महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने मराठी ग्रंथांच्या अनुवादासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. अर्थात, राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा एक भाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने मंडळास दिले आहेत. त्यानुसार, ‘मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषतः हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविले जातील. त्यांचा सारांश आणि लेखकाचा परिचय हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अखिल भारतीय स्तरावरच्या सर्व भाषांमधील महत्त्वाच्या प्रकाशकांना पाठविण्यात येईल. येथून पुढे ज्या ग्रंथांना शासनातर्फे पुरस्कार देण्यात येतील, ते ग्रंथही यासाठी निवडले जातील. योजना चांगली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन 50 वर्षे लोटल्यावर का होईना, मराठी साहित्याची महती राष्ट्रीय आणि आंतररराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याची कल्पना कुणाला तरी सुचली, हेच अपूर्वाईचे आहे. उत्तम साहित्यकृतीचे निकष ठरवून त्या निकर्षात बसणाऱ्या किमान 100 साहित्यकृतींची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी साहित्य-संस्कृती मंडळाने आपल्या सदस्यांकडून तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती 100 अभिजात मराठी ग्रंथ अनुवादासाठी निवडेलही पण खरी अडचण पुढेच आहे. आपल्या भाषेतील साहित्यकृती जेव्हा अन्य भाषेत नेली जाते तेव्हा अनुवादकाला नुसते परस्पर शब्दकोश माहीत असून चालत नाही. एकमेकांच्या भाषेचे ध्वन्यर्थ, परंपरा. लोकसंस्कृती, सामाजिक पर्यावरण यांचीही जाण असणे आवश्यक असते. गेल्या जमान्यात पी. व्ही. नरसिंहराव, दि. पु. चित्रे, विलास सारंग, प्र. श्री. नेरूरकर, प्रा. आ. ना. पेडणेकर, डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर, प्रकाश भातम्ब्रेकर अशा काही दादा लोकांनी मराठी ग्रंथ अन्य भाषांमध्ये अनुवादित केले. वर्तमानकाळात प्रदीप गोपाळ देशपांडे, जयप्रकाश सावंत, प्रा. शरयू पेडणेकर यांच्यासारखे काही तज्ज्ञ हे काम करू शकतात. तरीही मराठी अभिजात ग्रंथ उत्तम इंग्रजीत नेण्यासाठी, मराठी भाषकांना खूपच कष्ट करावे लागणार आहेत. हे काम चिकाटीचे, सहनशक्तीचे आणि तोल सांभाळून करण्याचे आहे. शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीतच पायजेत, असे म्हणण्याएवढे ते सोपे नाही.
— डॉ. महेश केळुसकर
(अनघा प्रकाशनच्या खिरमट या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च 2017 मध्ये प्रकाशित झाले.)
Leave a Reply