दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते.
त्यांचा जन्म ३० मार्च १९२८ रोजी बेळगाव येथे झाला. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत लाड अशा मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला.
रविकिरण मंडळाच्या सदस्यांनी त्या काळात कविता गाण्यास सुरूवात केली होती. जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजानन वाटवे यांनी काव्यगायनास आरंभ केला. मास्टर दत्ता यांनी याच काळात भावगीत गायन सुरू केले. गजानन वाटवे यांना गुरू मानून त्यांनी विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर केले. आकाशवाणीच्या पुणे, मुंबई केंद्रावर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.
दत्ता वाळवेकर यांनी गायलेल्या गीतांची पहिली ध्वनिमुद्रिका ‘रिगल’ कंपनीने १९४९ मध्ये काढलेली होती. अत्यंत शुध्द शब्दोच्चार आणि गोड आवाज ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. गीताचा अर्थ श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी ते भावपूर्ण उच्चार करीत. त्यांच्या अर्थवाही गाण्यामुळे श्रोते प्रभावित होत. करमणुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे जाहीर कार्यक्रम हेच लोकांना आवडत असत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा वेळी मा.वाटवे, मा.नावडीकर आणि मा.दत्ता वाळवेकर या त्रिकुटाने राज्यातील अनेक गावात आपल्या गाण्याने लोकांना मोहित केले.
नव्या पिढीमधील गायकांना दत्ता वाळवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होत असे. त्यांनी ’’पुष्पविण कल्पतरू’’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले. खत्री भाषेच्या अभ्यासावर त्यांनी लिहिलेले ’’क्षात्र बोली’’ हे पुस्तकही गाजले. १९७६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना खत्री भाषेवरील संशोधनासाठी पी. एच. डी. प्रदान केली.
पुणे साहित्य संमेलनात तसेच कराड नाट्य संमेलनात त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात २००८ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात जीवनभर संगीत क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल विषेश गौरव करण्यात आला.
दत्ता वाळवेकर यांचे १६ मार्च २०१० रोजी निधन झाले.
दत्ता वाळवेकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली दुर्मिळ गीते, त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांची दृक्-श्राव्य मुद्रणे, वेगवेगळ्या वाहिन्यांवर झालेल्या त्यांच्या मैफली, विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती हे http://www.dattawalvekar.com या संकेतस्थळावर आपण बघू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दत्ता वाळवेकर यांची गाजलेली काही गाणी.
सांग पोरी सांग, हे काय गडे, गोपाल गोपाल नाचलो नानापरी गोपाल, माइया स्वप्नात आला सखा, काय झालं विचारू नका, जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे, का ठेविल्या इथे खुणा, आठविती मज पुन्हा पुन्हा, स्वप्नातल्या मिठीचे रोमांच अजुनी गात्री
https://youtu.be/QPAT236XS5k
Leave a Reply