चित्रपटांची संख्या पुढले काही महिने तरी वाढत जाईल. आता आणखी मोठ्या लाटा आल्या नाहीत, तरीही परिस्थिती सुरळीत व्हायला वेळ जाईल. हे होण्यासाठी 2022 तरी नक्कीच उजाडेल. मग या पावणेदोन वर्षात बनलेले आणि आधीचे, हे सारे चित्रपट प्रदर्शित कसे होणार? त्यांच्यासाठी चित्रपटगृह हा एकच पर्याय आहे का? तर नाही.

या अडचणीच्या काळात एक माध्यम चित्रपटांसाठी पर्यायी वितरण साधन म्हणून पुढे आलंय आणि ते म्हणजे ओटीटी. नेटफ्लिक्सने आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर काही वर्षातच आपल्याकडे या दिशेने क्रांती झालेली आहे. चॅनल्सवरच्या सततच्या जाहिराती आणि कालबाह्य प्रोग्रॅमिंगला विटलेले अनेक जण हा ओटीटीचा पर्याय स्वीकारायला लागले आहेत. खासकरुन मी मघाशी ज्या दुसऱ्या प्रकारच्या प्रेक्षकांचा उल्लेख केला, त्यांचा यात पुढाकार आहे. कामात अडकलेले असल्याने त्यांना आजवर चॅनलने दिलेल्या वेळानुसार चित्रपट वा मालिका पहाणंही शक्य होत नव्हतं. पण ओटीटी चॅनल्स हे इन्टरनेटवर आधारीत असल्याने आणि कोणत्या वेळी काय पहावं हा निर्णय प्रेक्षकांवरच सोपवलेला असल्याने या वर्गातल्या अनेकांना ही मोठी सोय वाटली यात शंका नाही. माझ्यासारख्या अनेकांनी गेली काही वर्ष केबल टीव्ही हा प्रकारच काढून टाकून हव्या त्या ओटीटी चॅनल्सचं सभासद होणच पसंत केलं आहे. आपला मराठी चित्रपट जर मोठ्या प्रमाणात ओटीटी वर जाऊ शकला, तर चित्रपटांच्या दृष्टीने हा प्रेक्षक उपलब्ध होणं आणि या प्रेक्षकाच्या दृष्टीने हा चित्रपट उपलब्ध होणं, ही विन-विन सिचुएशन आहे. अडचण आहे ती एकच. व्यवस्थापनाची. ओटीटी चॅनल्सचं व्यवस्थापन हे अजून तरी मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत उदासीन आहे. हिंदी, बंगाली तसंच दाक्षिणात्य भाषांमधले नवे चित्रपट लगेच उचलणाऱ्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, प्राईम व्हिडीओ, झी फाईव, सारख्या चॅनल्सनी, नव्या मराठी सिनेमाच्या थेट प्रदर्शनाला मात्र फार थारा दिलेला नाही. असे किती नवे मराठी चित्रपट ओटीटीवर आले आहेत? काही नावं आठवतात. ‘पिकासो’, ‘दिठी’, ‘वेल डन,बेबी’, ‘फोटोप्रेम’, ‘जून’ आणि इतर काही असू शकतील, पण ही संख्या मोठी नाही. त्यात ‘जून’ची केस इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. पण त्याकडे वळण्याआधी हा एकूण निराशाजनक प्रतिसाद का, त्याचा विचार करू.

ज्याप्रमाणे मल्टीप्लेक्स व्यवस्थापन आपल्याला मिळणाऱ्या नफ्याचा विचार करतं, तसाच विचार ओटीटी चॅनल्सचं व्यवस्थापन करत असणार यात शंका नाही. त्यांच्याकडे तिकीट विक्री नाही, पण त्यांचं लक्ष असतं, ते किती लोक विशिष्ट चित्रपट पहातात याकडे. जर विकत घेतलेला चित्रपट पाहिला गेला नाही, तर त्यांनी केलेली गुंतवणूक फुकट गेली असच म्हणालं लागेल. त्यामुळे मुळातच प्रेक्षकाची खात्री असलेला सिनेमा घेण्याकडे त्यांचा कल आहे. चित्रपटगृह चालू असण्याच्या काळात कोणत्या सिनेमांना मागणी होती, कोण प्रेक्षक खेचण्याची शक्यता आहे, हे पाहूनच ते आपली निवड करणार हे उघड आहे, आणि त्या बाबतीत मराठीचा ट्रक रेकॉर्ड बरा नाही. इतर भाषांचे प्रेक्षक जेव्हा त्यांच्या भाषेतल्या चित्रपटाला गर्दी करत होते तेव्हा आपल्याच प्रांतात, आपल्याच सिनेमाला चित्रपटगृह रिकामी जात होती. हे त्यांनी लक्षात घेतल्यावाचून कसं राहील? त्याबरोबच आणखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांनी याआधी जे मराठी चित्रपट घेतले आहेत, त्यांना मिळालेला प्रेक्षक. या सगळ्या ओटीटी चॅनल्सवर चित्रपटगृहात लागून गेलेला मराठी सिनेमा बऱ्याच प्रमाणात आहे. त्याला कसा प्रतिसाद आहे, यावरही ते नवे मराठी चित्रपट घेतील का हे अवलंबून आहे आणि हा प्रतिसाद जितक्या प्रमाणात असायला हवा तितका असावा असं वाटत नाही. मराठी माणसाचा कल हा मराठी चित्रपट पहाण्यापेक्षा हिंदी, इंग्रजी अलीकडे दाक्षिणात्य भाषांमधलेही चित्रपट पहाण्याकडे असतो. मल्टीप्लेक्समधेही त्याने आपली ही आवड दाखवून दिली होती आणि आता तो ओटीटीवरही तेच करतो आहे. इतर भाषिकांमधे त्यांच्या भाषेला प्रथम निवडलं जातं, त्यानंतर हिंदी, इंग्रजी, त्यानंतर इतर प्रादेशिक भाषा, पण आपल्याकडे सारं उलटच आहे. हे चित्र बदलायला हवं असेल तर मराठी भाषिकांनी अधिक प्रमाणात मराठी चित्रपट पहायला हवेत. आता तर त्यांना हे सारं घरीच उपलब्ध होतय, लांब थिएटरला आडनिड्या वेळी जावं लागत नाही. एकदा सबक्रिप्शन असेल तर वेगळे पैसेही भरावे लागत नाहीत. मग आता आपल्याला कोण थांबवतय? आपल्याला नवा मराठी सिनेमा ओटीटीवर दिसायला हवा असेल, तर आपला एकूण मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढायला हवा.जी चूक आपण मल्टीप्लेक्सला आपला सिनेमा नाकारुन केली, ती आपण इथेही करणार नाही अशी आशा आहे.

लोकप्रिय आणि सर्वभाषिक ओटीटींसह आता एक नवा पर्यायही चित्रपट वितरणासाठी उपलब्ध होतोय आणि तो म्हणजे केवळ मराठीलाच वाहिलेले ओटीटी चॅनल. ‘प्लॅनेट मराठी’ने याची सुरुवात केलेली आहे आणि आता ‘लेट्सफ्लिक्स’ आणि इतर काही या प्रकारचे ओटीटी येऊ घातले आहेत. ‘जून’ हा सिनेमा ‘प्लॅनेट मराठी’वर आला आणि त्याला चांगला प्रतिसाद होता, आहे. जूनसाठी प्लॅनेट मराठी ने सुरुवातीला वापरलेली पद्धत होती, ती नेहमीच्या ओटीटी पेक्षा थोडी वेगळी, ‘पे पर ह्यू’ पद्धतीची. म्हणजे आपण हा चित्रपट पहातो ओटीटी वरल्या इतर चित्रपटांप्रमाणेच, पण तो पहायचा तर आपल्याला तिकिटासारखे (पण थिएटरच्या तुलनेत कमी) पैसे प्रत्येक वेळी भरावे लागतात. ही पद्धत काही खूप नवी नाही. आय ट्यून्स, बुक माय शो-स्ट्रीम, टाटा स्काय-शो केस, झी-झी प्लेक्स यासारख्या प्लॅटफॉर्म्सनी ती वापरली आहे, पण त्यांना थिएटर्स सुरु असण्याच्या काळात मर्यादितच प्रतिसाद होता. लोकांची अशी मानसिकता होती की एकदा ठराविक रक्कम भरल्यावर मग त्या चॅनलवरचं सारं आपल्याला एकही वरचा पैसा न भरता पहाता आलं पाहिजे. ती परिस्थिती आता उरलेली नाही. झी प्लेक्स वर प्रक्षेपित झालेला सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट ज्या प्रमाणात यशस्वी झाला, त्यावरुनही हे दिसून येतं. ‘जून’ ही तशी छोटेखानी, समांतर वृत्तीची आणि भव्यतेपेक्षा आशयाला महत्व असणारी फिल्म आहे. त्यामुळे ती पहाणाऱ्यांच्या आकड्यांची ‘राधे’शी तुलना करु नये. पण चांगला चित्रपट, प्लॅनेट मराठीवरचा पहिलाच चित्रपट आणि मोठ्या काळानंतर आपल्यापर्यंत आलेला नवा मराठी सिनेमा, या सगळ्याच गोष्टी एकत्र येऊन ‘जून’ला चांगलं यश मिळालं आहे. हे होत राहिलं, तर नेहमीच्या ओटीटीबरोबरच ‘पे पर व्ह्यू’ हा एक नवा मार्गही मराठी वितरणासाठी खुला होईल. निर्मात्यांसाठी त्याचा फायदा म्हणजे ओटीटी ठरवेल ती रक्कम मान्य करण्याऐवजी नफ्यातल्या वाट्यावरही त्यांचा काही टक्क्यांचा हक्क राहील.

हे सगळं पाहून वाटतं, की चित्रपटगृहांबद्दल अनिश्चितता असताना ओटीटी हा मार्ग चित्रपट व्यवसायाला काही काळासाठी तरी तारुन नेऊ शकतो. असं झालं तर कोणते चित्रपट मोठ्या पडद्याची वाट पहातील आणि कोणते ओटीटीवर येतील याबद्दल काही अंदाज करता येऊ शकतो. पहिली उघड गोष्ट म्हणजे लार्जर दॅन लाईफ विषय असलेले, ऐतिहासिक किंवा अॅक्शनला वाव असलेले, असे एकूणच दृश्यात्मकतेला मोठं स्थान असणारे चित्रपट थिएटर्सची वाट पहातील, तर गंभीर आशय, समांतर शैली, संवादी पद्धतीचे चित्रपट हे बहुधा ओटीटीचा मार्ग धरतील. उदाहरणार्थ ‘पावन खिंड’, ‘मी वसंतराव’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘अनन्या’, यासारखे चित्रपट नक्कीच चित्रपटगृह उघडण्याच्या प्रतीक्षेत असतील असं म्हणता येईल.

दृश्यात्मक वा विषयाची भव्यता हेच चित्रपट थिएटरपर्यंत नेण्याचं सर्वात मोठं कारण आहे, आणि गंभीर आशयाची मांडणी असलेले चित्रपट छोट्या पडद्यावरही प्रभावी वाटतात असा एक सर्वसाधारण समज आहे आणि त्या दृष्टीनेच बहुधा कोणता चित्रपट कसा वितरीत होईल हे ठरेल. मला विचाराल तर या पद्धतीच्या वितरणाची योजना ही प्रेक्षकांच्या मानसिकतेला धरुन आहे पण प्रत्यक्षात ती तितकी अचूक नाही. ‘ओटीटी’वर पाहिले जाणारे चित्रपट आणि चित्रपटगृहात पाहिले जाणारे चित्रपट यात पडद्याचा आकार, ध्वनीप्रक्षेपणाचा दर्जा अशा तांत्रिक बाबीत फरक आहेच पण तिथे फरक संपत नाही. चित्रपटगृहात आपण चित्रपट लक्षपूर्वक पहातो, एकाग्रतेने पहातो. घरी आपल्या हातात फोन असतो, खोलीत उजेड असतो, येणारीजाणारी माणसं, बाहेरुन येणारे आवाज, घरातली वर्दळ, अशा गोष्टी अनेकदा आपल्यावर होणारा चित्रपटाचा परिणाम कमी करतात. थिएटरमधे एकाग्रता हाच परीणाम कितीतरी वाढवते. मी तर म्हणेन की घरी जर मोठा टिव्ही असेल तर भव्यपट त्यावर पाहून विशेष फरक पडत नाही पण गंभीर चित्रपट मात्र चित्रपटगृहातच पहावेत. अर्थात हे मत सर्वांना निश्चितच पटणार नाही.

पुरेशा एकाग्रतेने पहाता आले नाहीत तरी चित्रपट ओटीटी वर आल्याचे काही फायदे निश्चित आहेत. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात मुळातच चित्रपटगृहांमधलं वितरण सर्वत्र सारखच होत नाही. मराठवाडा, विदर्भ, कोकण या प्रांतात असे अनेक भाग आहेत जिथे मराठी माणूस आहे पण चित्रपटगृह पुरेशा प्रमाणात नाहीत. ‘ओटीटी’ सारखं माध्यम हे या भागांमधेही चित्रपट पहिल्याच फटक्यात नेऊ शकतं. दुसरा फायदा आहे तो निर्मात्यांना असलेल्या आर्थिक सुरक्षिततेचा. भक्कम आधाराशिवाय चित्रपटगृहात मराठी चित्रपट लावणं हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे जो बहुसंख्य निर्माते करतात आणि घाट्यात जातात. इथे त्यांना मिळणारा नफा चित्रपटगृहात ज्या नफ्याच्या शक्यता असतात तितका नक्कीच नसेल पण काही एक निश्चित परतावा मिळू शकतो. दिग्दर्शक, कलाकार यांचा फायदा म्हणजे  प्रेक्षकापर्यंत पोचण्याची अधिक मोठी शक्यता चित्रपटापुढे तयार होते. आपल्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं. त्याबरोबरच मोठ्या ओटीटींची पोच इतर देशांमधेही आहे. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या चित्रपटकर्त्यांना यातून आपलं काम सादर करण्यासाठी आधीपेक्षा कितीतरी मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकतो.

ओटीटी हेच भविष्य आहे हे धरुन चालल्यावर, आता अनेक दिग्दर्शक याच माध्यमासाठी चित्रपटांचा विचारही करायला लागले आहेत, आणि ओटीटी चॅनल्सही स्वतंत्रपणे तसे चित्रपट कमिशन करत आहेत. मात्र हे करताना दिग्दर्शकांनी एका गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. जरी चित्रपटगृहातले वा चित्रपटगृहासाठी केलेले चित्रपट ओटीटी वर लावणं शक्य असलं, तरी ओटीटी माध्यमासाठी चित्रपट करताना माध्यमाचा विचार स्वतंत्रपणे व्हायला हवा. मोठ्या पडद्यासाठी निर्माता नं मिळाल्याने छोट्या पडद्यावर तोच प्रोजेक्ट तसाच बनवणं हे योग्य नाही. फिल्म जर ओटीटी साठीच असेल तर तिचं एकूण दृश्य परिमाण हे छोट्या पडद्याच्या विचारासह केलं जायला हवं. त्याशिवाय सरकारी प्रयत्न सुरुच असले, तरी ज्या प्रकारचं नियंत्रण सेन्सॉर बोर्ड चित्रपटांवर ठेवतं, तसं ते अजून तरी ओटीटीवर आणू शकलेलं नाही. या स्वातंत्र्याचा काय फायदा घ्यावा हा विचारही ओटीटीसाठी करण्यात येणाऱ्या चित्रपटांनी करायला हवा. केवळ सेक्स, व्हायलन्सच्या दृश्यांमधे पुढाकार घेऊन उपयोग नाही, तर धीटपणा विचारात, आशयात दाखवता यायला हवा. ओटीटी वर गेलेल्या प्रादेशिक कृतीलाही आंतरराष्ट्रीय प्रेक्षक असू शकतो हा विचार बळावायला हवा. मराठी चित्रपटाची भाषा मराठी असली, वातावरण मराठी असलं, तरी चित्रपट जागतिक विचाराचा हवा. असा विचार जर करता आला, तर काळाने आणलेली ही मर्यादा हे चित्रपट उद्योगाला पुढे नेणारं सकारात्मक पाऊल ठरू शकेल.

— गणेश मतकरी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..