मराठी चित्रपटांना आता सोन्याचा भाव यायला सुरुवात झालेली आहे. दुनियादारी, बालक-पालक, टाईमपास, या चित्रपटांनी सुरु केलेला ट्रेंड आता लय भारी, पोष्टर बॉइझ यांनी पुढेच चालवला आहे. बॉक्स ऑफिसवर भल्याभल्या हिंदी निर्मात्यांना मागे टाकून मराठी चित्रपटांची घोडदौड सुरु आहे.
चांगल्याबरोबर वाईटही येतं म्हणतात ते काही खोटं नाही. या रेकॉर्डब्रेक कमाई केलेल्या चित्रपटांच्या सीडींची पायरसीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.
मुंबई-ठाण्यात चित्रपटाच्या पायरटेड सीडीची विक्रीकेंद्रे अक्षरश: प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर दिसतात. काही महत्त्वाच्या रस्त्यांवरही हे स्टॉल्स दिमाखात उभे असतात. एके काळी हिंदी-इंग्रजी चित्रपटांच्या होत असलेल्या पायरसीचे लोण आता आपल्या मराठी चित्रपटांपर्यंतही पोहोचलेले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची झोप उडाली आहे.
या पायरसीचा परिणाम मराठी चित्रपटाच्या व्यवसायावर होत आहे. रेल्वे स्थानकासह महत्वाच्या ठिकाणी अशा पायरेटेड सीडींची खुलेआम विक्री होत असून वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून काहीच कारवाई होत नाही. कधीकधी तर रेल्वे आणि महापालिका यांच्या हद्दीचे कारण दाखवून कारवाई करण्याचे चक्क टाळले जाते.
मुंबई-ठाण्याची वेस ओलांडून हे पायरसी माफिया आता पुणे, नागपूर ही शहरंसुद्धा काबिज करायला लागले आहेत. पायरसी माफियांनी आगामी काळात प्रदर्शित होणार्या अनेक मराठी चित्रपटांवर आपले लक्ष केंद्रित केल्याची चर्चा आहे.
मराठी चित्रपटांच्या व्यवसायाला चांगले दिवस येत असताना या नव्यानेच उदभवलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून काही ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र निवडणूकीच्या तयारीत गुंतलेल्या सरकारला आणि विरोधी पक्षांनाही या प्रश्नाकडे बघायला किती वेळ मिळतो ते बघायचे.
मराठी भाषा वाचवायला हवी… मराठी संस्कृती वाचवायला हवी अशा बोंबा मारत फिरणार्या तमाम झेंडाबहाद्दरांनी या विषयाला थोडातरी न्याय द्यावा अशी मराठी चित्रपट निर्मात्यांची मागणी आहे.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply