कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. त्यांच्या कवितांची शैली ही अतिशय बांधेसूद आणि मधुर आहे. दीर्घकविता हे कवी ‘बीं’च्या लेखन शैलीचे वैशिष्ठ्य. त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध झाल्यामुळे सर्वोपरीचीत आहे.
त्यांनी पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्हा‘डात चिखलदरा येथे १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही म्हणून चिंताग्रस्त अश्या प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका. १९११ साली ‘बी’ हे अभिनव नाव धारण करून त्यांनी “टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।” ही ‘वेडगाणे‘ नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता ‘मासिक मनोरंजनात’त प्रसिद्ध केली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक आणि तात्त्विक अशी ही कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण.
परंतू ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः कवी बी मात्र यमक जुळविल्याशिवाय रहात नाहीत. पण हे सारे साधताना कवितेचे सौंदर्य देखील त्यांनी ढळू दिले नाही. १९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. १९३४ साली त्यांचा “फुलांची ओंजळ” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘फुलांची ओंजळ’ हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. मा.कवी बी यांचे निधन ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रियांका / स्वानंद
Leave a Reply