मराठी साहित्यात कथा या प्रकारात अनेकांनी आपल्या लीलया लेखणीने खुमासदार शैलीतील कथा दीर्घ व लघु स्वरूपात साकारल्या. या पैकी मराठी लघुकथेचे स्वतंत्रयुग निर्माण करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे ना. सी. फडके
त्यांचा जन्म दि. ०४ ऑगस्ट १८९४ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या गावी झाला.पण त्यांचे मूळ घराणे हे रत्नागिरीतील आगरगुळे या गावचे.त्यांच्या वडिलांच्या फिरतीच्या नोकरी मुळे फडके यांचे शिक्षण निफाड, बार्शी येथे झाले. सन १९०४ मध्ये फडके कुटुंबीय विद्येच्या माहेरघरी म्हणजे पुण्यनगरीत आल्याने तेथील नूतन मराठी विद्यालय त्यांनी प्रवेश घेतला. या शाळेचे संस्थापक सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे होते.पुढे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.सन १९१४ मध्ये ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए.तर १९१७ मध्ये तर्कशास्त्र हा विषय घेऊन एम. ए. झाले. पुणे येथील पूर्वीच्या न्यू पुना कॉलेज म्हणजे आताचे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी काहीकाळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली,पण त्या काळी असहकारीतेच्या चळवळीत त्यांनी सहभाग घेतल्यामुळे सन १९२१ मध्ये महाविद्यालयाची नोकरी सोडून, ते चळवळीत सहभागी झाली.त्यांनी काही काळ टिळकांच्या दैनिक केसरी – मराठा मध्ये संपादकीय विभागात काम केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिफारशीने फडके यांनी दिल्ली येथील सेंट स्टीफन्स मध्ये नोकरी केली.त्याचप्रमाणे नॅशनल महाविद्यालय,सिंध –हैदराबाद व हिस्लॉप महाविद्यालय, नागपूर व राजाराम महाविद्यालय ,कोल्हापूर येथे त्यांनी काही काळ अध्यापन केले.
सन १९३५ मध्ये राजाराम महाविद्यालय कु.कमल गोपाळराव दीक्षित या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. पुढे ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले व दि.२८ डिसेंबर १९४२ रोजी फडके –दीक्षित यांचा विवाह झाला. व विवाहानंतर त्या सौ.कमलाबाई फडके झाल्या. विवाहात फडके ४८ वर्षाचे तर कमल या २६ वर्षाच्या होत्या. कारण फडके यांचा हा द्वितीय विवाह होता. सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत या कमलाबाई फडके यांच्या मोठ्या भगिनी. या दांपत्याला विजय हा मुलगा, कु.अंजली व कु. रोहिणी या दोन कन्या झाल्या. सन १९५१ मध्ये ते निवृत्त झाले व पुणे येथे स्थाईक झाले.
सन १९१२ मध्ये त्यांची ‘मेणाचा ठसा’ ही पहिली कथा केरळ कोकीळ या मासिकात प्रसिद्ध झाली.त्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिसुत्रींनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, शेवटी उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर त्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अल्ला हो अकबर ही त्यांची पहिली कादंबरी सन १९१५ मध्ये प्रसिद्ध झाली. ही कादंबरी इंग्रजी लेखिका मारी कोरेली यांच्या ’टेंपरल पॉवर’ या कादंबरीवर आधारातील आहे.
या नंतर त्यांच्या अखेरचे बंड, अटकेपार, असाही एक त्रिकोण, इंद्रधनुष्य, उजाडलं पण सूर्य कोठे आहे , उद्धार, ऋतुसंहार, एक होता युवराज, कलंकशोभा, कलंदर, किती जवळ किती दूर, कुहू – कुहू, कुलाब्याची दांडी, निरंजन, पाप असो पुण्य असो , प्रवासी ,भोवरा, लग्नगाठी पडतात स्वर्गात, वेडे वारे, सरिता सागर,साहित्यगंगेच्या काठी,हिरा जो भंगला, ही का कल्पद्रुमांची फळे ?, हेमू भूपाली, बंध सुगंध (लघुनिबंध संग्रह), प्रतिभासाधन (वैचारिक),नव्या गुजगोष्टी व धूमवलये हे लघु निबंध संग्रह, युगांतर, संजीवनी ही नाटके, दादाभाई नौरोजी, डी.व्हालेरा ,लोकमान्य टिळक,महात्मा गांधी, बाबुराव पेंटर ही चरित्रे, तर्कशास्त्र, मानसोपचार :शास्त्र व पद्धती, संतती नियमन अशी त्यांची साहित्य संपदा प्रसिद्ध आहे.
त्यांनी कादंबरी लेखन करताना राजकीय पार्श्वभूमीचा, मानस शास्त्रीय सिद्धांताचा आधार घेऊन कथानके साकारली असली, तरी तरुण –तरुणींचा प्रणय हा त्यांच्या कथेचा मुख्य विषय होता. त्यामुळे त्यांच्या कादंबरीने जणू त्याकाळी “फडके युगाचा” उदय झाला. त्यांनी काही काळ ‘रत्नाकर’ हे मासिक व ‘झंकार’ या साप्ताहिका मार्फत पत्रकारिताही केली. फडके यांनी सुमारे २७ वर्षे श्रीसरस्वतीची सेवा करून सरस्वतीचे उपासक झाले.त्यांच्या व आचार्य अत्रे यांचा साहित्यिक वाद एकेकाळी फार गाजला पण अखेर त्यावर पडदा पडून अत्रेंच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या समारंभाचे फडके अध्यक्ष होते. एक सर्जनशील लेखक,लोकप्रिय प्रभावी वक्ता,रसिक, जाणकार,समीक्षक,म्हणून त्यांची प्रतिमा जनमनात आजही कोरली आहे.मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण त्याच्या बाबतीत अगदी लागू पडते,कारण ते उंचीने मध्यम असून फुल शर्ट व पॅट असा पेहराव करत असत.
दि. २२ ऑक्टोबर १९७८ रोजी पुणे येथील दौलत बंगला,४२,विजयनगर कॉलनी,पेशवेपार्क रोड,येथील निवास्थानी वयाच्या ८४ व्या वर्षी साहित्य गगनातील तारा निखळला. अशा या प्रतिभावंत साहित्यिकास त्रिवार वंदन !
— अमेय गुप्ते ( साहित्यिक)
७५८८२४८५६५.
Leave a Reply