आज महाराष्ट्र दिन..सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतील..परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती..
‘..मुघल काय किंवा इंग्रज काय, कुणाही परकीयांच्या हातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी जे जे प्रयत्न झाले त्यांत
‘मराठी रक्त’ जितके सांडले तितके अन्य प्रांतातील रक्त सांडले नाही, याची साक्ष देत इतिहास उभा आहे.!
परकीय आक्रमकांवर मराठी माणसाची जबरदस्त दहशत होती आणि आहे. ‘मरा पर हटा नही’ हे ‘मरहट्टा’ माणसाबद्दल मुघल म्हणायचे ते काही उगाचं नव्हे!
आमच्या मराठी स्त्रीयाही या बाबतीत मागे हटणा-या नाहीत. ज्या वेळेस इतर प्रांतातील स्त्रीया परक्यांच्या आक्रमणाच्या वेळेस अब्रू रक्षणार्थ ‘जोहार’ करत होत्या त्यावेळेस मराठी रणरागीणी मुलं पाठुंगळी बांधून रणांगणात शत्रुशी त्वेषाने लढत होत्या. सैन्याचं नेतृत्व करत होत्या.
छत्रपतींच्या वारशाचा मराठी माणसाला जाज्वल्य अभिमान आहे. ‘महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले’ ही भावना मनात कायम जपणारा मराठी माणूस कदाचित आपसात भांडेल पण आजही भारताच्या एकसंघत्वास जिथे जिथे धोका आढळेल तिथे, देशरक्षण हे फक्त ‘आपले कर्तव्य’ आहे, अशा हिरिरीने तीथे मारायला अथवा मरायला सर्वात प्रथम जाईल..!! मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या मुळाशी हीच भावना होती..’
पु.ल.देशपांडे यांच्या लेखावर आधारीत वरील उतारा, ‘मी मराठी’ असल्याच्या कडव्या अभिमानाने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आपल्यासमोर सहर्ष ठेवला आहे..’दिल्ली दरबार’ मराठी माणसाला १०० पावले दूरच ठेवतो हे आता आतापर्यंत खरं होतं आणि ही मराठ्यांच्या दहशतीची परंपरा औरंगजेबापासून सुरू आहे. मराठे याचा अर्थ मराठी माणूस असा घ्यावा..!
छत्रपती शिवाजी महारांजांनंतर जवळपास तिन-सवातीनशे वर्षांची परंपरा मोडून काढून मराठी माणूस आज देश चालवतोय, नुसता चालवतंच नाही तर जगभरात एक बलशाली देश म्हणून भारताला सन्मान मिळवा, त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत कोणी करु नये हे स्वप्न शिवाजी महाराजांनंतर पुन्हा एका मराठीच माणसाने ८०-९० वर्षांपूर्वी पाहिलं आणि कष्टाने आणि जिद्दीने ते आज पूर्ण केलं. हे कर्तुत्व एका मराठी माणसाचं आहे हे नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल..! अशा या देशाला बलवान करणाऱ्या महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा आणि महाराष्ट्र धर्माचा मला कडवा अभिमान आहे..!!
जय महाराष्ट्र..!!
-नितीन साळुंखे
९३२१८११०९१
Leave a Reply