“मराठी माणसाच्या मराठी मुंबईत” अस्सल मराठी पदार्थ किती हॉटेल्समध्ये मिळतात? खरंतर हा एक संशोधनाचाच विषय आहे. मराठी आणि महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळणारी मराठी मालकीची हॉटेल्स किती आहेत? हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच……
एकेकाळी मुंबईत मराठमोळी खाद्यसंस्कृती जोपासणारी अनेक मराठी हॉटेल्स होती. काणे, पणशीकर, तांबे, नेवाळकर, वेलणकर, टेंबे, मिरवणकर, देशपांडे, कुलकर्णी, सांडू, जोगळेकर, छत्रे, विरकर, जोशी, वागळे, सरपोतदार आदी मराठमोळया हॉटेल-मालकांनी घरगुती खाद्यपदार्थाची संस्कृती जपली होती. मुंबईत जसे परप्रांतीयांचे लोंढे वाढले, त्याबरोबरच परराज्यातील खाद्य संस्कृतीही मुंबईत रुजायला सुरुवात झाली. मराठी माणसाची खाद्य-अभिरुची बदलली आणि हळूहळू अनेक मराठी हॉटेल्स बंद पडली. त्यावेळी मराठीप्रेमासाठी झटणार्या संघटनांनीही या मराठी हॉटेल व्यावसायिकांना मदतीचा हात दिला नाही. तरीही काही मराठमोळी हॉटेल्स जी आजही तग धरून आहेत, ती त्यांच्या खासियतीमुळेच.
नाक्यानाक्यावर आज उडपी रेस्टॉरंटस दिसतात, मॅक-डोनाल्डसही दिसतात. नाक्यानाक्यावर वडा-पावच्या गाड्या असतात. संध्याकाळपासून पाव-भाजीच्याही गाड्या लागतात. आणि रात्र झाल्यावर चायनिज मेजवानीही रस्त्यावर मिळते. मुंबईतल्या काही प्रतिष्ठित जागी साऊथ इंडियन डोसा आणि उत्तप्पा देणार्या गाड्यांचीही चलती सुरु आहे. पालिकेच्या नियमांच्या नाकावर टिच्चून अगदी मांसाहारी खाद्यपदार्थसुद्धा गाडीवर मिळायला आता सुरुवात झाली आहे. पण एकाकाळी मुंबईची शान असलेली मराठी पदार्थ देणारी हॉटेल्स मात्र आता पूर्णपणे हद्दपार झालेली दिसतात. अर्थात काही अपवाद सोडता.
मराठी माणसाची हॉटेल्स नाहीत म्हटल्यावर त्यातून मिळणारे मराठमोळे खाद्यपदार्थही हद्दपार होणे स्वाभाविकच होते. मात्र काही हॉटेल्सनी मराठी खाद्यसंस्कृती अजूनही टिकवून ठेवलेली तर आहेच पण ती वाढावी यासाठी खास प्रयत्नही केलेले दिसतात. अमराठी हॉटेल्समध्ये नाही म्हणायला काही हॉटेल्समध्ये बटाटा वडा, मिसळ हे मिळते पण मिसळसाठी उसळ न वापरता सांबारचा वापर केलेला असतो. मराठी पद्धतीची कांदाभजी हद्दपार होऊन त्यांची जागा आता कन्नड स्टाईलच्या बोंडा टाईप भज्यांनी घेतलेय. सध्याच्या पिढीला अळूवडी, पुरणपोळी हे पदार्थ गुजराथी आहेत असेच वाटते.
मराठी खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त कांदेपोहे, थालिपिठ, वडा-पाव वा मिसळ नव्हे. अक्षरश: शेकडो मराठी चविष्ट, पौष्टिक पदार्थ आपल्याकडे होते आणि आहेतही. मात्र जंक फूडच्या जमान्यात हे पदार्थ मराठमोळ्या घरातल्या नव्या पिढीपर्यंतच पोहोचत नाहीत तिथे अमराठी कुटुंबांकडे ते पोहोचण्याचा काय संबंध? याचे मुख्य कारण म्हणजे मराठी माणसानेच मराठी खाद्यबाणा सोडून दिला आहे..
या अशा परिस्थितीत ज्या काही मराठी हॉटेल्सनी मराठी बाणा जपून ठेवलाय त्यांचीही माहिती आता मराठीसृष्टीवर नोस्टॅल्जियामध्ये आणि खाद्ययात्रा विभागात वेळोवेळी येतच रहाणार आहे.
आणि खास मराठी पदार्थांची नव्या पिढीला ओळख करुन देण्यासाठी मराठीसृष्टीवर अाहे एक खास विभाग -“खाद्ययात्रा” (http://www.marathisrushti.com/recipes/).
या विभागात आपल्याकडे असलेल्या मराठी पदार्थाची माहिती, अगदी फोटो असेल तर त्यासोबत जरुर पाठवा.
— निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक
http://www.marathisrushti.com
good one
very good article