सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही.
मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ ही त्यांची गझल अनेक लोक म्हणतात, ऎकतात. सुरेश भटांनी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला.
विदर्भातील अमरावती या शहरात १५ एप्रिल १९३२ रोजी सुरेश भटांचा जन्म झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. वडील डॉक्टर असल्याने घरची परिस्थीती बरी होती. आणि त्यांच्या आईला कवितेची खूप आवड होती. यातूनच सुरेश भटांना कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे हे त्यांनाही माहिती नव्हते. त्यांना उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता.
सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती. हॄदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढले आणि भटांच्या कविता, गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या. मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांच्या गझल घेण्यात आल्या. मा.सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. वेगवेगळे रस, रंग असणारी मराठी गझल त्यांनी रेखाटली. फक्त श्रृंगार, प्रेम, विरह इतकच नाहीतर त्यांनी आपल्या गझलमधून समाजाचे दु:ख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला. बदलता समाज, बदलती माणूसकी मांडली. त्यांच्या अनेक गझल बी.ए.च्या अभ्यासक्रमात घेण्यात आल्या. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य गझलसम्राट म्हणजे मा.सुरेश भट असे वर्णन मा.सुरेश भट यांचे करता येईल. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला. सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरतील मर्यादीत न ठेवता अनेकांना ती शिकवली. आज महाराष्ट्रात त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक गझलकार आहेत. मा.सुरेश भट हे फक्त गझलकारच नाही तर एक तडफदार पत्रकार देखील होते त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक देखील सुरू केले होते. ज्यातून त्यांना परखड लिखाण केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे लिहायचे. त्यांची व्यक्तीमत्व कलंदर व्यक्तीमत्व होतं असं अनेकदा बोललं जायचं. आणि त्यात तथ्यही आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी कधीही पैशांना महत्व दिले नाही. त्यांनी फक्त गझलचा प्रसार केला. ते लिहित गेले. त्यांनी भरभरून लोकांना दिले. त्यांच्या शिष्यांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. जो येईल त्याला ते शिकवायचे. त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते. सर्व लुटवून टाकायचे. मा.सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. सुरेश भटांनी गझलसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होतं. आज मराठी गझल लिहिणारे, गाणारे कित्येक गझलकार तयार झाले आहेत. पण सुरेश भटांनी जे पेरलं होतं ते पुन्हा उगवेल याची जरा शंकाच आहे. त्यांनी अनेकांना एकत्र आणून गझलचा प्रसार केला होता. पण आता परिस्थीती जरा वेगळी आहे. सुरूवातीच्या काळात मराठी गझल एकीकडे आणि मराठी कविता एकीकडे असे होते. आज मराठी गझल लिहिणा-यांमध्येच कित्येक ग्रुप तयार झाले आहेत. मी मोठा की तो मोठा ह्या गोष्टी आता पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे सुरेश भटांनी ज्या उद्देशाने गझलला जीवन अर्पण केले होते, तो उद्देश आजच्या पिढीतील गझलाकारांमधून हरवल्याचे चिन्ह दिसत आहेत. पण तरीही एक गोष्ट मात्र, नक्की की सुरेश भटांप्रमाणे गझलेचे तंत्र जपणारा सुद्धा एक वर्ग आहे हे महत्वाचं. मा.सुरेश भट यांनी मराठी गझलच्या विश्वात अमूल्य असं काम केले होते. त्यांच्या गझल व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक मोठ्या गायकांनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. सुरेश भट यांना दोन मुले. त्यापैकी चितरंजन हे सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुरेश भट नक्षत्रांचे देणे
रंग माझा वेगळा
https://www.youtube.com/watch?v=r8LGpFQKkpQ
Leave a Reply